...यांचेही दर निश्चित व्हायला हवेत!
सर्वसामान्यांचं आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर शासनाला सर्व महत्त्वाच्या गोष्टींचे दर निश्चित करणे गरजेचे आहे. रोजच्या जीवनशैलीत वापरात येणाऱ्या या गोष्टींच्या दरावर चाप लावल्यास नक्कीच सामान्य जनतेला याचा फायदा होऊ शकतो.
कोरोना काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या शिवाय या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांवर उपचाराचा भाग म्हणून प्लाझ्मा, ऑक्सिजन आणि त्या आजाराचे निदान वेगात व्हावे याकरता वापरात येणाऱ्या एचआरसीटी (सिटी स्कॅन) चाचण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र या सर्व गोष्टींवर कोणत्याही प्रकारचे दराचे बंधन नसल्यामुळे प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने दर आकारात आहे. या गोष्टीचा वापर सर्वसामान्यच्या आयुष्यात होत असून त्यांना अनेकवेळी ह्या गोष्टी परवडत नसल्यामुळे ती सुविधा घेत नाही किंवा घेण्याकरता कर्ज काढावे लागते. त्यामुळे जर सर्वसामान्यांचं आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर शासनाला निश्चितच या सर्व महत्त्वाच्या गोष्टीवर दर निश्चित करणे गरजेचे आहे. 'न्यू नॉर्मल' वाटणाऱ्या गोष्टी आता सध्याच्या काळातील जीवनाचे 'रुटीन' झाले आहे. त्यामुळे रोजच्या जीवनशैलीत वापरात येणाऱ्या या गोष्टींच्या दरावर चाप लावल्यास नक्कीच सामान्य जनतेला याचा फायदा होऊ शकतो.
सध्याच्या या कोरोनामय काळात नेमकं कसं जगायचं या प्रश्नाने सगळ्यानांच छळले आहे. त्यातच अनेकांच्या व्यवसायाची वाताहत झाली आहे, अनेकांसमोर रोजगाराची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यावर आरोग्याच्या या आणीबाणीत स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. आजच्या घडीला प्रत्येक जण संघर्ष करत दिवस ढकलत आहे. या रोगट वातावरणात उद्याचा दिवस कसा असेल हे सांगणे मुश्किल आहे. धडधाकट असणारे तरुण, त्यासोबत वय असलं तरी आणखी काही वर्षे सहज जगले असते असे वयस्कर व्यक्ती या कोरोनाच्या आजाराने गिळून टाकले आहेत. वैद्यकीय तज्ञांना उपचार देताना अनेक बंधन आहेत, एका प्रयत्नापुढे ते सुद्धा हताश झाले आहे. डोळ्यांसमोर माणसं पटापट मरत आहेत. नागरिकांनी सकारात्मक विचार करायला हवा, परंतु पोटाची खळगी रिकामी असताना आणि खिशात पैसा नसताना, कुटुंबाची होणारी वाताहत दिसत असताना सकारात्मक विचार मनात कसा आणायचा हा एक मोठा प्रश्न आहे. हे वास्तव असले तरी अशा या नकारात्मक वातावरणात जीवन कसं आनंदी ठेवायचं यावर समाजातील काहीजण चांगले प्रबोधन करत आहेत. या सगळ्या 'आडमुठ्या' परिस्थितीत नागरिकांना आरोग्याच्या सुविधा अल्प दरात मिळण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज आहे, काही प्रमाणात त्यांनी ती उचलली आहे त्याबद्दल त्याचं अभिनंदन, परंतु आणखी गोष्टी करायला अजूनही वाव आहे.
या आजारापासून दूर राहायचे असेल तर जगातील सर्वच तज्ञांनी सॅनिटायझर आणि मास्कचा वापर अनिवार्य आहे हे जनतेच्या मनावर बिंबवले आहे. नागरिक साधारण मास्क वापरून दिवस काढू शकतील. मात्र वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना एन-95 मास्क सुरक्षिततेचे साधन म्हणून वापरावा लागतो. त्याच्या किंमती काही महिन्यापासून वाढल्या आहेत. त्यांच्या या वाढीव किमतीचा बोजा थेट रुग्णांच्या बिलावर दिसत असतो. तसेच रुग्णांच्या उपचारात वापरात येणारा प्राणवायू - सध्याच्या काळात काही दिवसांपासून याच्या किंमती वाढल्या आहेत. पण याचा थेट रुग्णाशी संबंध नसला तरी रुग्णालये जी कोरोनाबाधित रुग्णांना उपचार देत आहेत त्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी परत रुग्णाच्या बिलातून ह्याची वसुली केली जाते. त्याचप्रमाणे सॅनिटायझर जे रुग्णालयात आणि नागरिक घरीही मोठ्या प्रमाणावर या कोरोनाच्या काळात वापरात आहेत, त्याच्या किंमती वाढल्याच आहेत, कारण मागणी खूप मोठी आहे. त्याशिवाय अनेक सॅनिटायझर किती 'गुणवत्तापूर्वक' आहे हा वेगळाच प्रश्न आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात या सॅनिटायझरवर पैसे खर्च करीत आहेत. घरातून बाहेर पडल्यावर कितीही नाही म्हटले तरी 'सॅनिटायझर'ला अजून चांगला पर्याय निघालेला नाही. त्याचबरोबर कोरोनाचे गंभीर रुग्ण बरे करण्यासाठी उपचारात वापरण्यात येणाऱ्या 'प्लास्मा' च्या दराबाबत एकवाक्यता नाही. रक्तपेढ्यांना प्लास्मा संकलित करणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्याची साठवणूक करून ठेवणे याकरिता काही खर्च येतो. मात्र राज्यात एकच दर यासाठी ठेवले तर रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक होणार नाही.
विशेष म्हणजे सध्याच्या काळात अँटीजेन आणि आर टी पी सी आर या दोन्ही कोरोना आहे कि नाही या सांगणाऱ्या चाचण्यांपेक्षा नागरिकांचा भर फुफ्फुसाचा सिटी स्कॅन करून घेण्यावर आहे. यामध्ये डॉक्टर कोरोना संशयित आहे, कि नाही याचे निदान तात्काळ करत आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांसोबत रुग्ण ही चाचणी करून घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र या चाचणीचे दर संपूर्ण राज्यात वेगवेगळे आहेत. त्याशिवाय ही चाचणी करताना काही ठिकाणी आधुनिक मशीनचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येकाचे दर सारखेच असणे कठीण असले तरी या सर्व गोष्टींचा विचार करून दर असावेत अशी मागणी रुग्णांकडून होत आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाने समिती गठीत केली असून त्याचे लवकरच दर निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ते दर लवकर जाहीर झाले तर सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळू शकेल.
संपूर्ण जगाला कोरोनाने बदलून टाकले आहे. प्रत्येक जण कोरोनाच्या धास्तीने त्याच्या आयुष्यात त्यानुसार बदल करून घेत आहे. काही दिवसांपासून समाज माध्यमावर एक फोटो व्हायरल होत आहे, त्यावर एक नवीन जीवनशैलीला साजेशी अशी हिंदी भाषेत दोन वाक्य आहेत, ती कोणाची माहित नाही, कारण त्यावर त्याचं नाव नाही. पण वाक्य असे आहे, "सिखना पडेगा अब आँखो से मुस्कुराना, क्योकीं होठो की मुस्कान तो मास्क ने छुपा ली.
9 मे ला 'चला, कोरोनासोबत जग जिंकूया' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते त्यामध्ये, गेले काही दिवस खूप पंडितानी आपलं कोरोनामय आयुष्यावर मत मांडलं आहे. आता गरज आहे ती ह्या परिस्थितीसोबत कशा पद्धतीने जगता येईल. याकरता आपल्या आयुष्यात काय बदल करावे लागतील याचा शोध घेण्याची. कारण ह्या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याची हीच ती योग्य वेळ आहे. केंद्र आणि राज्य सरकार आप-आपल्या मार्गदर्शक सूचना देतील परंतु मनाने आपण काही गोष्टी आता स्वीकारल्या पाहिजे. एकदा का आपण एखादी गोष्ट स्वीकारली कि त्यावर उत्तर शोधणं खूप सोपे जाते. सध्या वास्तवाचं भान ठेवून नागरिकांनी सुरक्षिततेच्या अटी आणि शर्ती लक्षात घेऊन टाळेबंदीनंतरच आयुष्य कसं असेल यावर आताच विचार करणे सुरु केले पाहिजे. सामाजिक माध्यमांमुळे सध्या माहितीचा ओघ वाढला आहे, त्यात माहिती चूक कि बरोबर हा नंतरचा मुद्दा आहे. या सगळ्या प्रकारामुळे लोकं संभ्रमावस्थेत आहे. अशावेळी लोकांनी मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती कशी चांगली ठेवण्यासाठी नियमित सकस आहार घेण्याबरोबर रोज व्यायाम केला पाहिजे. ज्या व्यक्तींची रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे अशा व्यक्तींना कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही असे अनेक वेळा आपल्याला आरोग्य तंज्ञानी सांगितले आहे
कोरोनाच्या या परीस्थितीत कुटुंबच्या कुटुंब रुग्ण म्हणून निर्माण होत आहे. अशा वेळी खासगी क्षेत्रातील आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्यात असाव्यात याकरिता शासन प्रयत्न करीत आहे. मात्र ते प्रयत्न युद्धपातळीवर व्हावे ही अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. खासगी आरोग्य व्यवस्थेचे नुकसान न होता सर्वसामान्यांना या सुविधा परवडू शकतील असा सुवर्णमध्य काढणे गरजेचे आहे. कोरोनचा प्रसार केव्हा थांबेल हे कोणाच्याच हातात नसले तरी स्वतःची काळजी घेताना सुरक्षिततेचे नियम पाळणे आणि त्यापद्धतीने वावर ठेवणे एवढेच नागरिकांनी केले तरी त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो.संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग
- BLOG | प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक!
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे