तीन दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने, पुन्हा एकदा जाहीर केले की कोरोना काळात तरुणांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. वरिष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या तुलनेत कोरोना बाधित लोकांमध्ये तरुणांची आकडेवारी लक्षणीय असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यापुढे तरुणांना अधिक सजग राहावे लागणार आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाची जास्त भीती वरिष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले त्याचप्रमाणे ज्यांना काही आधीपासून आजार आहेत त्यांना होत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, कालांतराने कोरोनाचं खरं रूप दिसू लागले आणि त्यामध्ये सर्वात जास्त लागण ही तरुणांना झाल्याचे आकड्यांच्या आधारवर सिद्ध झाले आहे.


या काळात दैनंदिन कामासाठी तरुण जास्त घराबाहेर पडत असल्यामुळे त्यांना या आजाराची बाधा झाली असावी, असेही काही जण सांगत आहे. कोरोनामुळे आपल्याला काहीही होणार नाही, कसेही वागलो तरी चालते या भूमिकेतून तरुणांनी बाहेर पडण्याची हीच ती वेळ आहे. तरुणांनी खरं तर अधिक दक्ष राहून स्वतःची काळजी घेऊन दुसऱ्यांची काळजी घेणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या जी काही राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालात आकडेवारी आहे त्यावरून तरुणाई कोरोनाच्या विळख्यात असल्याचे दिसत आहे.


जागतिक आरोग्य संघटनेने तीन दिवसापूर्वी ट्विट केले होते, त्यात संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस, यांनी तरुणांनी कोरोनाकाळात काळजी घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन केले होते, त्यात ते पुढे असेही म्हणाले होते की, यापूर्वी ही सांगितले होते आणि पुन्हा सांगत आहोत की, तरुणांना कोरोनाचा प्रादुर्भाव होतो, त्यांचा मृत्यू शकतो. तरुण या संसर्गजन्य आजाराचा प्रसार करू शकतात. त्यामुळे तरुणांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःची काळजी घेऊन दुसऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. तसेच संघटनेच्या कोविड-19 तांत्रिक विशेषज्ञ डॉ. मारिया व्हान केरखोव्ह यांचाही या ट्विट मध्ये समावेश आहे, त्या सांगतात की, बहुतांश तरुणानं कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. तरुणांना कोरोनाचा गंभीर आजार होऊ शकतो, त्यांना अतिदक्षता विभागात जावे लागू शकते, त्यात त्यांचा मृत्यू होऊ शकतो. काहीवेळ तरुणांना ते स्वस्थ आहेत असे वाटू शकते, परंतु. त्यांच्यामुळे तो आजार ते ज्यांच्यासोबत राहत आहेत त्यांना ते देऊ शकतात.


सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव याबाबत बोलताना म्हणाले की, "मी काही वैद्यकीय तज्ञ नाही मात्र सभोवतालची जी परिस्थिती दिसत आहे त्यावरून हा कोरोना नक्की कशामुळे होतेय त्याचं नेमकं कारण काळत नाही. केवळ तरुणांनी नाही तर सगळ्यांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. कारण हा कोरोना कोणाला कधी होईल नेम नाही. गेले चार महिने मी कुटुंबियांसोबत घरातच आहे. त्यामुळे सगळ्यांनीच सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे."


राज्याचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग दररोज राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल तयार करत आहे. यामध्ये ते कोरोनबाधित रुग्णांचे विश्लेषण करून अहवाल तयार करत असतात. त्या अहवालामध्ये ते वयोगटानुसार किती लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, याची माहिती सुद्धा देत असतात. त्या अहवालात वयोगटानुसार विभागणी करण्यात आली आहे. 3 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 4 लाख 30 हजार 933 रुग्णांचा आकडा घेऊन विश्लेषण करण्यात आले आहे. 21 ते 30 वयोगटातील 75 हजार 795 जणांना तर 31 ते 40 वयोगटातील 89 हजार 331 जणांना आणि 41 ते 50 वयोगटातील 76 हजार 974 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ह्या तीन वयोगटातील सर्वात जास्त रुग्णांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.


कोरोनाच्या या साथीच्या आजारातून बऱ्याच गोष्टी ही शिकण्यासारख्या आहेत. त्यातील पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे या साथीला हलक्यात घेऊन चालणार नाही. या आजारात कोरोनाने कोणालाच सोडलेले नाही, प्रत्येक वयोगटातील नागरिकाला या आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्याशिवाय सुरक्षिततेचे कोणतेच नियम धाब्यावर बसून चालणार नाही. कोरोना कधी निघून जाईल यावर अजून कोणताही तज्ञ भाष्य करू शकलेला नाही. याकरिता प्रत्येकानेच वावर करताना सावधानता बाळगली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. कोरोना सुरु झाल्यापासून अजूनही राज्यात सर्वच सण छोटेखानी पद्धतीने साजरे झालेले आपण सगळ्यांनीच पहिले आहे. राज्य सरकार वारंवार याविषयावर मार्गदर्शक सूचना जारी करत असतात त्याचा आपण सगळ्यांनीच आदर राखला पाहिजे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबईतील प्रसिद्ध गणपतीला मंडळांनी यंदाचा सण छोट्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे, तर काही मंडळांनी यावर्षी सण साजरा न करण्याचा निर्णय घेऊन आरोग्य उत्सव करणार असल्याचे जाहीर केले आहे. कोरोनाच्या आजाराचं गांभीर्य बहुतेकांनी आता ओळखले असून काळाची पावले ओळखून निर्णय घेणेच योग्य ठरणार आहे.


कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक राज्यात वाढत आहे. राज्याचा आरोग्य विभागाने 3 ऑगस्ट रोजी जी कोरोना बाधितांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यात नवीन 8 हजार 968 रुग्णांचे निदान झाले असून 266 कोरोन बाधीत मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 3.52% इतका आहे. तसेच राज्यात 10 हजार 221 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 018 रुग्ण उपचार घेत आहेत.


इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात की, " या सगळ्या प्रकारात वेगवेगळी वर्गवारी करता येऊ शकते. त्यात काही तरुण घरातील कर्ते असल्यामुळे दैनंदिन कामासाठी बाहेर पडत असावेत. तर काही तरुण केवळ आपल्या काही होत नाही असा फाजील आत्मविश्वास बाळगून सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवत आहेत. तर काही केवळ मौज मजा करण्याकरिता हिंडत आहेत. त्यामुळे तरुणाचं कोरोनाने बाधित होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ नागरिकांनी या काळात बाहेर जाणे टाळले आहे. त्याशिवाय दुसरं विशेष महत्वाचं म्हणजे बदलत्या जीवनशैलीनुसार विशी-तिशीच्या तरुणांमध्ये सुद्धा मधुमेह, रक्तदाबाचे विकार आणि स्थूलत्वाचे आजार दिसून यायला लागले आहेत. अशा व्याधी असणाऱ्या तरुणांना प्रामुख्यने ह्या आजाराचा धोका अधिक संभवतो.


एकंदर या सगळ्या प्रकावरून तरुण/तरुणी खरंच अगदीच महत्वाच्या कामासाठी बाहेर पडत असतील तरी त्याने सुरक्षिततेचे सगळे नियम पाळलेच पाहिजे. तरुणांनी बाहेर पडताना या आजाराचा प्रादुर्भाव होणारच नाही असा खोटा आत्मविश्वास बाळगू नये. कोरोना बरोबर जगायला शिकताना सर्व नियम पाळून आपल्याला जगणे अपेक्षित आहे, कोरोना होऊन जगायचं नाही.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग