एक्स्प्लोर
BLOG | कोरोनामुक्त योद्धे, रणभूमीवर रुजू!
कुठलीही पर्वा न करता 'सेवा हाच धर्म' मानणारे आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांसह, वैद्यकीय सहाय्यक, नर्स, वॉर्डबॉय, टेक्निशियन पुन्हा कामावर हजर झाले आहेत. म्हणूनच देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी आरोग्य क्षेत्रातील या सर्वांना योद्धे म्हणून संबोधिले होते.
अनेक वेळा कोरोनाची लागण झाल्यावर शहाणे लोकं आता धडा मिळाला पुन्हा कोरोना होऊ नये म्हणून सगळ्या प्रकराची काळजी घेत असतात. 14 दिवस क्वारंटाईन सांगितले असताना महिनाभर घरी बसणे पसंत करतात. त्यावर 'जान है तो जहान है' असा डायलॉग सातत्याने मारत अन्य नागरिकांना क्वारंटाईनचे महत्व पटवून देत असतात. मात्र काहीजण असेही ज्यांना व्यवस्थित माहिती आहे की आता काय काळजी घ्यायची किंवा आपण परत त्याच ठिकाणी कामाला गेलो तर हमखास कोरोनाची लागण होऊ शकते. मात्र त्याची पर्वा न करता कोरोनामुक्त झाल्यावर 'सेवा हाच धर्म' मानणारे आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, वैद्यकीय सहाय्यक, नर्स, वॉर्डबॉय, टेक्निशियन पुन्हा कामावर हजर झाले आहेत. होय, म्हणूनच देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी आरोग्य क्षेत्रातील या सर्वांना योद्धे म्हणून संबोधले होते. सध्याच्या घडीला हेच योद्धे कोरोनामुक्त होऊन पुन्हा रणभूमीवर रुजू झाले आहेत.
देशभरात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अनेकांना कर्तव्य बजावत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन त्यांना आजाराची लागण झाली आहे. मात्र त्यांना नेमकी लागण कशामुळे झाली आहे याची माहिती नाही. अनावधानाने त्यांना या संसर्गजन्य आजाराची बाधा झाली आहे. पुढे ते बरे झाल्यावर काळजी घेऊन काही जण कामावर रुजूही झाले आहे. आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांनंतर जास्त कुणाला या आजाराची लागण झाली असतील तर ते म्हणजे पोलीस बांधव. ते सुद्धा उपचार घेऊन पुन्हा त्यांच्या कामावर हजर झाले आहेत. मात्र आरोग्य विभागात काम करणाऱ्यांचं विशेष म्हणजे त्यांना पुन्हा रुग्णांमध्ये जाऊन काम करावे लागते. या आजाराची अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना लागण झाली असून यामध्ये खासगी आणि सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या सर्वांचाच समावेश आहे. विशेष म्हणजे खासगी सेवेत काम करणाऱ्या काही वरिष्ठ डॉक्टरांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे.
आपल्याकडे सर्वसामान्य लोकं कोरोना होऊ नये म्हणून लॉकडाऊनच्या काळात अनेक काळजी घेत होते. मात्र आरोग्य क्षेत्रातील काही डॉक्टर्स वगळता अनेक डॉक्टरांना असं करणं शक्य नव्हतं. प्रत्येक जण कामावर येऊन रुग्ण सेवा देतच होता. अगदी 60 वय पार केलेले डॉक्टर सुरवातीच्या काळातही रुग्णांना उपचार देत होते आणि अजूनही देत आहेत.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) निवासी डॉक्टरची शिखर संस्था असलेल्या संघटेनचे अध्यक्ष, डॉ राहुल वाघ सांगतात की, "राज्यभरात जवळपास मुंबई शहर धरून 200 रेसिडेंट डॉक्टरांना या आजाराची बाधा झाली असून ते बाधित डॉक्टर जे काही प्रमाणित उपचार आहेत ते घेऊन कोरोनामुक्त होऊन पुन्हा सेवा देण्यास रुजू झाले आहेत. रेसिडेंट डॉक्टर्स हे रात्र-दिवस रुग्ण सेवेकरिता काम करत आहे. रुग्णालयात पहिला रुग्ण आल्यानंतर त्याचा सामना रेसिडेंट डॉक्टर्स, नर्स आणि वॉर्डबॉय यांच्याशी होत असतो. या सगळ्या प्रकारात काळजी घेतल्यानंतरही आमच्या काही डॉक्टरांना या आजाराची लागण झाली आहे. तो आमच्या कामाचा भाग आहे ते आम्ही करत राहूच. परंतु, आमची शासनाला एक विनंती आहे की, आमच्या ज्या काही शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा बाकी आहे. ती त्यांनी घ्यावी परंतु विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तयारीकरिता पुरेसा असा 45 दिवसाचा अवधी द्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळेल."
21 एप्रिलला, 'त्या' डॉक्टरांना मरणाने छळले होते' या शीर्षकाखाली डॉक्टरांची या आजाराने झाल्यानंतरची परवड यावर सविस्तर लिहिले होते. त्यामध्ये, गेल्या सात दिवसात देशाच्या विविध प्रांतातील तीन डॉक्टर आपले कर्तव्य बजावत असताना धारातीर्थी पडले. रुग्णांना उपचार देत असताना त्यांना या रोगाची लागण झाली असून त्यांचे निधन झाले. मात्र या तीन डॉक्टरांच्या अंत्यविधीला समाजातील काही समाजकंटकांनी अडथळे निर्माण केले. पोलिसाची मदत घेऊन त्यांचे विधी पार पाडण्यात आले. ही घटना केवळ निंदनीय नसून या घृणास्पद कृत्याचा निषेध समाजातील सर्वांनीच करायला हवा. डॉक्टरी पेशातील लोकं संपूर्ण आयुष्य रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी वेचत असतात. अनेकदा वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना उपचार द्यायचे. रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकाने उपचार झाल्यानंतर 'थँक यू' म्हटल्यावर डॉक्टरांना हत्तीचं बळ येतं. मात्र जेव्हा कोरोनासारख्या वैश्विक महामारीचं संकट उभं ठाकल्यानंतर जीवाची बाजी लावतो आणि रुग्णांना उपचार देतो तेव्हा त्याचं अभिनंदन देशाच्या पंतप्रधानांसह संपूर्ण देश करतो. आज त्या डॉक्टरांच्या वाट्याला मरणानंतरही छळलं गेलं होतं, यापेक्षा काय मोठी शोकांतिका असावी.
हे ही वाचा- BLOG | 'त्या' डॉक्टरांना मरणाने छळले होते
त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळात काही अनुचित प्रकार घडले की ज्या ठिकाणी, आरोग्य कर्मचारी ज्या ठिकणी राहत होते त्या सोसायटीमधील लोकांनी या लोकांना राहण्यास मज्जाव केला होता. काही डॉक्टरांना आणि त्यांच्या सहाय्यकांना मारहाणीचे प्रकार पण या काळात घडले. हा असा अपमान सहन करूनही आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आपल्या कामाशी प्रामाणिक होते. शेवटपर्यंत ते आपले काम करत होते आणि आजही करत आहेच. अनेक रेसिडेंट डॉक्टर्स आणि इंटर्न्स अनेक महिने आपल्या घरी गेलेले नाहीत. प्रत्येकाला कुटुंब असतं, त्यांच पण कुणीतरी काळजी करणारे असतात याची जाणीव आपण सर्व सामान्य नागरिकांनी ठेवली पाहिजे. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा मात्र सर्वांना डॉक्टर हवा असतो. असे हे आरोग्य सेवेतील डॉक्टर जे आपली सेवा देऊन घरी जातात. तेव्हा त्यांच्या मनातही कधी तरी हा प्रश्न उद्भवत असेल का? की माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला या आजाराचा धोका संभवू शकतो.
याप्रकरणी, इंडियन मेडिकल असोसिएशन (आय एम ए ), महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे, सांगतात की, " या सर्व युद्धात काही डॉक्टरांना आपले कर्तव्य बजावत असताना प्राणही गमवावे लागले आहेत. आमच्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे 11 डॉक्टरांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यापेक्षा अधिकही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जवळपास 800 खासगी डॉक्टरांनी मुंबई, पुणे आणि यवतमाळ शहरात कोरोना ड्युटी केली आहे. यामध्ये 450 पेक्षा जास्त डॉक्टरांना या आजाराची लागण झाली आहे. अनेक जण उपचार घेऊन पुन्हा कामालाही लागले आहेत. सर्व डॉक्टर इमाने इतबारे रुग्णांना सेवा देण्याचं काम करीत आहे. आमचं एकच म्हणणं आहे की डॉक्टरांचं खच्चीकरण होईल असं कोणतही कृत्य नागरिकांकडून होऊ नये. अनेक डॉक्टर ज्या ठिकाणी साथीच्या या आजाराचं प्रमाण कमी आहे ते अन्य ठिकाणी जाऊन सेवा देत आहेत. "
या अशा भयावह परिस्थितीत 'देव' वाटणाऱ्या या व्यक्तीवर दगडफेक करू नका म्हणजे मिळवलं. फारच थोड्या प्रमाणात हे प्रकार होतात. पण ते होऊच नये यासाठी सर्वच नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. सलाम सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना ! त्यांच्या कर्तृत्वाला आणि सेवेपोटी असणाऱ्या श्रद्धेला.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement