BLOG | झुंबड कशासाठी?
अनेक वरिष्ठ मंडळींनी, कोरोना सोबत जगायला शिकलं पाहिजे असं म्हटलंय. मात्र, कोरोना होऊन जगायचं नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे.
दोन-अडीच महिन्यानंतरचा शुक्रवार म्हणजे आपल्या राज्यातील ऐतिहासिक दिवस ठरावा अशा पद्धतीने लोकं घराबाहेर पडली होती. विशेष करून ज्या शहरात कोरोनाबाधितांचे सर्वात जास्त रुग्ण आहे, अशा शहरात ती म्हणजे मुंबई आणि पुणे. सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन सुरु असून लोकांचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून काही प्रमाणात शासनाने लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली आहे. याचा अर्थ कोरोना हद्दपार झाला आहे असे कुणीही जाहीर केलेले नाही. शिथीलता शब्दाचा आपल्या सोयीनुसार अर्थ काढून लोकांनी बाजारपेठेत झुंबड केली आहे. कोरोनाने मागच्या काळात सगळ्यांनाच दाखवून दिलय की आपण अनेक गोष्टींशिवाय व्यवस्थित राहू शकतो. अशा पद्धतीने विनाकारण बाहेर पडल्याने धोका निर्माण होऊ शकतो, हे सुजाण नागरिकांनी अजिबात विसरू नये. अनेक वरिष्ठ मंडळींनी, कोरोना सोबत जगायला शिकलं पाहिजे असं म्हटलंय. मात्र, कोरोना होऊन जगायचं नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे.
कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढू नये याकरिता अजूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचे निर्बंध कायम आहेत. आरोग्य यंत्रणा भर पावसात रुग्णांना सेवा देण्याकरिता रात्र-दिवस झटत आहे. शुक्रवारी राज्य शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 139 रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. 2 हजार 436 रुग्णाचं निदान झालं असून 1 हजार 475 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यात सध्याच्या घडीला 42 हजार 215 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. या सगळ्या आकडेवारीवरून आजही राज्यातील कोरोना बाबतीतील गांभीर्य लक्षात येते. या अशा वातावरणात फाजील आत्मविश्वास बाळगल्यास सगळेच जण चांगलेच अडचणीत येऊ शकतात. कोरोनाचा आजार कशामुळे होतो ही सांगण्याची वेळ नाही. कारण, आतापर्यंत आपल्या सगळ्यानांच कोरोना कशामुळे होतो इथपासून ते त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर उपचार कोणते आहे हे सगळ्यांनाच ठाऊक झालं आहे.
कोरोना-बिरोना काय नाही, सगळं मार्केट उघडलं आता, बिनधास्त जगायचं अशा मानसिकतेत कोणी राहू नये. मुंबई महानगर क्षेत्रात प्रवासासाठी कोणत्याही परवानगीची गरज नसल्याने रस्त्यावर बऱ्यापैकी खासगी वाहनांची ये-जा सुरु होती. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहावयास मिळत होती. शिथीलता देताना काही अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. अनेकांनी सुरक्षिततेचे नियम धाब्यावर ठेवले होते, सामाजिक अंतराचे पालन लोक करताना दिसत नव्हते. प्रशासनाने हे नियम आरोग्यच्या दृष्टीने घालून दिले आहे. कोरोनानंतरच आयुष्य निश्चितच वेगळं असणार आहे, याची सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे. तरीही नियम पाळायचे नाही हा विडाच काही लोकांनी उचलेला दिसतो. खासगी क्षेत्रातील कार्यालये हळू-हळू चालू व्हावी, जनजीवन पूर्वपदावर येण्याकरिता ही लॉकडाउन मध्ये सूट दिली आहे, त्याचा गैफायदा कुणी घेऊ नये. अजूनही काही कार्यालयातील लोकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिलेला आहे. ज्या कुणाला कार्यलयात बोलावले गेले आहे. त्यांच्या उपस्थितीचा नंबर फारच कमी ठेवण्यात आला आहे. शासकीय कार्यालयातही कर्मचारी किती उपस्थित राहावे याचे नियम बनविले गेले आहेत.
पावसाळा सुरु झाला आहे, अशा काळात आरोग्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे, असं सध्या वातावरण आहे. आजही अनेक कोरोनाबाधित रुग्णांना बेडसाठी रुग्णालयाचे हेलपाटे मारावे लागत आहे. अनेकांना बेड न मिळाल्यामुळे फिल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करून घ्यावे लागत आहे. अजूनही म्हणावी तशी परिस्थिती चांगली झालेली नाही, नक्कीच अशक्य असं काही नाही. मात्र, या आजाराचं वर्तन इतर आजारापेक्षा वेगळं आहे. त्यामुळे थोडा वेळ लागणार आहे. या संपूर्ण जगावर आलेल्या आरोग्यच्या आणीबाणीवर मात करण्यासाठी राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर अनेक प्रयत्न सुरु आहेत. कुणी लस शोधण्याच्या कामात गुंतले आहेत तर कुणी या आजरांवर संशोधन करीत आहे.
कुणाला सगळं आलबेल सुरु आहे असं वाटत असेल तर तसं अजिबात चित्र नाही, आपल्याला आणखी काही काळ जोपर्यंत प्रशासन सांगत नाही तोपर्यंत सर्व काळजी घेऊनच वावर करायचा आहे. शासनाने नागिरकांना काही नियमावली आखून दिली आहे त्याचा सन्मान राखत प्रत्येकाने ते नियम पाळलेच पाहिजे. घराच्या बाहेर पडतेवेळी मास्क लावणे बंधनकारकच आहे. आजही स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करताना नातेवाईकांच्या संख्येवर निर्बंध आहेत. या आणि अशा अनेक अटी आजही कायम आहेत. त्यामुळे केवळ मोकळीक मिळाली आहे म्हणून विनाकारण बाजारपेठांमध्ये जाणे टाळा, स्वतःची गाडी आहे म्हणून हिंडून यायचा विचार करत असाल तर तसे अजिबात करू नका. शासन आणि प्रशासन सगळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावेत म्हणून शर्थीचे प्रयत्न करीत आहे त्यांना सहकार्य करणं प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.
या महाभयकंर संकटातून सगळ्यांनाच लवकर सुटका हवी आहे, घरी बसून खूप कंटाळा आला असेल या सगळ्या गोष्टी रास्त असल्या तरी आरोग्यच्या सुरक्षिततेच्या पुढे त्या नगण्य ठरतात. जर तुमचं आरोग्य उत्तम असेल तर उद्या तुम्ही संपूर्ण जग फिरू शकता पण तुम्हाला कुठल्या आजाराचा प्रादुर्भाव झाला तर आरोग्य अडचणीत येऊ शकते हा विचार प्रत्येकानेच करणे गरजेचा आहे. त्यामुळे कारण नसताना रस्त्यावर गर्दी करणे टाळा. वृत्तवाहिनीवर जर शुक्रवारी कशा पद्धतीने लोकांनी बाजारपेठेत आणि रस्त्यावर गर्दी केली होती. हे पाहिलं असेल तर तुमच्या पण मनात हाच प्रश्न निर्माण होईल कि एवढी झुंबड कशासाठी?
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं