एक्स्प्लोर

ब्लॉग : पुरुषांवरील लैंगिक अत्याचाराचे मौन...

‘मी माझ्या मर्जीने माझा जीव देत आहे, परंतु माझ्यासोबत खूप वाईट झाले आहे. जेव्हा मी ११ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या मावशीच्या मोठ्या मुलाने माझ्यावर कूकर्म केले, यानंतर माझ्या मामाच्या मुलानेही माझे शारीरिक शोषण केले.'

आयआयटी दिल्लीचा २१ वर्षीय विद्यार्थी गोपाल मालोने १२ एप्रिल २०१८ च्या दिवशी रात्री उशिरा नीलगिरी होस्टेलच्या आपल्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रहिवासी मालो एमएस्सी केमिस्ट्रीचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. याआधीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. १० एप्रिल रोजी झोपेच्या तब्बल ५० गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मित्रांनी त्याला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्याने तो वाचला होता. यादरम्यान त्याच्या भावाने त्याला खूप समजावून सांगितले. त्याचे कान्सेलिंग केले. तो थोडासा सेटल झाला आहे असे वाटताच त्याला पुन्हा होस्टेलवर आणून सोडले. मालो गुरुवारीच होस्टेलमध्ये परतला होता. आल्या दिवसापासून तो पुन्हा अस्वस्थ झाला. त्याचं मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं, त्याचा भूतकाळ त्याच्यापुढे आ वासून उभा राहत होता. नीलगिरी होस्टेलच्या रुम नंबर डी-५ मध्ये ३ कॉट आहेत. मधल्या कॉटवर गोपाल मालो झोपायचा. गुरुवारी रात्री त्याचे सोबती लवकर झोपी जात नव्हते तेव्हा त्याने ‘मला खूप झोप येत आहे. तुम्हाला जागे राहायचे असेल तर बाहेर झोपा’ असे सांगत त्यांना रुमबाहेर काढले आणि आतून दार बंद करून घेतले. सगळीकडे सामसूम झाल्यावर सिलिंगच्या पंख्याला गळफास लावून आपला जीवन प्रवास संपवला. गोपालचे दोन्ही मित्र रात्रभर बाहेरच झोपले आणि सकाळी ७ वाजता रुमबाहेर पोहोचले. अनेकदा दार ठोठावूनही गोपालने उघडले नाही, म्हणून एका मित्राने खिडकीतून डोकावून पाहिले. तेव्हा त्याला गोपाल पंख्याला लटकलेला आढळला. यानंतर लगेच त्यांनी सिक्युरिटी गार्डला माहिती कळवली. सिक्युरिटी गार्डनी तरुणांच्या सूचना पडताळून पोलिसांना माहिती कळवली. मालोच्या रूममध्ये बंगाली भाषेमध्ये लिहिलेली एक पानी सुसाइड नोट पोलिसांना आढळून आली. ज्यात त्याने लिहिले होते की, त्याच्या मामाच्या मुलाने आणि मावशीच्या मुलाने ११ वर्षांपासून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. आयआयटीमध्ये आल्यानंतरही ते त्याच्यावर परत बंगालला त्याच्या गावी येण्याचा दबाव टाकू लागले. त्याला हे सर्व सहन होत नव्हते.’ मालोच्या आयुष्यात बालपणापासून हे वादळ घोंघावत होते ज्याने त्याची जीवननौका उद्धवस्त झाली. मालोच्या सुसाईड नोटवरुन लक्षात येतं की तो एक संवेदनशील तरुण होता. तो लिहितो की, ‘मी माझ्या मर्जीने माझा जीव देत आहे, परंतु माझ्यासोबत खूप वाईट झाले आहे. जेव्हा मी ११ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या मावशीच्या मोठ्या मुलाने माझ्यावर कूकर्म केले, यानंतर माझ्या मामाच्या मुलानेही माझे शारीरिक शोषण केले. दोघांनी अनेक वर्षे सातत्याने माझ्यावर अत्याचार केले. मी लहान होतो म्हणून मला याची माहिती नव्हती आणि मला याची सवय झाली. परंतु उच्च शिक्षणासाठी मी जेव्हा दिल्लीला आलो तेव्हा मला कळले की, हे चुकीचे आहे. यामुळे आता एवढे सगळे घडल्यावर मी जिवंत राहू शकत नाही. परंतु माझी अंतिम इच्छा आहे की, माझ्या मामा व मावशीच्या मुलांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. आई, बाबा, भाऊ, वहिनी आणि लहान भाऊ तुमची सर्वांची मी माफी मागतो. परंतु मी मागच्या काही दिवसांपासून खूप त्रस्त होतो, यामुळे माझा जीव देत आहे.’ दिल्ली पोलिसांनी गोपालच्या सुसाइड नोटमध्ये उल्लेख केलेल्या दोन्ही नातलगांविरुद्ध झिरो एफआयआर नोंदवून बंगाल पोलिसांना चौकशीसाठी प्रकरण जाणार आहे. लवकरच संबंधित आरोपींचीही चौकशी होईल. या नंतरची पुढची कारवाई जलद होईल. पुढे अपराध्यांना शिक्षा होईल की नाही हे आताच कुणी सांगू शकत नाही. कारण आपल्याकडील न्यायव्यवस्था नेमका न्याय देते की नाही याचे हमीपूर्वक विधान कुणीही करू शकत नाही. शिवाय हा तथाकथित न्याय कधी मिळेल हे ही कुणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. गोपाल मालोच्या आत्म्याला न्यायासाठी तिष्टत बसावे लागेल. पण हे तो टाळू शकला असता की नाही हे देखील आपण नेमके सांगू शकत नाही. गोपालचे जे लैंगिक शोषण झाले त्याबद्दल तो कुणाशीही बोलू शकला नाही हे आपल्या मौनी सामाजिक रचनेचे फलित होय. शोषणकर्ते नातलग असोत वा मित्र असोत वा अपरिचित असोत या सर्वांना पक्के ठाऊक असते की शिकार कुठे बोलणार नाही, काम एकदम फत्ते होणार आहे. त्यामुळेच त्यांची भीड पार चेपलेली असते. गोपाळच्या प्रकरणाकडे अशा मानसिकतेचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. बाल्यावस्थेतील गोपालला तारुण्याच्या पश्चातदेखील अब्युज केले जात होते आणि तरीदेखील तो त्यावर खुलेपणाने बोलू शकला नव्हता. मग शोषण टाळणे ही तर खूप दूरची गोष्ट झाली. गोपालसारख्या अनेक तरुणांना, मुलांना, किशोरांना ही गोष्ट अजूनही आपल्या निकटवर्तीयांना सांगता येत नाही. जर ही आपबीती सांगितली तर अपराध्यांना सजा होईल की नाही यापेक्षा आपल्याबद्दल लोक काय म्हणतील हे अनेकांना झेपत नाही. आपल्या पौरुषत्वावर शंका घेतली जाईल का याची अनामिक भीती सतावत राहते, आपल्यात काही कमतरता निर्माण झालीय का किंवा होईल का हा न्यूनगंड टोकरत राहतो, आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल का, आपले मित्र आपला परिवार आपली टवाळी करेल की आपल्याला समजून घेईल याचे उत्तर त्यांना मिळत नाही. अशा अनेक शंका कुशंकापायी ते गप्प बसतात आणि बऱ्याचदा संतुलन हरवतात, आत्मविश्वास गळून पडतो. गोपालसारखे काही जण डिप्रेशनमध्ये जातात आणि आयुष्याचा अकाली निरोप घेतात. जगाला अलविदा करताना मनातलं शल्य बोलून दाखवतात. हीच गोष्ट ते आधी बोलून दाखवण्यात कमालीचे कमी पडतात. यावर आपल्याकडे कुणी बोलत नाही वा फारसं लिहिलंही जात नाही. समाजाचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन किती मागासलेला आणि संकुचित आहे हे या एकाच बाबीवरून लक्षात येते. बलात्कार म्हणजे चिमुरडया मुली, स्त्रियायांचेच शोषण असा एक समज किमान आपल्याकडे तरी सर्वथैव स्वरुपात मान्य आहे. एखाद्या सहा महिन्याच्या बालिकेवर बलात्कार झाला की तिच्या मातेला ते लगेच लक्षात येते. पाच सहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्यावर काही दिवसात तिच्या कुटुंबाला ते उमगते. कुमारिका आणि तरुणींवर होणारे अत्याचार तर बिल्कुल लपून राहत नाहीत. याही पलीकडे जाऊन अधम प्रवृत्तीच्या पुरुषांनी केलेले प्रौढा आणि वृद्धांवरचे बलात्कार कुटुंबाच्या लक्षात आले नाहीत तरी ते समाजाच्या नजरेस येतात. स्त्रीच्या शरीररात बदल होतात, प्रसंगी ती गरोदरही राहते, तिची मानसिक अवस्था बदलते, तिच्या वागण्या बोलण्यात कमालीचे फरक येतात. तिचं बदलत जाणं तिच्या आईच्या, बहिणीच्या वा घरातल्या अन्य स्त्रीच्या नजरेतून सुटत नाही. यातूनच तिच्यावर झालेला अत्याचार उघडकीस येतो. मग पीडित मुलगी आई-बहिणीजवळ आपलं मन मोकळं करते. हीच कथा सर्व वयाच्या स्त्रियांबद्दल लागू पडते. अगदी पाळण्यातल्या बालिकेवर जरी अत्याचार झाले तरी तिच्या मातेच्या नजरेस ते पडतेच. स्त्रीच्या शरीरधर्मामुळे आणि शरीररचनेमुळे तिच्यावर बळजबरी झाली तर बहुतांश करून त्याला वाचा ही फुटतेच. पण हीच गोष्ट पुरुषांच्या बाबतीत लागू पडत नाही. लहान बालके असोत वा तरुण-प्रौढ असोत त्यांना न्याय मिळण्याची, वाचा फुटण्याची शक्यता खूप कमी. कारण मुळात या घटनाच उघडकीस येत नाहीत. बालके, कुमार, तरुण आणि प्रौढ पुरुष यांच्यापैकी कुणाच्याही शोषणावर कितपत आवाज उठवला जातो किंवा त्यावर किती बोलले जाते; पीडित यावर व्यक्त होतात का यावर फारसे चिंतनही होत नाही. यावर चुकून कुणी काही लिहिलेच तर त्याला तितकी प्रसिद्धीही मिळत नाही किंबहुना ते वाचलेही जात नाही. सर्रास पुरुषांचे शोषण झाले की पिडीत पुरूष गप्पच बसतात. ते ओपन होत नाहीत. मनाच्या एका कप्प्यात ते क्षण दफन राहतात. त्यावर कुणाशीच बोललं जात नाही. बालपणी यातलं काही कळत नाही तर तारुण्यात भीती वाटते, प्रौढत्वात अपराधीपण दाटून येतं. त्यामानाने पिडीत मुलगी आई वा बहिण वा मैत्रिणीजवळ तरी कधी काळी व्यक्त होते पण पीडित पुरुष बहुतांश गप्प राहतो. याचे कारण पुरुषाच्या लैंगिक चौकटीत आहे. पुरुषाने कसं असलं पाहिजे किंवा कसं दिसलं पाहिजे, त्याचं सामाजिक-लैंगिक वर्तन कसे असले पाहिजे याचे काही पोलादी संकेत आपल्याकडे आहेत ज्याची कसोशीने जपणूक होते. एखाद्या पुरुषावर दुसऱ्या पुरुषाने बळजोरी केली या घटनेकडे समाज दोन नजरेने पाहतो. एक म्हणजे अत्याचार करणारा लिंगपिसाट असावा आणि दुसरा दृष्टीकोन म्हणजे जो पीडित आहे त्याच्यात काही तरी कमी आहे. हे अगदी ढोबळ निकष आहेत. समलिंगी होण्याची बहुतांश मुलांची पहिली पायरी लैंगिक शोषणाच्या रस्त्यातूनच निर्मिली जाते हे अनेक संशोधनातून पूर्वीच मांडले गेलं आहे. आपल्याकडे असे काही अभ्यास अहवाल बनत नाहीत कारण यावर खुलेपणाने किती पुरुष बोलतील हेच मुळात सांगता येत नाही. सगळा बंद काळोखातला मामला. शोषण करणारे नात्यातले असल्यावर तर मौन हाच चांगला मार्ग समजला जातो. ‘मी टू’ अभियान स्त्रियांनी राबवले आणि जगभरातील शोषित स्त्रियांनी आपल्या मनातली खदखद बाहेर आणली. पण पुरुषांचे ‘मी टू’ केव्हा होईल हे अनुत्तरीत आहे. 'द न्यूयॉर्कर' या प्रचंड खपाच्या अमेरिकन नियतकालिकात १६ एप्रिलला या विषयावर एक दीर्घलेख प्रकाशित झाला. ज्यावर अमेरिकन पुरुषांनी मोठ्या प्रमाणात आपल्या मनातील भावना मांडल्या आहेत. 'द सायलेन्स - द लिगसी ऑफ चाईल्डहूड ट्रॉमा' हे त्या लेखाचे शीर्षक आहे. ज्यूनॉट डियाज यांनी लिहिलेल्या या लेखाच्या उपशीर्षकात म्हटलं आहे की, 'मला कधीच कुणाची मदत मिळाली नाही, की कुठली थेरपी यावर घेता आली नाही. मी कधी कुणाला काहीच सांगितले नाही.' ही वाक्ये आणि लेखाचे शीर्षकच खूप काही सांगून जातं. या लेखात अनेक हृदयद्रावक प्रसंग आहेत, अनेकवेळा आपल्याला समाजाची किळस यावी अशा नोंदी आहेत. लेखकाने अत्यंत तटस्थतेने सर्व वर्णन केलं आहे. त्याला नाटकीपणाची झालर लागू दिलेली नाही. ड्रामाटायझेशन टाळताना घटनांची आर्तता आणि गांभीर्य याला कुठेही धक्का लागू दिलेला नाही. या पीडित मुलांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन कसा असतो, ही मुले घरी जाऊन आपल्या आईवडिलांशी का व्यक्त होत नाहीत, त्यांच्या मनावर कोणते दडपण असते, ते क्षण या मुलांच्या मनात कसे डागल्यासारखे राहतात, ही गोष्ट चुकून बाहेर पडली तरी मित्रांच्या पहिल्या रिॲक्शन्स कशा असतात, शाळेतील सहाध्यायी याकडे कसे पाहतात. ज्याने शोषण केलेलं असते त्याच्यासोबत आयुष्यात पुन्हा भेटीगाठी होताना कोणते विचार मनात येतात, स्त्रीसोबत सेक्स करण्याचा न्यूनगंड कसा निर्माण होत जातो, समलिंगीचा शिक्का बसण्याइतपत अन्य पुरुष कसे फायदे घेत राहतात, एका पुरुषाकडून दुसऱ्या पुरुषाला 'याच्या'वर ताकद आजमावता येते हे कळल्यावर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलतो, असेच तरुण ज्या वसतीगृहात राहत असतात तिथे गेल्यावर ती मुले कसा व्यवहार करतात, आपल्याप्रमाणेच शोषण झालेला तरुण गाठ पडल्यावर त्याच्याशी बोलताना सुरुवातील अपराधी वाटणे आणि नंतर मनातलं आकाश मोकळं होणे अशा अनेक गोष्टींवर या लेखात प्रकाश टाकलेला आहे. आपण कधी कुणाशी बोललो नाही याची लेखकाला खंत वाटत नाही पण त्याचा सल मात्र दाटून आहे. आपण यावर तेव्हाच बोललो असतो तर काय सोल्युशन निघाले असते, किती जणांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला असता, वैवाहिक जीवनावर त्याचा काय परिणाम झाला असता असा प्रतिप्रश्न यात आहे. समलिंगी बनण्याआधी ज्या ज्या मानसिकता तयार होतात त्यात मूकपणे सहन केलेले अत्याचार मोठा वाटा उचलतात हे लेखकाने पटवून दिलं आहे. अफगाणिस्तानात ‘बच्चा-बाजी’ नावाचा खेळ प्रचलित आहे. यात देखण्या किशोर वयीन मुलांना नृत्याचे आणि गायनाचे धडे दिले जातात. नंतर विविध मैफलीत त्यांना 'पेश' केलं जातं. मग लोक त्याच्यावर बोली लावतात. त्याच्याशी सेक्सुअल रिलेशन्स ठेवतात. बऱ्याचवेळा ही मुलं विकली जातात, त्यांचे सौदे होतात. कधी कधी या मुलांकडे त्यांचे पालक कमाईचे साधन म्हणून पाहतात. किशोरावस्थेपासून ते तारुण्य ओसरेपर्यंत या मुलांना नासवले जाते. या पुरुषांच्या आयुष्यात यानंतर उरतो तो केवळ आणि केवळ कभिन्न काळोख! अशाच प्रथा काही आफ्रिकन देशातही आहेत. पुरुषांना पुरुषांशी समागम करता यावा याचा गुलामप्रथेत खूप कोलाहल झाला. आपल्याकडील अनेक लेण्यात, चित्रात आणि ऐतिहासिक साधनांत देखील याचे दाखले मिळतात. रोमन संस्कृतीत तर याला अधिमान्यता होती. म्हणजेच या घटना पूर्वापार चालत आल्यात पण त्यावरचा आक्रोश कुठेच नाही. आपल्याकडे मागे आमीरखानच्या 'सत्यमेव जयते'मध्ये मुलांच्या लैंगिक शोषणावर एक कार्यक्रम झाला होता त्यावर काहींनी आपले शोषण झाल्याचे सांगितले आणि तो विषय तिथेच निपटला होता. पण गुन्हे स्वरुपात त्याची देशव्यापी चर्चा कधी झालीच नाही. अशा प्रकारचे मंथन कधी होईल का? पुरुषांनीच पुरुषांचे मुकाटपणे चालवलेलं शोषण कधी चार भिंतींच्या बाहेर येईल का? यावर लोक खुलेपणाने भाष्य करू लागले तर समाज त्यांच्याकडे बाधित नजरेने बघेल की एका जेन्युईन समस्येच्या भूमिकेतून बघेल? पुरुष खुलून समोर येतील का? पुरुषांच्या लैंगिक अत्याचारावरील मिठाची गुळणी आपण थुंकू शकू का? सरते शेवटी असेही विचारावे वाटते की काहींनी आपली ओळख उघड करून यावर खुली मते मांडली तर त्या दोषींच्याविषयी त्यांचे नातलग, मित्र आणि समाज कोणती भूमिका घेणार? हे प्रश्न वाटतात तितके सोपे नाहीत. आपल्याकडील तथाकथित संस्कारी चित्रामागचे हे गर्दकाळे चित्र बेचैन करणारे आहे ज्यावर न जाणो कित्येक वर्षांच्या कालखंडापासून पुरुष मौन राहिला आहे! तुम्हाला काय वाटते? यावर बोलले जावे की न बोलावे? पुरुषांचे ‘मी टू’अभियान प्रत्यक्षात यावे की नको? यावर विचार करताना असेही वाटते की एखाद्या स्त्रीवर जेंव्हा बलात्कार होतो तेंव्हा समाज म्हणतो की तिचे शील लुटले गेले, तिची अब्रू गेली, तिच्या आयुष्यातील सर्वस्व लुटले गेले! खरेच स्त्रीचे सर्वस्व तिच्या अब्रूत, तिच्या शीलात, तिच्या योनीत आहे का; तिचे कर्तृत्व गौण आहे का? बलात्कारित स्त्रीला आयुष्यात पुन्हा कधीच नावलौकिक प्राप्त होत नाही का? मग हाच न्याय एखाद्या पुरुषावर बळजोरी झाल्यावर का लावला जात नाही याचे उत्तर याच समीकरणात आहे. पुरुषावर बळजोरी झाल्याने त्याचे शील वा अब्रू लुटली जात नाही, त्याचे सर्वस्व लुटले जात नाही. कारण कर्तृत्व हे पुरुषाचे खरे लक्षण आहे. असे असेल तर मग गोपाल मालोने आत्महत्या का केली ? - समीर गायकवाड
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवादABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
Embed widget