BJP Kolhapur: विधानसभा जिंकल्यानंतर भाजपची 'शत-प्रतिशत'ची तयारी; महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत
Maharashtra Politics: वर्षा बंगल्यावर कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांची शिंग पुरण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य चर्चेत

कोल्हापूर: राज्य सरकारवर कोणी कितीही काळी जादू करु दे. भाजपकडे तब्बल 137 आमदार आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षे सरकार मजबूत राहील, असे वक्तव्य भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. ते रविवारी भाजपच्या (BJP) पश्चिम महाराष्ट्रातील संघटन पर्व कार्यशाळेत बोलत होते. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काळी जादू (Black Magic) करण्यात आल्याचा आरोप केला होता. वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत. जो कोणी दुसरा मुख्यमंत्री येईल, त्याचं मुख्यमंत्रिपद टिकू नये, यासाठी ही काळी जादू करण्यात आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की, मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो तरी रात्री झोपायला जाणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपला कोणी कितीही काळू जादू केली तरी फरक पडत नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सुचित केले आहे.
'दैनिक लोकमत'च्या वृत्तानुसार, भाजपच्या कोल्हापूरमधील या कार्यशाळेला चंद्रकांत पाटील, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी भाजपकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. राज्यातील सर्व जिल्हा परिषदा आणि महापालिकांमध्ये भाजपची सत्ता यायला हवी, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. पुढील 15 वर्षे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत राहण्यासाठी सर्व जिल्हा परिषदा, महापालिका , नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये भाजपची सत्ता येण्यासाठी राज्यात 1 कोटी 51 लाख सदस्य असणे आवश्यक आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 16 लाख इतकी सदस्य नोंदणी झाली आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचे 2 कोटी 20 लाख तर मोफत वीजेच्या 40 लाख कृषी पंपधारकांना भाजपचे सभासद करुन घ्या, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले.
राज्यात भाजपचे अधिकाअधिक सदस्य झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 13 हजार जणांना भाजपकडून उमेदवारी दिली जाईल. राज्यातील सर्व 36 जिल्हा परिषद आणि 27 महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
महायुतीने एकत्र निवडणुका लढावण्यावर ठाम; शिंदे गटाच्या नेत्याची भूमिका
राज्यात सत्तास्थापनेपासूनच महायुतीत आलबेल नाही हे वारंवार घडणाऱ्या घडामोडींवरून दिसून येतंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती आहे. भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादांच्या फेऱ्यानंतर स्वबळाचा नारा दिला जातोय का असा सवाल उपस्थित झालाय. तर दुसरीकडे आगामी निवडणुका महायुतीत लढण्याच्या मनस्थितीत आम्ही आहोत आणि असं झालं नाही तर परिणाम वाईट होतील, अशी प्रतिक्रिया शिवेसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकांना अजून बराच अवधी असून याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात होणार आहे . त्यामुळे स्वबळाबाबत महायुतीतील कोणत्याच नेत्यांनी वक्तव्य करू नये अशा मताचा मी आहे . पण वक्तव्य करणारे नेते एवढे मोठे आहेत की त्यांना मी काय सल्ला देऊ? असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. महापालिका निवडणुकात प्रत्येक ठिकाणचे चित्र आणि स्थिती वेगळी आहे त्यामुळे त्या त्यावेळी याबाबतचा निर्णय होईल. सध्या तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच या प्रक्रियेला सुरुवात होईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
