एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेड लाईट डायरीज : रेड लाईट एरियातलं न्यू इअर सेलिब्रेशन...
सुरुवातीला तिने त्याच्याशी 'रात गयी बात गयी' इतकाच संबंध ठेवला होता. मात्र त्याचं वरचेवर येणं होऊ लागलं तेंव्हा तिने जोखलं होतं की याचं ‘येणं’ वेगळं आहे तसलं टिपिकल नाही. मग ती दरखेपेस त्याला चार गोष्टी सांगू लागली.
न्यू इअरच्या रात्रीस सादिक गेली दहा ते बारा वर्षे न चुकता कामाठीपुऱ्यातल्या चौदाव्या लेनमधील नगमाकडे येतो. त्याचे प्रेम आहे तिच्यावर. त्याला निकाह लावायचा आहे. पण त्याच्याकडे आधी पक्की नोकरी नव्हती, किरायाची खोली एकच होती ती देखील लहान बारा बाय पंधराची. तीस लोकांत एक कॉमन संडास बाथरूम. तो कावाखान्याजवळच्या गल्लीत राहायचा. नगमाला पहिल्यांदा भेटला तेंव्हा त्याचं वय असावं सतरा वर्षांचं आणि ती असावी पंचवीसच्या आसपासची. दोघात वयाचं बरंच अंतर होतं पण त्यांना एकमेकाच्या भावना चांगल्या समजत. आधीची दोन तीन वर्षे तर तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं. कारण प्रेमाचं ढोंग करून विदाऊट सेफ्टी म्हणजे कंडोमशिवाय रात्र काढून पोटात बीज रोवून जाणारे अनेक महाभाग तिथल्या गल्लोगल्लीत तिने पाहिले होते. पोर जन्मास घालेपर्यंत गोडगोड बोलणारे पोराचा जन्म झाल्यावर कसे रंग बदलतात हेही तिला ठाऊक होते. एकदा का पोर जन्मले की ती बाई धंद्यासाठी अक्षरशः लुळी होते. त्या पोराची चिंता तिला खाऊ लागते आणि त्यातून हा माणूस आधाराचे ढोंग करून तिच्यावरच जगू लागतो. अशा अनेक अमरवेली तिने पाहिल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीला तिने त्याच्याशी 'रात गयी बात गयी' इतकाच संबंध ठेवला होता. मात्र त्याचं वरचेवर येणं होऊ लागलं तेंव्हा तिने जोखलं होतं की याचं ‘येणं’ वेगळं आहे तसलं टिपिकल नाही. मग ती दरखेपेस त्याला चार गोष्टी सांगू लागली. दुनियादारी शिकवू लागली. सादिक आदिलाबादचा. तो पैदाईशी यतीम नव्हता पण रोज उठून बापाचा हात अंगी पडू लागल्यावर मुंबईला पळून आलेला. तेंव्हा त्याचं वय असावं चौदाच्या आसपास. त्याच्या शहरातला परिचित मित्र असलेल्या उस्मान सोबत एका बेकरीत तो कामाला लागला होता. त्याच्याच खोलीत तो राहायचा, झोपायचा. उस्मानच्या कोर्ट खटल्याचा निकाल लागला, त्याचा जमीन जुमला त्याला परत मिळाला तेंव्हा ती खोली सादिकच्या भरवशावर टाकून तो त्याच्या गावी निघून गेलेला. त्या दिवसापासून तो आजतागायत क्वचित मुंबईला येतो. सुरुवातीस त्याने काही महिने सादिक कडून किराया घेतला पण पुढेपुढे त्याला लहान भावाप्रमाणे समजले. त्यालाही गावाकडे परत येण्यास विनवून पाहिले. त्याच्या हातासाठी कामाची तजवीज करण्याचं कबूल केलं. पण सादिकला आपल्या मुलुखात जायचंच नव्हतं. तो मुंबईच्या गर्दीत आपलं दुःख विसरू इच्छित होता. एका न्यू इअरच्या रात्रीस बेकरीतल्या दुसऱ्या एका कामगाराबरोबर तो पहिल्यांदा कामाठीपुऱ्यात आला तेंव्हा त्याला भीती वाटत होती. मित्र ज्या खोलीत निघून गेला त्याच्याशेजारील खोलीबाहेर उभ्या असलेल्या नगमाकडे तो चुंबकासारखा खेचला गेला होता. तिने आपलं नेहमीच्या खाणाखुणा करून त्याला गळाला लावला होता. सादिकचा पहिल्यांदाच एखाद्या स्त्रीशी शरीरसंबंध झाला. त्या नंतर मात्र तो वारंवार जाऊ लागला. त्याला सगळीकडे नगमाचा भास होऊ लागला. तिच्याशिवाय काहीच सुचेनासे झाले. हातात थोडेफार पैसे पडले की तो नगमाकडे धाव घेई. सुरुवातीला त्याला वाटले की तिचेही आपल्यावर प्रेम आहे. क्वचित प्रसंगी पैसे न देता तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न त्याने केला तेंव्हा तिचा बदललेला नूर त्याला खूप काही सांगून गेला. मग गाठीशी पैसे नसले तरी तो अधूनमधून यायचा आणि तिला नुसताच बघून भेटून बोलून जायचा. कधी कधी कागदात काहीतरी चीजवस्तू बांधून आणायचा आणि तिला खायला द्यायचा. एका ईदला त्याने बऱ्यापैकी महाग साडी तिला आणून दिली. त्या दिवशी नगमा ढसाढसा रडली तेंव्हा त्याला लक्षात आले की आपण जिंकलो. कामाठीपुऱ्यातल्या बायकांनी जितकी दुनियादारी बघितलेली असते तितकी क्वचित कुणा पांढरपेशा स्त्रीच्या वाटेस येते. त्यांचे दुःख वेदना जितक्या गहिऱ्या असतात तितक्याच त्या व्यवहारी आणि निष्ठुरही असतात. नगमाला आलेल्या आधीच्या अनुभवावरून सादिकची पारख करण्यास तिला दोन अडीच वर्षे लागली. त्या नंतर मात्र ते एकमेकाच्या अधिक जवळ आले. सादिकचे आपल्या एकटीशी संबंध आहेत या जाणिवेचं तिच्यासाठी जणू मोरपीसच झालं होतं. आपल्यावर मनापासून प्रेम करणारा आपल्याहून देखणा आणि तरुण पुरुष आहे ही भावना तिला तृप्त करून गेली. त्या दिवसानंतर सादिक तिच्याजवळ निकाहसाठी टुमणे लावत होता. पण त्याला तिनं जग दाखवलं. लोकांची नियत समजून सांगितली. वेश्येशी निकाह केला तर त्याचा धर्म काय म्हणेल याची कल्पना दिली. काम सुटू शकते याची कल्पना दिली. ज्या गल्लीत ज्या चाळीत तो राहतो तिथल्या लोकांना नगमाची असलियत समजली तर त्याच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन कसा बदलेल याचे अनेक किस्से ऐकवले. काही लोकांना भेटवलं देखील. घराकडे कळलं तर घरचे लोक सुखाने जगू देणार नाहीत याची भीती घातली. निकाहनंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि अडचणींचा पाढा वाचून दाखवला. होणाऱ्या औलादला कधी ना कधी भूतकाळ सांगावा लागेल तेंव्हा त्याला आपल्या आईबद्दल काय वाटेल, ते अपत्य आपल्या आईला समजून घेईल का ? तिची सच्चाई लोकांपासून कितीजरी लपवली तरी सच के पांव होते है या उक्तीप्रमाणे कधी न कधी तिचे बिंग फुटणार हे नक्कीच होणार आणि तो कामासाठी बाहेर गेल्यावर आजूबाजूच्या लोकांना तिच्याशी अंगचटीस जावे वाटले तर त्याला ते रुचेल काय ? असे एक ना अनेक प्रश्न त्याला विचारून, त्याची आवश्यक ती मानसिक तयारी करून झाल्यावर आता २०१८ मध्ये सादिक आणि नगमा निकाह करणार आहेत. कालच्या रात्री सादिक तिच्याकडे आला होता की नाही हे अजून पक्के माहिती झाले नाही. पण आठवडयापूर्वीच नगमाशी बोलणं झालं तेंव्हा तिने ही खुशखबर सुनवली होती. यंदाची न्यू इअरची पहाट ही त्यांच्यासाठी कामाठीपुऱ्यातली अखेरची नववर्षाची पहाट ठरेल असा विश्वास तिने व्यक्त केला होता. सादिकने मागील काही वर्षात पैसे साठवले, त्याच्यात नगमानेही भर टाकलीय. ग्रांटरोडपासून दूर वरसोव्यात कोळीवाडयात त्यांनी नवी खोली पक्की करून तिच्या एका मैत्रिणीच्या ओळखीतून त्याच्यासाठी नवं काम दिलं होतं. त्याच्या या मालकाची बायकोही पूर्वाश्रमीची सेक्सवर्कर आहे. त्यामुळे त्याने नगमाच्या मैत्रिणीला शब्द दिलेला की तो सादिकला रक्ताच्या भावासारखा बघेन. आता सगळं मनासारखं जुळून आल्यामुळे सादिक आणि नगमाचा निकाह पक्का आहे. न्यू इअरच्या रात्रीपासून सुरु झालेला हा सिलसिला न्यू इअरलाच संपला असेल अशी माझी खात्री आहे. अशा अनेक नगमा या दलदलीत रुतल्या आहेत पण असे सादिक हाताच्या बोटावर मोजण्याइतके देखील नाहीत. काही मुले असेच प्रेम करतात पण सगळ्यांचाच शेवट असा गोड होत नाही. तर काही मुलं या मुलींना यातून बाहेर काढण्यात यशस्वी झाली तरी त्यांना लग्नाहून अधिक काही केल्याचं समाधान लाभतं. अशा तृप्ततेचे जेंव्हा फोन येतात तेंव्हा आयुष्य सार्थकी लागल्यासारखे वाटते. असो... रेड लाईट एरियासाठी न्यू इअरची रात्र ही कमाईची रात्र असते हे नक्की.
सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी दुपारचे ऊन उतरू लागल्याबरोबर बायका पोरींचा हा कल्ला उठलेला असतो. ‘आज कमाईला बरकत येणार’ याच्या आनंदरेषा प्रत्येकीच्या चेहऱ्यावर फुललेल्या असतात. प्रत्येक अड्ड्यावर लगबग सुरु झालेली असते. तरण्या ताठ्या पोरींनी तर खच्चून कमाईचा निर्धार करतात. पंचविशी पार करून गेलेल्या बायकांना आजच्या दिवस रात्रीच्या बऱ्यापैकी खाचाखोचा माहिती असलेल्या बायकांत उत्सुकतेचा अभाव जाणवतो. तर एकदम थोराड बायकांना जणू हा रोजचाच दिवस असल्यागत. विटाळ निघून गेलेल्या केसांची चांदी होऊ लागलेल्यांना मात्र यात जराही स्वारस्य नसते. वयाने एकदम लहान असलेल्या चिल्लर पोरी ठोरी मात्र अगदी हरिणीगत भेदरून जातात. नवीन वर्ष येणार म्हणजे आपलं नेमकं काय होणार आणि कसं होणार यांचं भलं मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्या तोंडावर झळकू लागतं. रेड लाईट एरिया कुठल्याही शहरातला असो ही भावना कॉमन आढळते. यात क्वचित थोडाफार फरक येतो.
आजकाल दारू पिल्याशिवाय, पार्टी केल्याशिवाय अनेकांचे नवे वर्ष साजरे होत नाही. मुलांप्रमाणेच आता मुलीही बोल्ड होत चालल्याचे दृश्य आता मोठ्या शहरात सर्रास दिसू लागलेय. बॅचलर मुलांच्या न्यू इअर पार्टीचे रंग वेगळे असतात, नवविवाहितांच्या पार्टीचे त्याहून वेगळे असतात आणि लग्नाला अनेक वर्षे होऊन गेलेल्या लोकांच्या नववर्ष सेलिब्रेशनला वेगळेच रंग असतात. शक्य तो दोस्तांसोबत पार्टी करण्याकडे सर्वांचा कल असतो. काही लोक फॅमिली सेलिब्रेशनही करतात पण त्यांचे प्रमाण कमी आहे. तर काही जण घरीच आपल्या कुटुंबासमवेत ही रात्र शेअर करतात. तर काही जण या रात्रीला विशेष महत्व न देता तिच्याकडे दुर्लक्ष करतात. पार्टी देताना आपल्या मर्जीतल्या लोकांची खातीरदारी करण्यासाठी नवीन वर्षाच्या स्वागताचा दिवस हे एक उत्तम निमित्त झाले आहे. अनेक लोक आपली कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना, वरिष्ठांना, कार्यालयीन सहकारयांना या दिवशी पार्टी देतात. सुरुवातीला दारू सिगारेट आणि खानपान सेवेसाठी मर्यादित असणारी ही पार्टी आता बेड पार्टीपर्यंत गेलीय आणि तिथून सुरु झालाय नव्या वर्षासाठी मुली पुरवण्याचा खेळ. साधारणपणे पार्टी आणि तिचे स्थळ पक्के झाले की त्यात येणार खासे मेहमान फिक्स होतात. मग त्यांच्या 'आवडी निवडी'नुसार आणि सेक्सच्या ‘सवयी’नुसार त्यांना स्कीन करन्सी सप्लाय केली जाते. यासाठी एस्कॉर्ट एजन्सीज वा थेट दलालांनाच गाठले जाते. काही बिनधास्त माणसं थेट आपल्या नजरेनेच 'आयटम' फायनल करून जातात. निरोप दिलेल्या ठिकाणी मुलगी पोहोच होते. एकेका मुलीला कधी कधी दहा बारा जणांना खुश करण्याची भयानक वेळही येते तर क्वचित कधी एखादाच इसम असाही गाठ पडतो की रात्रभर तिच्या अंगालाही हात न लावता तिच्या सोबत रात्र शेअर करतो ! यातल्या बहुसंख्य प्रसंगात रात्र संपताच पहाटेच्या सुमारास उठून लोक आपआपल्या घरी निघून जातात. त्या मुलीला तिथंच विव्हळत सोडून ! तिचा दलाल जर तिथंच बाहेर थांबलेला असेल तर तीही परत जाते पण असं खचितच होतं. सगळे घरी पोहोचून बायकोच्या पुढ्यात आलेले असतात आणि पार्टीच्या 'गुप्त' ठिकाणी यांचे वेदनांकित देह तसेच पडून असतात. कारण त्यांना घर नसते ! कुंटणखाना कधी कुणाचं घर नसतं, ते असतं एक छप्पर, एक जगण्याचा आधार आणि दुनियेचं हिडीस किळसवाणं बीभत्स स्वरूप दाखवणारा आरसा !
या बायकांनाही आपल्याकडे येणाऱ्या लोकांचे काही घेणे देणे नसते ते अशा कमालीच्या रुक्ष आणि निर्दयी व्यवहारामुळेच. त्या एक रुपया सोडत नाहीत. मात्र देहभोगाची रात्र सुरु असताना त्या एखाद्या बेजान कलेवरासारख्या पडून असतात. पाय पसरून अन हात उकिडवे टाकून ! त्यांच्या देहाशी लोक हवे तसे खेळून जातात त्यामुळे यांना स्वतःच्या देहाची अन इंद्रियांची इतकी किळस वाटू लागते की पुढे जाऊन त्यांना याविषयी कोणत्याच जाणीवा आणि इच्छा उरत नाहीत. हा एक दैनंदिन रुक्ष व्यवहार होऊन जातो. त्यात न कुठल्या भावना नि कुठली ओढ न वासना ना आवेग ना जोश ना आस्था ! केवळ व्यवहार असतो तो.
नव्या वर्षाला कुंटणखान्यावर येणारं गिऱ्हाईक मात्र सर्रास भयंकर जालीम असतं असं सरत्या आठ दहा वर्षातला अनुभव आहे. बहुत करून लोक अय्याशीसाठी आलेले असतात. दारू ढोसून आले की यांचे ‘काम’ लवकर होत नाही आणि बायकांच्या धंद्याच्या टाईमची खोटी होते. काहींनी तर इतकी पिलेली असते की त्यांना त्यांचे कपडे काढणे घालणे देखील शक्य होत नाही पण वेळप्रसंगी ते पुढ्यात बसलेल्या अश्राप बाईवर मात्र हात उचलतात. सेक्सवर्कर्सकडे येणारे काही फिक्स्ड कस्टमर असतात त्यांना मात्र या दिवशी विशेष सवलत मिळत नाही कारण ती नेहमीची माणसं असल्याने त्यांना फारसा वेळ दिला जात नाही. त्यांना बहुत करून तिष्टत बसावं लागतं नाहीतर रात्र सरत आल्यावर आणि पलंग रिकामा झाल्यावरच तिच्याजवळ जाता येतं. तोवर तिच्या देहाची लक्तरं झालेली असतात, ती पुरती विझेलेली असते. तिच्यातल्या चेतनेला जागृत करण्यासाठी मग मदिरेपासून नानाविध प्रयोग तो करत राहतो पण ती काही केल्या पेटत नाही. मग ते दोघे तसेच पडून राहतात. जड अंगाने नव्या वर्षाची सकाळ तिच्या मळकटलेल्या विटलेल्या खोलीत येते, तिला काही केल्या लवकर जाग येत नाही. भोवतालच्या कालव्याने त्याला मात्र जाग येते. तिच्या उशाशी जास्तीचे पैसे ठेवून तो निघून जातो. या सर्व व्यवहारात आधी पैसे चुकते केलेले असल्याने काही ठिकाणी प्रसंग उलटाही असतो. कमी पैसे देणाऱ्या, अति दारू ढोसून येणाऱ्या, नको त्या गोष्टीचा आग्रह करणाऱ्या, अंगचटीला जाऊन ‘हात साफ’ करून झाल्यावर पुढच्या गोष्टीस नकार देणाऱ्या पुरुषांना काही बायका जाम बुकलून काढतात. ही ठोकेबाजी करणारी पोरगी अड्डेवालीची खास होऊन जाते. हिच्यातले गटस तिला आवडतात, आपला वारसा टिकून राहण्यासाठी तिला अशा एकदोन खमक्या पोरींची भारी गरज असते.
चाईल्ड सेक्स वर्कर्स मुलींचे या दिवशीचे हाल कल्पने पलीकडचे असतात. या मुलींकडे येणारे कस्टमर ठराविक मानसिकतेचे असतात. ओव्हर सेक्स केल्यामुळे आधी तरुणी, मग प्रौढ, नंतर वय झालेली स्त्री भोगून झाल्यावर भावना उद्दीपित होणं बंद झाल्यावर ते इवल्याशा मुलीत सेक्स शोधू लागतात. सेक्सची भूक भागवण्यासाठी ते कुठल्याही स्तराला जातात. अलीकडील काळात याचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे खूप कमी वयापासून पॉर्न पहिल्याने सेक्सची कामेच्छा कमी होणे हे होय. मागील काही वर्षात सर्वच रेड लाईट एरियात नवा विकृत छळवाद जन्माला आलाय तो म्हणजे 'त्या' दृश्याचे त्याला मोबाईलमध्ये चित्रीकरण करून हवे असते. मग कधी गोड बोलून तर कधी पैशाचे आमिष दाखवून तर कधी जबरदस्तीने तर कधी लपून छपून हे पुण्यकर्म पार पाडले जाते. ते इंटरनेटवर टाकून इतर आंबटशौकीनांना त्याचे 'लुत्फ' उठवण्याची गमजा उपलब्ध केली जाते. याच्या भरीस भर म्हणजे पॉर्न पाहून पाहून विकृत झालेल्यांना त्यात बघितल्याप्रमाणे अनैसर्गिक शारीरिक भोग घेण्याची उर्मी मोठ्या प्रमाणात उफाळून येत्येय. या सर्व षडाष्टकात नव्या वर्षाच्या पहिल्या रात्री दरवर्षी राक्षसी भर पडते आहे.
जग नव्या वर्षी नव्या संकल्पना राबवण्याच्या मूडमध्ये नव्या उमेदीने पाहिल्या दिवसाचे स्वागत करत असते तेंव्हा रेड लाईट एरियातील थकले भागलेले जीव रात्रभरच्या वेदनांनी विव्हळत कण्हत कुथत पडलेले असतात. या बायकाही आता भरपूर नशापाणी करू लागल्यात, जाग आल्यावर आपल्या पद्धतीने त्याही नव्या वर्षाचा आनंद घेऊ पाहतात. दिवसा पार्टी करतात आणि रात्र होताच दिवसभराच्या आनंदाची वीण उसवण्यासाठी आपली वस्त्रे उतरवतात. नियती मोठी क्रूर असते. या बायकांचे नवे वर्ष वेदनांनी सुरु होते आणि संपते देखील वेदनांनीच. अर्थात यात बदल होतील असं म्हणणे म्हणजे दिवास्वप्न पाहण्यासारखं आहे. किमान नगमा आणि सादिकसारखे हॅपी एंडिंग त्यांच्या वाट्याला यावे इतकी अपेक्षा ठेवावी म्हटली तरी अशी माणसं आणायची कुठून हा यक्षप्रश्न उरतोच !
संबंधित ब्लॉग :
रेड लाईट डायरीज : पोलिस, प्रशासन आणि कुंटणखाने (उत्तरार्ध)
रेड लाईट डायरीज : पोलिस, प्रशासन आणि कुंटणखाने पवित्र ... रेड लाईट डायरीज : आज्जी आणि चाईल्ड सेक्स वर्कर्स.... रेड लाईट डायरीज : रंगरुपाचे रेड-लाईट लॉजिक... रेड लाईट डायरीज : रेड लाईट एरियातली नोटाबंदी रेड लाईट डायरीज : वेश्येतले मातृत्व …… इंदिराजी …. काही आठवणी … रेड लाईट डायरीज : गिरिजाबाई ….. रेड लाईट डायरीज : सेक्सवर्कर्सचे रॅकेट – 2 ‘रॅकेट’ रेडलाईट एरियाचे… नवरात्रीची साडी… रेड लाईट डायरीज – शांतव्वा…. रेड लाईट डायरीज – ‘धाड’! गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध) गणेशोत्सवातल्या आम्ही… (पूर्वार्ध) उतराई ऋणाची… स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव… गीता दत्त – शापित स्वरागिनी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement