'अपूर्वाई'च्या झऱ्यात खळखळ वाहणारा 'व्यक्ती'; 'पु.ल देशपांडे' एक हास्य मैफल
Purushottam Laxman Deshpande : महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांची यादी तशी फार मोठी. म्हणजे अगदी बालगंधर्वांपासून ते पु.ल देशपांडे, अचार्य अत्रे अशी बरीच मंडळी या यादीत समाविष्ट आहे. त्यातलाच पु.ल.देशपांडे, अत्रे यांचा काळ मराठी रसिक प्रेक्षकांच्या विशेष आवडीचा. असं म्हणतात की, रडवणं सोप्पं असतं पण हसवणं तितकचं कठीण असतं. पण पु.लंच्या भाषणाने आजही तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंतचा वर्ग खळखळून हसतो, हीच काय ती त्या हास्य मैफीलीची पोच पावती. कलेचा वारसा लाभलेल्या याच महाराष्ट्र पु.लं देशपांडेंसारखं एक व्यक्तिमत्त्व जन्माला यावं आणि अवघ्या महाराष्ट्राच्या कायम स्मरणात रहावं यासाठी पु.ल. देशपांडेंच व्हावं लागतं, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.
नागपूर, मुंबई, पुणे सारख्या शहरी लोकांवर केलेली मिश्किल टीप्पणी असो किंवा अगदी आडनावरुनही केलेली गंमतीशीर कानटोचणी, या सगळ्यामुळे आज अभिमानाने सांगतो की, आताच्या स्टँडअप कॉमेडीचे जन्मदाते हे आमचे पु.ल देशपांडेच आहेत. नाटक, सिनेमा,पुस्तकं अशा अनेक माध्यांमधून पु.लंमुळे एक वेगळा रसिक आणि वाचक वर्ग तयार झाला. ज्या वर्गाने पु.ल देशपांडे या व्यक्तीवरच नाही तर त्याच्या लेखणीवरही अगदी निस्वार्थ प्रेम केलं.
बटाट्याची चाळ, अपूर्वाई, व्यक्ती आणि वल्ली, गाठोडं, आपुलकी, असा मी असामी अशा अनेक पुस्तकांचा खजिना या अवलियाने दिला. म्हणूनच अगदी समान्य वर्गालाही पु.ल जास्त भावले. बटाट्याच्या चाळीतून त्यांनी सांगितलेली चाळीची गोष्ट असो अपूर्वाईच्या कथा असो किंवा अनुभवाचं गाठोडं असो, या प्रत्येक खजिन्यातून पु.लं आणि आयुष्य अगदी वेगवेगळ्या पद्धतीने गवसलं. व्यक्ती आणि वल्ली मधून भेटलेली सखाराम गटणे, नामू परिट, नारायण, अंतू बर्वा, हरितात्या, नंदा प्रधान, लखू रिसबूड, अण्णा वडगावकर, चितळे मास्तर ही पात्रं तर प्रत्येकाला आपल्या घरातलीच वाटलीत.
स्वच्छ लिखाण, साधी भाषा, आयुष्याची गोष्ट, सामान्यांच्या व्यथा अन् अनुभवांच्या कथा अशा अनेक गोष्टी पु.लंनी अगदी सहज साधल्या आणि कागदावर लिहिल्या देखील. 'अंमलदार','गुळाचा गणपति','घरधनी','चोखामेळा', दूधभात', 'देव पावला', 'देवबाप्पा', 'नवराबायको', 'नवे बिऱ्हाड', 'मानाचे पान' आणि 'मोठी माणसे' अशा सलग अकरा सिनेमांचं संगीत दिग्दर्शन करणाऱ्या या विनोदी लेखकाने संगीताच्या सूरांची देखील अविरत सेवा केला.
, ‘ती फुलराणी’, ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘तुका म्हणे आता’, ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकांच्या माध्यमातून रंगदेवतेलाही विनम्र अभिवादन त्यांनी केलं. खरंतर नाटक, सिनेमा, साहित्य यांमधून लेखक, दिग्दर्शक, विनोदी लेखक, संगीत दिग्दर्शक, अभिनेता अशा चौफेर भूमिका साकारणारा कलाकार मराठीत जन्माला आला, ही मराठी सिनेसृष्टीची आणि मराठी रसिकांची पुण्याईच म्हणावी लागेल. म्हणूनच 'अपूर्वाई'च्या झऱ्यातून खळखळ वाहणारा 'व्यक्ती', 'आपुलकी'च्या 'गाठोड्या'त अनुभवांचा साठा ठेवून 'असाच मी' म्हणणारे पु.लं देशपांडे ही हास्य मैफल आमच्यासाठी आजही स्पेशलच...