G20 Summit : कशी आहे महासत्ता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा?
G20 Summit : दिल्ली सज्ज आहे, पाहुण्यांची वाट पाहत आहे... सगळ्या जगाच्या नजरा सध्या भारतावर आहेत. कारण 9 आणि 10 सप्टेंबर म्हणजे उद्या आणि परवा असे दोन दिवसं दिल्लीत G20 शिखर परिषद होणार आहे. जगातील अनेक देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान भारतीय भूमीवर एकाचवेळी उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ. भारताने आपल्या पाहुण्यांच्या स्वागताची पूर्ण तयारी केली आहे.
पण या सगळ्यात सर्वांच्या नजरा महासत्ता अमेरिकेवर खिळल्या आहेत. थोड्याच वेळापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचं एअरफोर्स वन विमान दिल्लीत दाखल झालं आहे. जी-२० च्या बैठकीआधी आजच बायडन आणि मोदी यांची भेट आणि चर्चाही झाली.
जगाच्या नजरा अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांवर खिळल्या आहेत कारण या दोन देशामध्ये एकत्रितपणे जगाची राजकीय समीकरणे घडवण्याची किंवा बिघडवण्याची ताकद आहे. तुम्ही म्हणाल की ब्रिटनपासून फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियापर्यंत सगळेच G-20 मध्ये सहभागी होत आहेत, मग अमेरिकेची वेगळी चर्चा का? त्याचं कारण आहे जो बायडन एक दिवस आधीच भारतात दाखल होत आहेत. दोन्ही देशांनी परस्पर हितसंबंधांवर चर्चाही केली. दोन्ही देशांना पुढे घेऊन जाणारे निर्णयही घेतले जातील अशी अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतात येत आहेत. ते भारताला भेट देणारे अमेरिकेचे आठवे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यामुळे दिल्लीचे रूपांतर अभेद्य किल्ल्यामध्ये झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या विमानाने दिल्लीला पोहोचले आहेत, त्याचे नाव एअर फोर्स वन आहे. तर दिल्लीत दोन दिवस त्यांचं सुरक्षा कवच बनलेल्या गाडीचं नाव आहे द बीस्ट..
भारत दौऱ्यापूर्वी जो बायडन आणि त्यांची पत्नी जिल बायडन यांची कोरोना चाचणी झाली. फर्स्ट लेडी जिल बायडन यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यामुळे त्यांना भारत दौरा रद्द करावा लागला. सर्व जागतिक नेत्यांच्या मुक्कामासाठी दिल्लीत जवळपास 25 हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या मुक्कामाची व्यवस्था आयटीसी मौर्य शेरेटन येथे करण्यात आली आहे.
बायडन आयटीसी मौर्यच्या चौदाव्या मजल्यावरील चाणक्य या सर्वात महागड्या सूटमध्ये राहणार आहेत. त्याचे एका दिवसाचे भाडे सुमारे 8 लाख रुपये आहे. जो बायडन यांच्या स्टाफसाठी हॉटेलमध्ये 400 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत.
या आधी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जेव्हा भारतात आले होते तेव्हा ते सुद्धा आयटीसी मौर्यच्या सूटमध्येच उतरले होते.
बायडनच्या भारतात येण्याच्या एक आठवडा आधी, अमेरिकन गुप्तचर संस्था CIA चे एजंट भारतात पोहोचले होते. हॉटेलच्या प्रत्येक मजल्यावर सीक्रेट सर्व्हिस कमांडो तैनात असतील. इतकंच नाही तर बायडेनसाठी हॉटेलमध्ये खास लिफ्टची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.
अशीच बडदास्त सर्व राष्ट्रप्रमुखांची ठेवली जात आहे. अशा जी-20 चं अध्यक्षपद भूषवण्याची संधी दरवर्षी सदस्य देशांना रोटेशनने दिलं जातं. गेल्या वर्षी इंडोनेशियाकडे होते, पुढच्या वर्षी यजमानपद ब्राझीलकडे असेल. आधीच्या वर्षी जिथे जी-20 पार पडली तो देश, या वर्षी असलेला देश आणि पुढच्या वर्षी असलेला देश प्रामुख्याने या तीन देशांवर परिषदेचा अजेंडा ठरवण्याची जबाबदारी असते. जगातली 66 टक्के लोकसंख्या या G20 देशांमध्ये राहते. एकूण जीडीपीच्या 85 टक्के जीडीपी या देशांमधून येतो असं म्हणतात. तर जागतिक व्यापारातील पंचाहत्तर टक्क्यांहून अधिक व्यापार G20 देशांत होतो. अशा विकसित आणि विकसनशील जी-20 देशांचं यजमानपद गेले वर्षभर भारतानं भूषवलं ही अतिशय प्रतिष्ठेची बाब आहे.
मुंबई-पुण्यासह देशभरातील 15 ठिकाणी जी-20 च्या बैठका पार पडल्या आहेत. याचा फायदा जागतिक सत्ताकारणात आणि जागतिक अर्थकारणात होऊ शकतो. प्रगतीच्या दिशेनं जाणाऱ्या, जगाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम असलेल्या बलशाली भारताची प्रतिमा हे देश नक्कीच आपल्यासोबत घेऊन जातील अशी आशा आणि जी-20 साठी वसुधैव कुटुंबकम, ONE EARTH ONE FAMILY ONE FUTURE हा भारताने दिलेला नारा दिला सार्थ ठरेल अशी अपेक्षा.
याच लेखकाचा हा लेख वाचा: