एक्स्प्लोर
मुंबई यू आर अनस्टॉपेबल
खरंय... मुंबई अनस्टॉबेबल... मुंबईच्या शेवटाकडे जाणारा हा प्रवास खरोखर अनस्टॉपेबल आहे... या मुंबईच्या चिंधड्या उडाव्या तरी प्रत्येक तुकडा हेच ओरडेल वी आर अनस्टॉबेबल...

2017... आयुष्यातलं हे ही पान उलटलं... नव्या पानाची सुरुवात... नवं कोरं कॅलेंडर... नवी कोरी डायरी... डायरी लिहिण्याचा संकल्प.... तिची भरलेली पहिली चार पाच पानं आणि मग डायरेक्ट पुढच्या वर्षी होणारी आठवण... हे ही नेहमीचच...
आज वर्षाच्या शेवटी मनाला शंभरदा बजावून लिहायला बसवलंय... वर्षाचा शेवटचा दिवसही धावपळीचाच... दोन दिवसांपूर्वी एका श्रीमंत रेस्ट्रोबारला लागलेली आग आता माझ्या शब्दांत उतरतेय... आणि माझी जिभ आता फुल्ल लोडेड रायफलसारखी झालीय... कॅमेऱ्यासमोर मी वाभाडे काढतेय... व्यवस्था, सरकार, पॉलिसी, अधिकृत, अनधिकृत, मुंबईचा कोंडमारा या शब्दांच्या ठिणग्या उडतायेत नुसत्या...
दोन दिवसांपूर्वी कमला मिल मधल्या वन अबव्ह नावाच्या पबला आग लागली... तिथे पण पार्टी करणाऱ्या पोरापोरींना कुठे पळावं, काय करावं सूचलंच नाही... बरेचजण होरपळले, गुदमरले आणि मेले... त्या मेलेल्यांमध्ये जिनं आपल्या वाढदिवसाची पार्टी दिली ती सुद्धा होती... आम्ही हळहळलो... हेडलाईन झाल्या, वाढदिवसच ठरला शेवटचा दिवस...
नंतर हे बील कुणाच्या नावावर फाडायचं याचा सगळे विचार करायला लागले... नाही म्हणायला या हायप्रोफाईल कमला मिलच्या जागेचा आणि आमचा संबंध फक्त तिथल्या चॅनेलमध्ये जाऊन ट्रान्सफर घेण्यापुरताच... म्हणजे एका चँनलकडून काही बातमी सुटली की ती दुसऱ्या चॅनलकडून घ्यायची...हा व्यव्हार मैत्रीवर आणि विश्वासावर चालतो...यापलीकडे कमला मिलचं श्रीमंत तोंड कसं दिसतं हे बघण्याच्या आम्ही फंदात पडलो नाही...
पण, जाता येता जाणवायचं... इथले आलिशान हॉटेल, पब, तिथे येणाऱ्या आलिशान गाड्या... छान छान कपडे घालून, लाली पावडर लावून येणाऱ्या पोरी... त्यांचे हँडसम बॉयफ्रेंड... आणि त्यांच्या मस्तीत धुंदलेल्या, झिंगलेल्या रात्री... खरं सांगायचं तर फार जळायला व्हायचं हे बघून... म्हणून आम्ही कुठल्याश्या टाईमपास व्हेज रेस्टॉरंटमध्ये गेलो तरी फेसबुकवर नोटिफिकेशन टाकून गावभर दवंडी पिटून त्यातल्या त्यात समाधानी व्हायचो...
पण, आता वाटतंय अंथरुणापर्यंत पाय पसरलेलं आपलं समाधानच बरंय... बरंय आपलं अंथरुण तोकडं आणि ठिगळा-ठिगळांचंय ते... अर्थात या मागे मनाच्या सूप्त कोल्ह्याला द्राक्षं आंबट आहेतच...
पण, आज जे जाणवलं ते खरंच भयानक किळसवाणं आहे... लाली पावडरच्या चेहऱ्यांमागे माणसाची नाही सैतानाची कवटी आहे... आग लागल्यानंतरही थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी लोक इथे घिरट्या घालत काही रेस्टॉरंटस् सुरुयेत का हे पाहायला येत होते... एकाने तर चक्क कॅमेऱ्यासमोर सांगितलं, अरे आग लगी तो लगी हैं... मुंबई क्या सबकुछ भूल जायेगी... दुसरा एकजण त्याच्या कॉन्वेंटी इंग्रजीमध्ये म्हणाला मुंबई हॅव अ स्पिरीट... मुंबई इज अनस्टॉबेबल...
खरंय... मुंबई अनस्टॉबेबल... मुंबईच्या शेवटाकडे जाणारा हा प्रवास खरोखर अनस्टॉपेबल आहे... या मुंबईच्या चिंधड्या उडाव्या तरी प्रत्येक तुकडा हेच ओरडेल वी आर अनस्टॉबेबल...
आत्ता लागलेली आग ही हायप्रोफाईल आग होती. कारण त्यात रईसजादे मेले. मात्र, ज्यादिवशी गुजरात निवडणूकीच्या विजयाचा गुलाल उधळला जात होता त्याच दिवशी साकीनाक्यात अश्याच एका अनधिकृत फरसाणच्या दुकानात 12 कामगांर होरपळून मेले... त्यांच्या रक्ताचा उधळलेला गुलाल कुणालाच दिसलाही नाही आणि त्याची एवढी चर्चाही नाही... चालायचंच...
पण, या सगळ्यामागे पैशाला दिला जाणारा आश्रय आहे... त्यापुढे हे मृतांचे आकडे वगैरे फिके आहेत... कोऱ्या करकरीत नोटेचाच रंग काय तो खरा... त्यापुढे रक्ताचे किती पाट वाहतायेत हे बघायला कुणाला वेळ आहे... सगळंच अनस्टॉबेबल...
ही आग ज्या ठिकाणी लागली होती ते हॉटेल गच्चीवर होतं... आतापर्यंत फार फार तर उन्हाळ्यात गारव्यासाठी चांदण्या रात्रीत आम्ही घराच्या गच्चीवर गेलो... फार फार तर कोजागिरीचं दूध प्यालो... पण, मुंबईत अश्या आलिशान गच्च्यांवर दारु पितात... आता हे गच्च्यांवर पार्टी करण्याचं फॅड काही स्वस्त नाहीय... इथे एक टेबल रिझर्व्ह करण्यासाठी अक्षरश: लाखो रुपये मोजले जातात... वो हम आपके बसकी बात नहीं...
मात्र, इथे उधळल्या जाणाऱ्या नोटा आणि घशांत रिचवली जाणारी दारु प्रतिष्ठित आहे... तिच्या प्रतिष्ठेला कुणी अनियमित किंवा अनधिकृत म्हणू नये म्हणून सरकारदरबारी आटापिटा केला जातोय... मुंबईतल्या मराठी माणसाचे कैवारी असणारे आणि हिंदुह्रदयसम्राटांचा वारसा सांगणारे वारसदार युवराज बाळराजे खुद्द यासाठी धडपडत होते...
त्यामुळे या श्रीमंती लखलखाटामागे कुणाकुणाच्या दिव्यांचा उजेड पडत असेल याची कल्पना येतेच...
चांगल्या भाषेत या ठिकाणांना रुफ टॉप हॉटेल म्हणतात... आणि दिवसभर थकल्याभागल्या मुंबईकरांना विसाव्याचं ठिकाण आणि जेवणाची सोय इतका शुद्ध हेतू रुफ टॉप हॉटेलच्या संकल्पनेमागे सांगितला जातो...
एकंदर सगळाच डोळे मिटून दूध पिण्याचा प्रकार... अश्या एखाद्या घटनेवेळी डोळे थोडे किलकीले करुन पाहाता येतं इतकंच...
बाकी, इतका विचार करायला वेळ कुणालाय... वि आर अनस्टॉपेबल... हे ही वर्ष संपलं... कॅलेंडरत्या एका पानावरुन पुढच्या पानावर सरकायचं इतकंच...
काळाचं चाक असं पुढंपुढं जातंय... आणि मनाचं चाक एखाद्या क्षणी असं कुठेतरी रुतुन बसतं... 2017 मध्ये तुंबलेल्या मुंबईत, लागलेल्या आगीत, कोसळलेल्या इमारतांच्या ढिगाऱ्यांत, चेंगरलेल्या माणसांच्या मृतदेहांत मनाचं चाक रुतून बसलंय...
पण, ते बाहेर काढलंच पाहिजे...
येस्स, यु आर अनस्टॉपेबल...जो लगाके हैश्श्या.....
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट

























