BLOG : शब्दजागर करताना वंदन मातांना..
BLOG : पाहता पाहता गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सव पार पडला आणि आज विजयादशमीचा अर्थात दसऱ्याचा दिवस. कोरोनाची मरगळ झटकून गणेशोत्सव जितक्या उत्साहात झाला, तसाच नवरात्रोत्सवही वाजतगाजत पार पडला. या नवरात्रीच्यानिमित्ताने मी शब्दजागर करण्याचं ठरवलं. त्याकरता संकल्पना घेतली ‘माझी माय माझी प्रेरणा’. विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या स्त्री शक्तीच्या आयुष्यातील तिच्या आईचं स्थान. अशी लेखाची मध्यवर्ती कल्पना ठरवली. आई-मुलीचं नातं, आईने आपल्या लेकीला तिच्या क्षेत्रात करिअर करताना कशी साथ दिली, हा धागा पकडून सर्व लेख लिहिण्याचं निश्चित केलं. याकरता सावनी रवींद्र, श्रुती भावे-चितळे, शुभदा केदारी, स्वाती साठे, मंगल गाळवणकर, डॉ. पल्लवी सापळे, अश्विनी भिडे, अमृता खानविलकर, धनश्री लेले यांच्याशी संवाद साधला.
या सर्वच जणी आपापल्या क्षेत्रात अत्यंत व्यस्त आहेत. तरीही या प्रत्येकीला जेव्हा संकल्पना सांगण्यासाठी सुरुवातीला जेव्हा फोन केला, तेव्हा या सगळ्या जणींनी संवाद साधण्यास तात्काळ होकार दिला. माझं काम त्यामुळे अधिक सोपं झालं. प्रत्येकीचं क्षेत्र, तिचं आकाश दुसरीपेक्षा निराळं होतं. तरीही ध्येय गाठण्याची जिद्द, परिस्थितीशी दोन हात करण्याची जिगर तीच होती. किंबहुना त्यांच्या मातांनी ती त्यांच्यात मुरवली आणि वाढवली. कुटुंब आणि आपलं करिअर या दोन्हींचा मेळ साधताना आईने कशी मदत केली, साथ दिली, मार्गदर्शन केलं, याचं कथन या सर्व जणींनी केलं. या प्रत्येकीशी संवाद साधताना त्यांनी, त्यांच्या आईने त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट यांचं अनुभव कथन ऐकताना हात मनोमन जोडले जात होते.
परिपूर्णतेचा ध्यास घेणं वेगळं आणि तो ध्यास घेऊन आयुष्यभर कार्यरत राहणं वेगळं. यातल्या प्रत्येकीने आपापल्या क्षेत्रात विशिष्ट उंची गाठण्यासाठी तो ध्यास जगण्याचं ठरवलं, नव्हे त्या ध्यासालाच आपलं जगणं केलं.
अडचणींच्या काट्यांनी कितीही जखमा झाल्या तरीही सकारात्मकतेचं औषध घेऊन चालणं सुरुच ठेवायचं, हा मंत्र या लेखांमधून आपल्याला मिळतो. कारणं देण्यापेक्षा रिझल्ट देणं यावरच आपला फोकस ठेवणं किती महत्त्वाचं आहे, हेही अधोरेखित होतं.
लेखाच्या संकल्पनेचं गांभीर्य जपतानाच लेख फार तात्त्विक वगैरे होऊ नये यासाठी खाद्यसंस्कृती आणि भटकंती यासारखा एलिमेंट यामध्ये जाणीवपूर्वक आणण्याचा प्रयत्न केला. यानिमित्ताने काही पदार्थ मला नव्याने कळले. तशीच काही भटकंतीची नवी ठिकाणंही उमगली.
जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुम्हाला वेगळं बनवत असतो, हे दिसून आलं. विचारांची खोली असेल तर कर्तृत्वाची उंची गाठता येतेच. हे सिद्ध कऱणाऱ्या या सर्व कर्तृत्ववान स्त्रियांना, त्यांच्या मातांना वंदन करतानाच तमाम स्त्रीशक्तीलाही सादर प्रणाम.