BLOG | कोरोनाबाधितांची 'शाळा'!
शेवटी काही म्हंटलं तरी ते विद्यार्थीच, खेळणं-बागडायच्या वयात त्यांच्या नशिबी कोरोना सारखा संसर्गजन्य आजराचा फैलाव सुरु झाला आहे. त्यात इतके दिवस घरी बसल्यानंतर शाळा सुरु झाल्यावर मित्र सवंगडी भेटल्यावर किती त्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत असेल हे सांगायला नको. शाळेचे प्रशासन नियम आखून देत असतीलही मात्र विद्यार्थी दशेत ते या नियमाचे किती कडक पालन करत असतील हा एक प्रश्नच आहे. आरोग्य प्रथम, मग शिक्षण ही भूमिका अंगीकारून शाळा सुरु ठेवायच्या की बंद याचा निर्णय शाळा चालकांनी घेतला पाहिजे.
सुरुवातीच्या काळात म्हणजेच गेल्या वर्षी कोरोनाचा हाहाकार सर्वत्र देशात होता, त्यावेळी तरुण आणि ज्येष्ठ व्यक्तींना या आजराची मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. त्यावेळी लहान मुलांना कोरोनाची लागण फार होत नाही, त्याची प्रतिकार शक्ती चांगली असते, असा समज तयार झाला होता. वैद्यकीय क्षेत्रातून यावर ठोस अशी प्रतिक्रिया येत नव्हती. मात्र या वर्षीचा फेब्रुवारीच्या महिना संपत असताना शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. राज्यातील विविध भागात शाळा झाल्याने विदयार्थी शाळेत जाऊ लागल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे दिसत असले, तरी प्रतिबंधात्मक आणि सुरक्षिततेचे उपाय कमी असल्याचे अधोरेखित होत आहे. गेल्या महिन्याभरात राज्यात 0 - 10 वयोगटातील 2 हजार 384 मुलांना कोरोनाची लागण झाली असून 11 - 20 वयोगटातील 6 हजार 915 युवकांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यातील विविध भागात मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांना या आजराची लागण झाली आहे. त्यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. विद्यार्थ्यांची शाळा भरवत असताना कोरोनाबाधितांची शाळा जर भरणार असेल तर धोक्याची घंटा लक्षात घेऊन आताच शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी कोरोना विरोधातील कडक नियमांची अंमलबजावणी करणे शक्य असेल तर शाळा सुरु ठेवाव्यात अन्यथा काही दिवस शाळा बंद ठेवणे शहाणपणाचे ठरणार आहे.
शेवटी काही म्हंटलं तरी ते विद्यार्थीच, खेळणं-बागडायच्या वयात त्यांच्या नशिबी कोरोना सारखा संसर्गजन्य आजराचा फैलाव सुरु झाला आहे. त्यात इतके दिवस घरी बसल्यानंतर शाळा सुरु झाल्यावर मित्र सवंगडी भेटल्यावर किती त्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत असेल हे सांगायला नको. शाळेचे प्रशासन नियम आखून देत असतीलही मात्र विद्यार्थी दशेत ते या नियमाचे किती कडक पालन करत असतील हा एक प्रश्नच आहे. आरोग्य प्रथम, मग शिक्षण ही भूमिका अंगीकारून शाळा सुरु ठेवायच्या की बंद याचा निर्णय शाळा चालकांनी घेतला पाहिजे. प्रत्येक पालकांना वाटते की, मुलांचा अभ्यास झाला पाहिजे ही भूमिका रास्त असली तरी कोरोनाच्या या संकटापुढे ह्या भूमिकेला मुरड घालून आधी विद्यार्थ्यांचे आरोग्य याचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे. ऑनलाईन व्यासपीठावरून जेवढं शिक्षण सध्याच्या परिस्थितीत घेणे आहे तेवढे घ्यावे कोरोनाचा कहर संपल्यानंतर शाळा सुरु करण्यास काहीच हरकत नाही. दुसरी बाजू म्हणजे शाळा ज्यावेळी सुरु करण्यात आल्या होत्या त्यावेळी कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात होता. मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोनबाधितांची संख्या इतक्या झपाट्याने वाढली की त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात या आजाराची लागण झालेली दिसून आली आहे. त्यामुळे शाळा चालकांना शाळा सुरु ठेवायची की नाही याचा फेरविचार करावा लागणार आहे.
राज्यातील विविध भागात विद्यार्थी बाधित झाले आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने वाशीम, सोलापूर, सातारा, लातूर, या भागाचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे या 16 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या 16 शाळातील 35 विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय. आता या शाळांतील इतर विद्यार्थांचीही कोरोना तपासणी करण्यात येत आहे. या 35 विद्यार्थ्यांमध्ये पाचवी ते आठवी या दरम्यानचे 25 विद्यार्थी तर नववी ते बारावीपर्यंतचे एकूण 10 विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. काल काही विद्यार्थ्यांना त्रास जाणवत असल्याने त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर काल आणि आज दोन दिवस झालेल्या तपासणीत 43 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालं आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी ही माहिती दिली आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील देगावच्या एका आदिवासी हॉस्टेलमधील 229 विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांश कोरोना बाधित विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. हॉस्टेलमध्ये सध्या एकूण 327 विद्यार्थी आहेत. हॉस्टेलला प्रशासनाने भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे आणि अधिकची चौकशी सुरु केली आहे.
तर साताऱ्यातील पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयातील 23 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले आहेत. सेवागिरी विद्यालयात पहिल्यांदा एक विद्यार्थीनी आजोबांमुळे कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. दुसऱ्या टप्प्यात या शाळेतील आणखी पाच विद्यार्थी पॉझिटीव्ह आढळले होते. तिसऱ्या टप्यात आणखी तीन विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले. चौथ्या टप्यात आणखी 14 विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले. आतापर्यंत सेवागिरी विद्यालयातील एकूण 23 विद्यार्थांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिल्या टप्यात पाचवी ते आठवी या वर्गातील हे विद्यार्थी आहेत. लातूर शहरातील एमआयडीसी भागातील खासगी हॉस्टेलमधील 45 विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. परवानगी नसतानाही शहरातील 170 पेक्षा जास्त खासगी हॉस्टेल सुरु असल्याने आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
राज्याचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग कोरोनाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक दैनंदिन अहवाल सादर करत असते. त्यानुसार त्यांनी 25 जानेवारीला सादर केला होता. त्यामध्ये राज्यात 0 - 10 या वयोगटातील 68,664 मुले कोरोनाबाधित होते , तर 11 - 20 वयोगटातील 1, 33, 757 युवक या आजराने बाधित होते. त्याचप्रमाणे एक महिन्याने जो 25 फेब्रुवारीला अहवाल दिला आहे. त्यामध्ये या दोन्ही वयोगटातील बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार 0 - 10 वयोगटातील 71048 मुले तर 11 - 20 वयोगटातील 140672 युवकांना या आजराची लागण झाली आहे. त्यामुळे सुरवातीच्या काळात जी एक थिअरी होती फारशा प्रमाणात लहान मुलांना कोरोना होत नाही ती थिअरी पूर्णपणे फोल ठरली आहे. त्यावेळी विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणत घरात होते. मात्र आता नियमांमध्ये मोकळीक मिळाल्यामुळे घराबाहेर पडले आणि त्यांना आजाराचा संसर्ग झाला. त्यामुळे पालकांनी पुन्हा एकदा मोहट्या प्रमाणत आपल्या पाल्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. त्यांना घरी असताना सुरक्षिततेच्या नियमाची अंमलबजावणी करायला शिकविले पाहिजे.मे 29, रोजी 'लहानपण देगा देवा!' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, कोरोना काळात जशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय त्याप्रमाणे रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या लक्षणीय या काळात असून सगळंच काही वाईट होतंय असं नाही. जर समाज माध्यमांवर काही दिवसापासून बघितलं असेल तर तुमच्या एक लक्षात आले असेल की, लहान मुले कोरोनाच्या या आजारातून मुक्त होण्याचे विडिओ चांगलेच वायरल होत आहे. काल खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हॅण्डलवरून एक छोटासा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला त्यामध्ये 36 दिवसाचं बाळ सायन रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन घरी जात आहे. वैद्यकीय तज्ञाच्या मते संपूर्ण जगात एकंदर लहान मुलांना कोरोना झाल्यानंतर योग्य उपचाराअंती बरे होण्याचं प्रमाण सर्वात अधिक आहे. कोरोनाच्या या महाभयंकर संकटात, लहान मुलांना या आजाराचा संसर्ग होतोय आणि झालाच तर लहान मुले बरे होतायत, अशा या वातावरणातील हे एक आशादायी चित्रच म्हणावे लागेल.राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग दररोज राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल तयार करत असून, यामध्ये त्यांनी कोरोनाबाधित लहान मुलांची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी 10 वर्षपर्यंतच्या मुलांची आकडेवारी वेगळी तर 10 - 20 वयोगटातील मुलांची आकडेवारी जाहीर केली आहे. या विभागाने 29 मे रोजी जाहीर केलेल्याला अहवालानुसार, ज्या 56 हजार 760 रुग्णांचा आकडा घेऊन विश्लेषण केले आहे. त्यानुसार 10 वर्षापर्यंतच्या 2032 मुलांना कोरोनाची बाधा झाली असून 11 - 20 वयोगटातील 3861 मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विषेश म्हणजे या वयोगटात मृत्यू होण्याचं प्रमाण अतिशय नगण्य आहे.
जानेवारी महिन्यात एकंदरच कोरोना वाढीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणेला चांगलेच यश मिळाले होते. मात्र अचानकपणे फेब्रुवारी महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली. या सगळ्या प्रकारात लक्षणीय संख्या आणि चिंतेचे कारण असलेली आकडेवारी म्हणजे शाळेत जाणाऱ्या विध्यार्थ्यांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात या काळात झाली. त्यामुळे सगळ्याच पालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. कोरोना मुलांना, तरुणांना आणि वयस्कर व्यक्तींना कुणालाही होऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाने सुरक्षिततेचे नियम कसे पाळता येतील यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. विद्यार्थी जर मोठ्या संख्येने या आजराने बाधित होत असतील तर कोरोनाबाधितांची 'शाळा' वेळीच बंद करणे गरजेचे आहे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग :- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | सह्याद्रीच्या मदतीला देवभूमी?
- BLOG | 'नवरक्षक' पीपीई किट ठरणार वरदान
- BLOG | पांगळी मुंबई कुणाला आवडेल?