एक्स्प्लोर
BLOG : होतं ते चांगल्यासाठीचं...
मंडळी, या सगळ्या प्रकरणानंतर अजूनही माझ्या मनात एक प्रश्न तसाच राहिला होता की, आप्पांची आणि सरांची ओळख कशी?
परिक्षेचा शेवटचा पेपर संपल्यानंतर तुम्ही बाहेर आलात की काय हलकं हलकं वाटतं नै? असंचं काहीस होणं अपेक्षित होतं, पण मला मात्र एक वेगळंच टेन्शन आलं होतं. परीक्षा तर संपली पण इंटरशीप कुठं करायची. मीडियात ना आपल्या ओळखी, ना आपले पूर्वज या क्षेत्राशी संबंधीत. च्यायला हे पूर्वज तर काय कामाचे नव्हते. आले असते थोडे डेरिंग करून पुण्या-मुंबईला तर निदान आत्तापर्यंत दणदणीत घर तरी राहयला झालं असतं इकडं. या दोन्ही शहरांनी लाखो लोकांना दोन वेळची भाजी-भाकरी दिलीय. यांनाही दिली असतीचं की. आणि राहता राहिला राहण्याचा प्रश्न तर ही शहरं तरी किती भार सहन करणार. केलं असतंच की मी थोड्या लांबून अपडाऊन. पण राहण्यासाठीचा अमाप पैसा तरी वाचला असता. अशा सगळ्याचं अपेक्षांचा भंग झाल्यामुळे नाराज मनाने पूर्वजांना खूप साऱ्या शिव्या घालत मी गावची वाट धरली. संध्याकाळच्या वेळी हायवेवर होणाऱ्या ट्राफिकमुळ रात्री बारा वाजले घरी पोहचायला. एव्हाना गाव शांत झालं होतं. त्यामुळे एक एक गल्ली पास करताना कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आणि माझ्या पायातल्या कोल्हापूरी चप्पलेचा आवाज गावची स्मशान शांतता भंग करत होता. त्यातच एका लईत चालत असल्यामुळे आपोआपच विचारांची तंद्री लागून गेली. त्यामुळे व्याव-व्याव करत जाणाऱ्या पोलिसांच्या पिंजऱ्यामुळे पोलीस स्टेशन जवळ आल्याची चाहूल लागली. त्यामुळे एकाकी तंद्री भंग पावली. पुढं दहा एक मिनिटात चालत चालत घरी केव्हा येऊन पोहोचलो कळलं नाही. एव्हना एखाद्या चॅनलला इंटर्रशीप करण्यासाठी निदान काही तरी ओळख हवीच हे मनाशी पक्क करून गावगाड्यात आपण किती छान आणि आनंदी होतो याचं स्वप्नरंजन करत करत बेडवर येऊन पडलो. माझ्या आवाजाने छोटी अवनी मामा-मामा करत उठून येऊन मला बिलगली त्यामुळे तर आणखी भरून आलं. असं वाटलं ते पुण्या- मुंबईला जाणं नही आपलं काम. उगाचंच नसता हट्ट करून बसलोय. आई-नानांना पैसे पुरवून पुरवून आत्ताचं नाकी नऊ आलंय. आत्ताशी एक सेमिस्टर झालीय. आणखी दीड वर्ष जाणं बाकी आहे. कसं करणार आहोत आपण ? ?
इतक्यात आईने लाईट बंद केली आणि खोलीत आणि मनात सगळीकडेच एकाकी अंधार पसरला. सगळंच निगेटिव्ह वातावरण निर्माण झालं. काय करावं आणि काय नको या विचारानं मेंदूला चांगलाचं पीळ बसला. इतक्यात मनात विचार आला, होतं ते चांगल्यासाठीचं. आणि पटापटा मागची दोन-तीन वर्षे नजरे समोरून सरकली. डिग्रीला प्रवेश घेण्यासाठी पहिल्यांदा पुण्याला निघालो होतो. त्यावेळी स्वारगेट कुठं आहे हे शोधता-शोधता आम्ही दुचाकीवरून पार लोणावळा गाठला. म्हणजे त्यादिवशी झक मारली आणि इकडं आलो अशी अवस्था झाली होती. परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. पुणे शहरात जायचं म्हंटल तरी अंगावर काटा यायचा. आता तोही बंद झालाय. आणि आता पुणं सोडायचं म्हंटल तरी जीवावर येतंय. आणि हो नशीब आपण पुण्यात राहिला होतो, पुण्यात आपले मित्र-मैत्रीणी होते, चार ओळखी-पाळखी होत्या म्हणूनचं तर नानांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा आपण त्यांना वेळीच दवाखान्यात घेऊन जाऊ शकलो. त्यात आणखी नशीब चांगलं म्हणून आमल्याचे वडील डॉक्टर, त्यामुळे त्यांनी पटापट औषधं चढवली, इंजेक्शनं दिली. हे जर वेळीच झालं नसतं तर ? ? ? ? नुसत्या विचारणं अंगावर काटा आला आणि शेजारी झोपलेल्या नानांकडे बघून डोळ्यातून पाणी आलं. थोडा वेळ तसेच रडवलेले डोळे ठेऊन पडून राहिलो. अवनीला बहुतेक ओल लागली असावी त्यामुळे ती पटकन बाजुला झाली आणि झोपून गेली. दरम्यान या आठवणीत केव्हा डोळा लागला कळलं नाही. सकाळी उठल्या उठल्या आईनं धुण्याची कपडे काढण्यासाठी बॅग झटकली. त्यात एकदम मळकी-कुळकी झालेली कपडे पाहून मलाच किळस आली. शेजारीच इंटरशीप मिळवण्यासाठी आमच्या डिपार्टमेंटने दिलेलं लेटर पडलं होतं. उगाचंच वाचायचं म्हणून ते बाहेर काढलं आणि आईला सांगायला सुरुवात केली. आता पुढचे दोन-तीन महिने मुंबईला जावं म्हणतोय. म्हणजे तसा कॉलेजचा नियमचं आहे. मुंबईत जाऊन एखाद्या चॅनलमध्ये काम करायचं असतं दोन महिने. ते पण फुकट. म्हणजे ते त्या बदल्यात आपल्याला खूप काही शिकवतात. आणि पुढं कॉलेज पुर्ण झाल्यावर त्यांनी दिलेल्या अनुभवाच्या पत्रावर नोकरी लागायला पण सोप्प जातं. मी आपलं सहज बोलून गेलो पण आईला मात्र चिंता लागून राहिली. आता हे आणखी काय ह्यांन खूळ काढलं. आधीच पैशे अड्जस्ट करता करता नाकी नऊ आणून ठेवलंय. आणि आता आणखी काहीतरी खूळ. चांगलं इथं शिक्षक म्हणून काम करत होता. चार-पाच हजार कमवत होता. तेवढाचं हातभार लागत होता. पण नाही ऐकलं! केलं स्वतःचंच खरं. त्यात त्याला साथ देणारा बापभी लाभलाय त्यामुळ शेफारला आहे दुसरं काय ? ? ?
इतक्यात नाना घरात आले. मी देखील त्यांना दोन महिन्याचं प्लानिंग सांगितलं. त्यांनी कसलीही प्रतिक्रिया न देता त्यांची जुनी डायरी शोधून एक नंबर काढला आणि लागलीच त्या नंबरवर फोनकरून संवाद साधला. माझ्या पोराला इंटरशीप करायचीय त्याला दोन महिने तुझ्याकडे ठेव. मुंबई सगळी माहिती करून दे, कुठं आडलं नाही पाहिजे? आणि तु सीआयडीत काम करतो म्हंटल्यावर तुझ्या ओळखी चॅनलवाल्यांशी नक्की असणार तेव्हा त्याला कुठं तरी इंटरशीपसाठी चिकटून दे. एका दमात माझी मुंबईची सोय लावून नाना शांत झाले. मला तर काय करावं आणि काय नको असं झालं क्षणभर. नानांनी लगेचच सांगायला सुरुवात केली. हा माझा बालपणीचा मित्र. ज्या काळात मी ट्रक चालवायचो त्याकाळात ह्यो माझ्याबरोबर असायचा. एकदा मुंबईत पोलीस भरती सुरू असल्याचं मला कळालं म्हणून याला मी मुंबईला घेऊन गेलो. त्याचंही नशीब चांगलं पठ्ठ्या भरतीपण झाला. आता मुंबईत घर आहे त्याचं चांगलं. सगळी सोय उत्तम करल तुझी. तु बिनधास्त जा. मी आहे तुझ्यापाठी अशी एनर्जी नानांनी माझ्यात भरली. आई मात्र प्रचंड काळजीत पडली. पोरगं मुंबईला पाठवायचं तर पैसे कुठून आणायचे. पाहुण्यांच्यात जरी राहणार असेल तरी थोडेफार पैसे तरी दिलेच पाहिजेत की...इतक्यात नानांनी आवाज दिला. रात्रीच माझा मित्र गावी आलाय. जा त्यांना भेटून ये. त्याचं घर स्टँडजवळ आहे. मी देखील पटकन उठून आवरा आवर केली. त्यावेळी सकाळचे अकरा-साडेअकरा वाजले असतील. उन्हाळा असल्यामुळे उन्हाचा तडाका चांगलाचं जाणवत होता. पण माझा मात्र उत्साह ओसंडून वाहत होता. मी काकांना फोन केला. त्यांनी देखील घरीच भेटायला ये असं सांगितलं. त्या नंतर मजल दरमजल करत मी त्या काकांच्या घरी येउन पोहोचलो. तर काकांच्या दाराला कुलूप दिसलं. मी मनाशीचं म्हंटल असतील इथं जवळपास म्हणून आसपास चौकशी केली. तर ते गावी आलेच नाहीत म्हणजे आम्हांला तर दिसले नाहीत अशी उत्तरं शेजारच्यांनी दिली. त्यामुळे तर माझी चांगलीच सटकली. थोड्या रागातचं काकांना फोन लावला तर त्यांनी गावच्या बाहेर असणाऱ्या मंगल कार्यालयात बसलो आहे. इकडेच ये भेटायला असं सांगितल. यावेळी मला थोडा राग आला. निघताना फोन केला त्याचवेळी सांगितलं असतं तर बिघडलं असतं का म्हणून चिडचिड झाली. थोडा वेळ तसाच उन्हात उभा राहिलो. दुपारचे एक वाजले असतील. सुर्यनारायण तर डोक्यावर आग ओतत होता. त्यातच उकाड्यामुळे येणाऱ्या घामाने जीव कासावीस झाला होता. त्यामुळे मनात विचार आला कुठून बुद्धी सुचली आणि इकडे आलो. पण त्याचवेळी दुसरं मन म्हंटल, लगेचच निष्कर्षा पर्येंत येऊ नकोस. होतं तें चांगल्यासाठीच. एकदा भेटून तरी ये त्यांना. एकतर त्यांच्याकडून काम होईल किंवा नाही होईल पण मनाला समाधान राहिलं की आपण ऑप्शन तरी चेक केला.
शेवटी उगाचंच मनात रुख-रुख नको म्हणून मी गावच्या बाहेर असणाऱ्या मंगल कार्यालयाची वाट धरली. जवळपास तासभर चालल्या नंतर मंगल कार्यालय नजरेच्या टप्प्यात दिसू लागलं. लागलीच मनात थोडंस हाईस वाटलं. शेजारीच एक मोठ्ठ वडाचं झाड होतं. त्याचा आधार घेतला. सावलीत आल्यामुळे आपोआपचं डोळ्याना थंडावा मिळाला. इतक्यात मंद वाऱ्याची झूळूक अंगाला स्पर्शून गेली. त्या तिकडं समोरचं शाळेची पोरं क्रिकेट खेळत होती. एवढ्या उन्हातान्हाची क्षीण खेळत असतील म्हणून आश्चर्य वाटलं. तोच एक मोठा वायदळीचा गोल घोंघावत मुलांच्या दिशेने आला. त्यामुळे पोरांची चांगलीच पळापळ झाली. तिथुनच जवळ म्हातोबाचा बोडका डोंगर दिसतं होता. त्या डोंगरावर उन्ह सावल्यांचा पाठशीवणीचा खेळ स्पष्ट दिसतं होता. तो नजारा पाहून खूप भारी वाटलं. मनात विचार आला माणसाचं पण असंच उन्ह सावल्यांच्या खेळाप्रमाणे असतं. उगाचंच प्रयत्न सोडून पळत्याच्या मागं पळत सुटतात. ते नाय का थ्री इडियट्स मध्ये अमीरखान म्हणतो. दुनिया गोल है, कामयाबी के पीछे मत भागो, काबील बनो, कामयाबी तुम्हारे पीछे झक मारकर आयेगी. हे मनात सुरु असतानाच कोणी तरी जोरदार गाडीचा ब्रेक दाबल्याचा आवाज आला. त्यामुळे धुळीचा लेप सरळ माझ्या तोंडावर येऊन बसला. मला पाहून गाडीचालकाने गाडी रस्त्याच्या खाली दाबली आणि लांबूनचं आवाज दिला. काय मास्तर इकडं-कुणीकडं उन्हा-तान्हाचं फिरायला लागलाय. आमची पोरं म्हणत होती तुम्ही नोकरी सोडली म्हणून आणि आता काय तरी वार्ताहराचं शिक्षण घेताय म्हणून. खरंयका ? ?? ? ? मी मानेनचं होकार दिला. त्यावर गाडीत बसलेल्या व्यक्तीचं उत्तर...... काय रज्जेहो...इकडं माय-बापा कष्ट करत्यात तुमच्यासाठी आणि तुम्ही मारा मज्जा शहरात राहून...म्हतारपणात बरं कामाला लावताय माय बापाला..मला हे ऐकूनच भयंकर संताप आला. आता काय बोलावं या माणसाला म्हणून चिडूनचं ओरडणार होतो. परंतु, परत स्वतःला शांत करत विचार केला. यांना मी काय करतो, काय शिकतो नक्कीच माहिती नाही. निदान आपल्याकडे असणार इंग्लिश लेटर तरी दाखवू, त्यांना यातलं कळणार काहीच नाही पण काय तरी भारी लिहिलेलं आहे हे पाहून आदर तरी वाढेल. टोचून बोलायचे तरी बंद होतील. म्हणून मी हळू-हळू गाडीच्या दिशेने चालत गेलो आणि गाडीत जाऊन बसलो. गाडीत आमच्या गावचे प्रतिष्ठित व्यक्तीमत्त्व आप्पा बसले होते. इकडची-तिकडची विचारपूस केल्यानंतर एवढ्या उन्हाचं कुठं निघालात म्हणून त्यांनी प्रश्न विचारला. मी देखील याच संधीची वाट पाहत होतो. त्यामुळे लागलीच बॅगेतून पत्र काढून मी त्यांना दाखवलं. त्यांनी खूप कळत असल्यागत पटकन हातातून ओढून घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. पण इंग्रजी असल्यामुळे थोडेसे नरमल्यागत वाटून त्यांनी ते पुन्हा माझ्या हातात दिलं आणि काय आहे हे म्हणून खूण केली. मी देखील त्यांना खाली दाखवल्याच्या अविर्भावात त्या पत्राबाबत माहिती दिली आणि एखाद्या चॅनेलला अनुभव प्रशिक्षण घ्यायचं आहे, अशी माहिती दिली. मंडळी तुम्हांला खोटं वाटेल पण आप्पा महाबिलिन्दर प्राणी. लागलीच कोणत्या चॅनलला तुला काम करायचय आहे बोल, लगेचच काम करून देतो म्हणून माझ्या समोर त्यांनी गुगली टाकली. त्यांच्याकडून हे होणारच नाही या आविर्भावात नाईलाजास्तव मी सुद्धा एका मोठ्या चॅनलचं नाव त्यांना ठोकून दिलं. त्यांनी क्षणभर विचार केला आणि पटकन एक कॉल केला.
या घटनेला कमीत कमी आज चार वर्षे उलटून गेली असतील. मला तो संवाद अजून आहे असा आठवतोय. आप्पा समोरच्या व्यक्तीला उद्देशुन, साहेब माझं पोरगं तुमच्या चॅनलमध्ये मध्येच ट्रेनिंग घ्यायचं म्हणतंय? पटकन घेऊन टाका बरं तुमच्या इथं...समोरच्या व्यक्तीने देखील आप्पांना सकारात्मक प्रतिसाद दिला असावा त्यामुळेच कदाचित आप्पांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. आप्पांनी दहा एक मिनिटं इकडंच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि फोन ठेवून दिला. फोन ठेवताचं आप्पांच्या मोबाईलवर मेसेज आला. आप्पांनी लगबगीने सांगायला सुरुवात केली. पोरा तुझं काम झालंय. काळजी करू नकोस. या साहेबांन तुझ्या डोक्यावर हात ठेवला की समज तुझा पुढं जायचा मार्ग मोकळा झाला. हे बघ साहेबांनी त्यांचा मेल आयडी(yoeshjadhav@gmail.com) पाठवलाय. तुझी जी काही माहिती आहे ती पटकन पाठवून टाक. आणि राहण्याचीपण काळजी करू नकोस. सगळं करून टाकतील ते. एकदम ओके काम होऊन जाईल. मला आप्पांचे हे शब्द ऐकून असं झालं की आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. पण परत भीती वाटु लागली. आप्पा तर जिल्हा सोडून कुठं लांब न गेलेला माणूस. याची कशी काय तिकडं ओळख? नेमका यांनी फोन लावला तरी कुणाला? उगं कुठं तरी पाठवून गंडवायचे आपल्याला. परत विचार केला होतं ते चांगल्यासाठीचं. नाहीतरी आपल्याकड तरी कुठं दुसरा मार्ग होता. आहे समोर ऑप्शन तर वापरून बघू. वाटलं चांगलं तर ठीक नाहीतर सोडून देऊ. आप्पांना फोनवरून बोलताना समोरच्या व्यक्तीने मेलआयडी दिला होता. त्या मेलआयडीमध्येच त्या सरांचं नाव होतं. त्यामुळे लागलीच मी नेमकी ही व्यक्ती कोण म्हणून फेसबुक, गुगलवर शोधायला सुरुवात केली. तर त्या सरांचं प्रोफाईल समोर आलं. तसेच ते कोणत्यातरी मोठ्या पदावर असणार हेही लक्षात आलं. इतक्यात मी ज्या काकांना भेटायला यायला निघालो होतो. तेच समोर आले. त्यांना आप्पांनी माझं काम करून दिल्याचं सांगताचं त्यांनाही खूप आनंद झाला. त्यानंतर मी घरी आल्यावर जवळपास रात्री दोन वाजे पर्येंत योगेश सरांचे सगळे लेख वाचून काढले. मग मात्र माझी पक्की खात्री पटली आणि शांत झोपी गेलो. पुढे दोन दिवसांनंतरच मी योगेश सरांना फोन केला. योगायोग म्हणजे त्यांच गाव देखील माझ्या गावाजवळचं निघालं. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या गावी भेटायला बोलावलं. मी दुसऱ्या दिवशी त्यांच्या गावी साधारण दहाच्या सुमारास पोहोचलो. गावात उतरल्यानंतर लक्षात आलं की फोनला रेंज नाहीये. म्हणून विचारत विचारत त्यांच्या घरी जायचं ठरवलं. मी उभा होतो त्याच्या जवळचं एक किराणा मालाचं दुकान होतं. मी दुकानदाराला प्रश्न विचारला ते xyz चॅनलचे योगेश जाधव कुठं राहतात. तर त्यांनी उत्तर दिलं. असा कोणता व्यक्ती गावात राहत नाही. राहता राहिला योगेश जाधव या नावाच्या व्यक्तीचा प्रश्न, तर या गावात ऐकूण सहा योगेश जाधव राहतात. त्यातला तुम्हाला कोणता पाहिजे हे कसं कळणार. तुम्हाला हव्या असणाऱ्या योगेश जाधवच्या वडिलांचं नाव तरी माहिती आहे का ? तर मी नकारार्थी मान डोलावली. पुढं त्यांनी गावात जाऊन आणखी चौकशी करण्याचा सल्ला दिला. मी आणखी दोन तीन दुकानात चौकशी केली पण सगळीच निगेटिव्ह उत्तरं मिळाली. अखेर शेवटचं एक दुकान दिसलं. तिथं चौकशी करून बघावं म्हणून त्यां दुकानात गेलो. दुकानातल्या मावशीने बाहेर येऊन मला योगेश जाधव सरांचं घर दाखवलं आणि आज सकाळीच ते मुंबईवरून आल्याचं सांगितलं. गेल्या दोन दिवसात ज्या व्यक्तीला मी लेखांच्या माध्यमातून वाचून काढलं होतं त्याला आज समोरासमोर भेटणार होतो. लेख वाचून असंख्य प्रश्न मनात उभे राहिले होते. कसं इतकं भारी लिहिता तुम्ही? कसं सुचतं तुम्हांला? आपण तर जाम प्रेमात पडलोय लिखाणाच्या. बाकी इंटरशीप मिळू नाही मिळू पण आपण तुमच्या एखाद्या लेखावर लघुचित्रपट करून टाकणारचं.... असले काहीबाही विचार मनात सुरु होते. इतक्यात समोर एक चारपाच जणांचं टोळकं दिसलं. मी त्यांच्या जवळ जाताचं सगळ्यांनी माझ्या दिशेने माना वळवल्या. त्यातल्या एकाने बघता बघता माव्याची एक पुडी फोडून तोंडात टाकली. इतक्यात मी प्रश्न विचारला. xyz चॅनलचे योगेश जाधव कुठं राहतात?. मावा फोडणाऱ्या कार्यकर्त्याने माझ्याकडे बघत मीच योगेश जाधव असल्याचं सांगितलं. माझ्या तर पायाखालची जमीन सटकली. ही काय भानगड म्हणून मी त्यांच्याकडे पाहत आवक झालो.
एखाद्या चॅनलमध्ये काम करणारा पत्रकार मावा कशाला खात असेल. ही पोरं उगाचंच आपली घेत असावीत म्हणून मी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. तर मावा खाणारा व्यक्ती चला घरी जाऊ म्हणून थेट घरी घेऊन गेला. घर एकदम मस्त होतं. बाहेर ओसरीत चार-पाच माणसं यांचीच वाट पाहत होती. प्रत्येकाची काहीना काही तक्रार किंवा मागणी. कुणाचा जमिनीचा मॅटर आहे. जिल्हाधिकाऱ्यांना फोन लाव म्हणून आग्रह तर कुणाचा पुढच्या महिन्यात गावात पुरस्कार सोहळा घेतोय, तुम्हीच प्रमुख पाहूणे म्हणून य़ा असा आग्रह. योगेश सरांनी दहा-पंधरा मिनिटात त्यांची काम निपटवली. आणि माझ्याकडे वळून मला माफी मागितली. काय तर तुम्हांला ताटकळत ठेवलं म्हणून. माझी तर अक्कल बंद झाली. कसला हा विनम्रपणा. आणि मी मात्र रस्त्याने चाललो तरी कुठं कुत्र्याला दगडी हाण तर कुठं उगाचंच हायवेने जाणाऱ्या ट्रकवाल्याला किंवा एसटीवाल्याला शिव्या दे असलं काही तरी करत असतो. त्यामुळे इथं आमच्या दोघात पार जमीन आसमानचा फरक जाणवत होता. इतक्यात योगेश सरांचा आवाज आला. हा घ्या तांब्या आणि बसा जेवायला. मी जरा हबकलो. दोन वर्षांपासून पुण्यात राहिलेल्या मला आशा आग्रहाची सवयचं राहिली नव्हती. इकडं पुण्यात जेवणार का तुम्ही हा प्रश्न राहिला बाजुला, पाणी देऊ का असा प्रश्न विचारून पाण्यावरच भागवून पाहुण्याला बाहेर काढण्याचा प्रघात आत्तापर्यंत मी चांगलाचं अनुभवला होता. इतक्यात योगेश सरांनी नानींना आवाज दिला आणि आम्ही एकाच ताटात जेवतो असं सांगून देखील टाकलं. नानींनी त्यादिवशी वांग्याचं भरित आणि शेवग्याची आमटी केली होती. जेवण इतकं फसक्लास झालं होतं की किती चपात्या खाल्ल्या आठवतही नाही. दरम्यान योगेशसर जेवता जेवता मला क्रॉसचेक करत होते. नेमकं शिक्षण काय घेतोय, पुढं डोक्यात काय प्लान्स आहेत. मुंबईत कुणी राहिला आहे का ? वैगेरे वैगेरे. मी सगळी उत्तरं दिली. जेवणानंतर बडीशेप हातात देतं त्यांनी आज काय प्लान आहे असा प्रश्न विचारला. मी काहीच नाही असं सांगताच मल सातारला येता का म्हणून त्यांनी प्रश्न केला. एसपी साहेबांचा वाढदिवस आहे आपण त्यांना भेटून येऊ अशी विनंती केली. त्यांनी एसपीना भेटायला जायचं आहे म्हंटल्यावर माझे तर डोळे पांढरे झाले. मागं एकदा यूपीएससीतून एसपी झालेले भारत आंधळे यांच्या भाषणात ऐकलं होतं की एसपीच्या हाताखाली तब्बल 200 पीएसआय असतात. शिपाई आणि एएसआयची गणती राहिली बाजूलाच. आणि हो खरं सांगायचं तर मला तोपर्यंत सातारला एसपी कोण आहेत? त्यांच नाव काय ? असली काहीच माहिती नव्हती. परंतु योगेश सरांनी एसपीना भेटायला जायचं आहे म्हंटल्यावरच मी जाम खूष झालो होतो. इतक्यात योगेश सरांनी एक माव्याची पुढी फोडली आणि तोंडात टाकली. मला मात्र हे आवडलं नाही. हे असं कसं हा प्रश्न मनात बराच वेळ घोळत राहिला. इतक्यात सरांचे गावातले एक मित्र किरणदादा आमच्या इथ आले. मी, किरणदादा आणि सर गाडीवरून सातारला जाऊयात असं ठरलं. पण एका दुचाकीवर आपण तिघं कसं जाणार त्यापेक्षा मी एसटीन येतो म्हणून त्या दोघांना आग्रह केला. तर ती दोघपण एकदम मिश्किल हासली. मला देखील काहीतरी चुकल्यासारखं वाटलं आणि गपगुमान मी गाडीवर मागं बसलो. गाडीने रस्त्यावर चांगलंचं स्पीड पकडलं होतं. इतक्यात पुढच्याचं गावात किरणदादांनी गाडी थांबवली. योगेश सर गाडीवरून उतरले आणि एका टप्परीतून माव्याच्या चार-पाच पुढ्या घेऊन आले. मला मात्र आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्या भागात मावा बंदी असतांना ह्यांन कसा काय आणला? इतक्यात गाडीने पुन्हा वेग पकडला. पुढच्या पंधरा मिनिटात गाडी सातारच्या वेशीवर येऊन थांबली. शहराच्या सुरुवातीलाचं पोलिसांनी नाकाबंदी केली होती. आमची दुचाकी बघताच चार- पाच पोलीस समोर आले. त्यातल्या एकाने पटकन गाडीची चावी काढून घेतली. दुसऱ्याने लायसन मागितलं. नेमके त्याचवेळी योगेश सर एसपी साहेबांशी बोलत होते. त्यांनी त्यांचा मोबाईल समोर असणाऱ्या पोलीसाला दाखवला.त्यांने देखील काहीच न बोलता गाडी सोडून दिली. आता मात्र माझी खात्री पटली कि खरंचं आपण कोणा मोठ्या व्यक्तीबरोबर फिरत आहोत. त्यानंतर आम्ही एसपी साहेबांना भेटलो. त्यांचा वाढदिवस साजरा केला. परत सायंकाळी सरांच्या गावी आलो. सरांनी प्रश्न केला मुंबईत राहण्याची सोय होऊ शकते का? मी नकारार्थी मान हलवली. आता मात्र माझी मनात चांगलीच पंचायत झाली होती. मनात असणारी परंतु मिळणं अशक्य वाटणारी इंटरशीप अचानक जादु झाल्याप्रमाणे पदरात पडणार होती आणि आता केवळ राहण्याची सोय नसल्यामुळे ही संधी हूकणार होती. शेवटी काय करावं काय करावं या विचारांचं थैमान मनात सुरु असताना योगेश सरांनी सांगितलं उद्या येताना बँग घेऊन या. राहण्याचं करू काही तरी. हे सगळं ऐकून मला अपार आनंद झाला होता.
घरी पोहचल्यावर आप्पांची भेट घेतली. त्यांना देखील खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी आम्ही मुंबईला यायला निघालो. कधीही लोणावळ्याच्या पुढं न गेलेला मी आज मात्र मुंबईच्या दिशेने निघालो होतो. रात्री अकराच्या दरम्यान मुंबईला पोहोचलो. घरी वहिनींनी गरमागरम जेवणं आग्रहाने जेवू घातलं. झोपताना योगेश सरांनी सकाळी लवकर ऑफिसला जायचं आहे असं सांगितलं. त्यामुळे मी पटकन झोपी गेलो. ते सकाळी थेट वहिनींच्या आवाजाने जागा झालो. आजचा दिवस माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. त्या दिवशी हे माहिती नव्हतं की आता खऱ्या अर्थाने आयुष्याला कलाटणी मिळणार आहे ते. वहिनींनी माझ्यासाठी स्वयंपाक केला होता. मी जेवणं केलं शिवाय त्यांनी डबा भरून दिला. त्यानंतर मी सर उठण्याची बट पाहत बसलो परंतु वहिनींनी मला एकट्याला ऑफिसला जायचं असल्याचं सांगितलं. आता मात्र माझी चांगलीच तंतरली. लहानपणापासून मुंबईबाबत ऐकलेल्या सगळ्या कहाण्या डोळ्यासमोर एकसाथ फिरु लागल्या. मुंबईतला लोकलचा प्रवास म्हणजे आपणहून मृत्यू ओढवण्याच प्रकार, त्यात प्रचंड गर्दी. शहाण्या माणसाने मुंबईला जाऊ नये. हे सगळं ऐकून पाय गळून गेले. परंतु मनातून पुन्हा तोच विचार वर आला. होतं ते चांगल्यासाठीच. कालपर्यंत कुठं आपल्याला माहिती होतं आपल्याला हे इतकं सहजा-सहजी मिळेल ते. परंतु आज दिवस वेगळा आहे. आणि होऊन होऊन काय होईल चुकेल ना आपण ? तर त्यासाठी जवळ मोबाईल आहे. सर आहेत आणि शेवटचा ऑप्शन म्हणजे पोलीस स्टेशन आहे. प्रयत्न तर करून बघू म्हणून मी एकट्याने जायचा निर्णय घेतला. सरांनी मला व्यवस्थित सगळं लिहून दिलं. त्याप्रमाणे मी फॉलो करत करत निघालो. अगदी चपळाईने त्या दिवशी लोकल पकडली. मेट्रो स्टेशन पर्यंत आलो. तिकिट काढलं. परंतु पुढे आल्यावर एक पंचाईत झाली, आता पळणाऱ्या पायऱ्यांवरुन कसं चढायचं हे काही लक्षात येईना. बराच वेळ तिथं उभा राहिलो. परंतु मागून माणसांचा एक लोंढा आला आणि मी त्यांच्या बरोबर थेट दुसऱ्या पायरीवर जाऊन पडलो. अखेर जेमतेम बाराच्या दरम्यान मी ऑफिसला जाऊन पोहोचलो. xyz चॅनलच्या बिल्डिंगमध्ये शिरताच खूप आनंद झाला. आज मात्र मला शाहरुख खानच्या ओम शांती ओम चित्रपटातील डायलॉग मनोमन पटला होता. अगर किसी चीज को आप दिलंसे चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. गेल्या काही दिवसात घडलेले सर्व प्रसंग मला यावेळी आठवत होते. आणि त्याच वेळी डोळ्यातून अश्रू देखील वाहत होते.
ऑफिसमध्ये पोहोचताच सगळं पिक्चरमधल्यावाणी दिसायला लागलं. पुर्ण कॉर्पोरेट ऑफिसचा लुक, जो तो आपल्या कामत बिजी. त्याच वेळी कोणी चहा पीत पीत फोनवर गप्पा मारतय. तर कोणी हास्य विनोदात रमलय. अगदी त्याचवेळी नुकताच प्रदर्शित झालेल्या दुनियादारी सिनेमाची टीम हासत हासत बाहेर पडताना दिसली. त्यामुळे माझी अशी अवस्था झाली की, अरे यार ते बघ सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी....बबबबब एकंदरीत पुर्ण अक्कल बंद. त्यावेळी सई ताम्हणकर तिचा सिनेमातील जो लूक आहे त्याच लूकमध्ये इथं आली होती. त्यामुळे ती आणखी सुंदर दिसतं होती. त्यामुळे साहजिकच माझं बराच वेळ लक्ष्य तिच्यावर केंद्रित झालं. ही बाब सईच्या लक्षात आली असावी. तिनं लगोलग मला स्माईल दिली त्यामुळे मी जाम खूष झालो. आता मात्र मला काय करू आणि काय नको असं झालं. मनाला एकच भावना खूप भावली होती. आज आपल्याला चक्क सई ताम्हणकरने स्माईल दिली. चक्क सई ताम्हणकरने. लगेचच वाटलं पटापट सगळ्यांसोबत जाऊन फोटॊ काढावेत. परंतु बोंबलं आपला बोगस चायना मोबाईल. सगळी इज्जत जायची. मी आपली सपशेल माघार घेतली. इतक्यात एचआरने आवाज दिला. दोन-तीन प्रश्न विचारले आणि उद्यापासून ये असं सांगितलं. आजचा दिवस खरंच खूप आनंदाचा होता. मला आत्ता पर्यंतच्या आयुष्यात तरी इतक्या सहजा सहजी मिळालेली ही पहिलीच बाब असावी. त्यामुळे तर आणखी मनावरचा ताण वाढला होता. एकीकडे चॅनल दिसत असला तरी दुसरीकडे आप्पांनी, नानांनी, आईने आणि योगेश सरांनी दाखवलेला विश्वास सार्थ करायचा होता. या सगळ्या गडबडीत दोन वाजायला आले होते. योगेश सरांना मी कॉल केला परंतु त्यांनी आज लेट येणार असल्याचं सांगितलं. शिवाय तुम्ही ऑफिसच्या मागे एक थेटर आहे तिथं एक पिक्चर बघा मी येतो तोपर्यंत असं देखील सांगितलं. मी तर निश्चिंत झालो होतो. कित्येक दिवसांचं मनावर राहिलेलं एक दडपण कमी झालं होतं. त्यामुळे मस्त एक सिनेमा जाऊन पाहिला. बाहेर आल्यावर पुन्हा कॉल केला. तर सरांना यायला आणखी वेळ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मग मी पुन्हा एक चित्रपट पाहिला. सायंकाळी सहाच्या दरम्यान सर ऑफिसला आले. मी त्यांची वाट पाहत बाहेर थांबलो. त्यानंतर त्यांनी आठच्या सुमारास मला न्यूज़रूममध्ये नेलं. तो दिवस न विसरण्यासारखा दिवस होता. आत गेल्यावर समोरच त्यावेळचे मोठं मोठे अँकर पाहिला मिळाले. काल ज्याचं मी दुनियादारी सिनेमाचं समीक्षण पाहिलं होतं. त्यांना आज जवळून पाहत होतो. तिकडं खेळाचे बातम्या देणारे प्रसिध्द पत्रकार आपल्या कामात व्यस्त होते. तासाभराने जेवणाच्या वेळी मी मला आवडणाऱ्या एक महिला अँकर आहेत त्यांच्या सोबत जेवायला बसलो होतो. त्या माझी आस्थेने चौकशी करत होत्या. आणि मी मात्र कित्येक वेळ स्वतःलाचं हळू हळू चिमटे काढत होतो. की हे स्वप्न तर नाही ना.
मंडळी, या सगळ्या प्रकरणानंतर अजूनही माझ्या मनात एक प्रश्न तसाच राहिला होता की, आप्पांची आणि सरांची ओळख कशी? ? ? हा प्रश्न मी थेट योगेश सरांना विचारला. त्यावेळी सरांनी दिलेल्या उत्तरावर मी खूप आश्चर्यचकित झालो. योगेश सर आणि आप्पांची मैत्री ही गेल्या पाच वर्षापासूनची. या पाच वर्षात हे एकमेकांना कधीच भेटलेले नाहीत. अॅक्च्यूली योगेश सर दर रविवारी ऐक्य नावाच्या एका प्रसिद्ध दैनिकात लेख लिहित असतात. त्या लेखाच्या खाली त्यांचा नंबर असतो. आप्पा न चुकता तो पेपर वाचत असतात. आणि लेख कसा वाटला हे कळवत असतात. त्यामुळेच दोघांची चांगली गट्टी जमलीये. आणि हो आप्पांची आणखी एक खासियत म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींसोबत त्यांची ओळख आहे. त्याला कारण असं की, आप्पांना एक खूप चांगली सवय आहे. ते आशा सगळ्या व्यक्तींना पत्र लिहीत असतात. आणि विशेष म्हणजे समोरच्या व्यक्तींची देखील त्यांना पत्र येतं असतात. त्यामुळे कोणतंही काम असो. आप्पांचं फक्त बस्स... ' नाम ही काफी है' असं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
मुंबई
बॉलीवूड
Advertisement