BLOG : नैसर्गिक आपत्तीला धैर्याने तोंड देणारं कोकण...
कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकणाला लाभला आहे. कोकण म्हणजे स्वर्गच आहे. कोकणचं खरं सौंदर्य बहरतं ते श्रावण आणि अश्विन महिन्यात श्रावणात कोकणची माळराने रानफुलांनी बहरुन येतात. विविधरंगी आणि आकाराची ही रानफुले म्हणजे अभ्यासकांना एक पर्वणीच असते. पाऊस थोडा कमी होऊन उन्हाची तिरीप आली की ही रानफुले हिरव्या माळरानावर वाऱ्यासंगे डोलू लागतात. निसर्गातील हे चमत्कार पाहायला मिळणं म्हणजे कोकणवासियांसह पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच असते. दरवर्षी वरुणराजा कोकणचं हे सौंदर्य अबाधित ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. मात्र या वेळेस कोकणात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे महापूर आला. अनेक गाव या महापुराच्या तडाख्यात सापडली.
खेड व चिपळूण शहरातील परिस्थिती गंभीर होती. लष्कर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकासह स्थानिक लोकांनी युद्धपातळीवर मदतकार्य केले. 2005 या वर्षातील जुलै महिन्यात आलेला पूर म्हणजे कोकणवासियांसाठी धडकी भरवणारा होता, पण तब्बल 16 वर्षांनी या पुराची पुनरावृत्ती झाली. या महापुराने कोकणवासियांच्या काळजाचा थरकाप उडवला. खेड व चिपळूण तालुक्याला या महापुराने अक्षरश: वेढा घातला. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लष्कर आणि एनडीरएफच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. लष्कराबरोबरच जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, विविध पक्षाचे कार्यकर्ते, विविध संघटना व स्वयंसेवी संस्था या सर्वांच्या सहकार्याने खेड व चिपळूणकरांना या भयंकर महापुराला धैर्याने तोंड दिले. प्रत्येक जण प्रत्येकाला पुराच्या पाण्यातून वाचवण्यासाठी धडपडत होता. एकमेकांना सावरण्यासाठी प्रयत्न करत होता. यानिमित्ताने या प्रलयकारी महापुरात देखील 'माणुसकीचा झरा' ओसंडून वाहत होता.
खेड व चिपळूण शहर परिसर तसेच अनेक भागात मातीची व साधी घरे वाहून गेली. दुकानदार व व्यवसायिकांचे अतोनात नुकसान झाले. या महापुराची भीषणता म्हणजे निसर्गाने जणू थट्टाच केली होती. तरीही या महापुरात माणुसकीचे दर्शन घडले. जात-पात, धर्म, भाषा व प्रांत विसरुन प्रत्येक जण प्रत्येकाला वाचवायला व मदत करण्यास पुढे सरसावत होता. महापुरात जिथे जाणेही शक्य नाही तिथेसुद्धा जाऊन रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. एवढेच नव्हे तर शक्य असेल त्या ठिकाणच्या मुक्या प्राण्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुराच्या पाण्यात ज्यांची घरे बुडाली असे नागरिक व पुराच्या पाण्यापासून वाचणाऱ्या पूरग्रस्तांना विविध महाविद्यालये, शाळा, आश्रम या ठिकाणी राहण्याची व जेवणाची सोय स्थानिक पातळीवरील प्रशासन व स्वयंसेवी संस्थानी करुन दिली. सर्वांच्या सहकार्याने खेड व चिपळूणकरांनी या भयंकर महापुराला धैर्याने तोंड दिले. प्रत्येक जण प्रत्येकाला पुराच्या पाण्यातून वाचवण्यासाठी धडपडत होता. एकमेकांना सावरण्यासाठी प्रयत्न करत होता.
शहरातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ चालू होता. अनेक ठिकाणाहून बिस्किटे, ब्लँकेट, धान्य, कपडे, साफसफाईसाठी लागणारे साहित्य जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले. वैयक्तिक पातळीवर देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काही हात पुढे आले. काही गॅरेज व्यवसायिकांनी पुरात बुडालेल्या गाड्या मोफत दुरुस्त करुन देण्यास सुरुवात केली. पुराच्या पाण्यातून आलेला कचरा, चिखल साफ करण्यासाठी महापालिका व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करण्यात आली. तसेच श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाकडून देखील स्वच्छता मोहीम करण्यात आली. तसेच पूरग्रस्तांच्या आरोग्य तपासणीसाठी शहरातील व जिल्ह्यातील अनेक ठिकाणांहून डॉक्टर व परिचारिकांची पथके दाखल झाली. अक्षरशः तांडव मांडलेल्या या महाप्रलयकारी पूरपरिस्थितीतून नागरिकांना सावरायला खूप वेळ लागला. कोकणातील 'निसर्ग' चक्रीवादळाने कोकणाचे निसर्ग सौंदर्य हिरावून घेतले. 'निसर्ग' चक्रीवादळाने कोकणाचे सर्वात जास्त नुकसान झाले. याची झळ अजूनही कोकणवासियांना जाणवत आहे. अभूतपूर्व चक्रीवादळातून सावरण्यासाठी व पुन्हा उभे राहण्यासाठी कोकणवासियांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
वादळे आणि पावसाचा तडाखा या गोष्टी कोकणवासियांसाठी नवीन नाहीत. दहा-बारा वर्षांपूर्वी आलेल्या 'फयान' वादळानेही कोकणात मोठे नुकसान झाले होते. त्यातूनही कोकणी माणूस ताठ मानेन उभा राहिला. मात्र 3 जून रोजी ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगाने आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड, रत्नागिरी या कोकणातील दोन जिल्ह्यांना जबरदस्त तडाखा दिला. या वादळाची व्याप्ती एवढी भयानक असेल हे कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. परंतु 'निसर्ग' या वादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील दपोली, पाचपंढरी, मंडणगड, मुरुड, हर्णे, केळशी या तालुक्यांसह अनेक तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले. हजारो घरे जमीनदोस्त झाली. घरांचे पत्रे कापसासारखे वादळात उडून गेले. विजेचे खांब जमिनीतून उखडून खाली कोसळले. वर्षानुवर्षे जपलेली आंबा, काजू, पोफळी, नारळाची झाडे भुईसपाट झाली. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ही झाडे वाढवायला आयुष्य घातलं त्या या कोकणातल्या माणसाला वीस वर्षे मागे हे वादळ घेऊन गेले. अंदाजे दोन हजार गावे या चक्रीवादळाने बाधित झाली. पंधरा हजार घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तब्बल सव्वाशे वर्षांनी या चक्रीवादळाने पुन्हा एकदा कोकणावर जबरदस्त आघात केला. यातून या जिल्ह्यांना सावरायला नक्कीच वेळ गेला. कारण संकटाचा सामना करणे एवढे सोपे नाही. वादळाची विध्वंसक शक्ती केवढी मोठी होती ते वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाहिन्यांनच्या बातम्यांतून दिसून येत होते. 'निसर्ग' चक्रीवादाळातून सावरण्यासाठी व पुन्हा उभे राहण्यासाठी कोकणवासियांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
निसर्ग या चक्रीवादळातून सावरत असतानाच अरबी समुद्रात निर्माण झालेलं 'तोक्ते' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर आदळलं. चक्रीवादळामुळे समुद्रातील लाटांनी रौद्ररुप धारण केल्याचे पाहायला मिळाले. 80 ते 90 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यात अनेक घरांवरील छप्परं उडाली. अनेक फळबागा जमीनदोस्त झाल्या. रस्त्यांवर झाडे पडल्याने अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली. तोक्ते चक्रीवादळाचा तडखा अनेक गावांना बसला. घरांची कौले, पत्रे उडून गेल्याचे चित्र दिसून आले तसेच काही आंबा, कलम झाडे, फणस, काजू बागायदारांचे नुकसान झाले. अनेक तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. 'तोक्ते' वादळामुळे झालेली हानी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांबरोबर मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले. असंख्य घरांना, गोठ्यांना तडाखा बसला. ते उद्ध्वस्त झाले. इतक मोठ संकट येऊनही तरुण वर्गासोबत वृध्द लोकही आपापले काम हसत खेळत करत होते, मनात टेंशन असेलही पण आलेल्या संकटाला हसत सामोरे जाण्याची ताकद - शक्ती ही कोकणातील माणसाला जन्मत:च मिळालेली आहे.
(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही)