एक्स्प्लोर
चालू वर्तमानकाळ (34) : बघे, सेल्फीटाके आणि पायकाढे
सामाजिक कार्याची गरज, सेवाभावातील सुख आणि लोकांना अडचणीत दुःखात निर्व्याजपणे मदत करण्यात लाभणारा आनंद हे सारे आपण विसरून गेलो आहोत की काय? अशी टोकाची मतं तयार व्हावीत असंच आजूबाजूला घडतं आहे; बघे आणि पायकाढे यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
![चालू वर्तमानकाळ (34) : बघे, सेल्फीटाके आणि पायकाढे kavita mahajans blog chalu vartamankaal series transpassers selfie takers चालू वर्तमानकाळ (34) : बघे, सेल्फीटाके आणि पायकाढे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/10111453/Kavita-Mahajan-1-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
काही घटना वर्षानुवर्षं तशाच घडत असतात, काळ त्यांच्यावर आपला इवला ओरखडाही उमटवू शकत नाही. शतकं ओलांडली तरी त्यांच्यात काही म्हणजे काहीच फरक पडत नाही. हां... म्हटलं तर काही साधनं काळानुरूप बदललेली असतात, म्हणजे ती ‘आधुनिक साधनं वापरून आपण त्याच त्या पारंपरिक गोष्टी करत असतो. एकेकाळी लोक हत्या करण्यासाठी दगड वापरत, आता अत्याधुनिक बंदुका, पिस्तुलं, बॉम्ब इत्यादी वापरतात; तरीही दगड वापरणं बंद झालं आहे असं मुळीच नाही. माणसांची वृत्ती तीच, तशीच, पारंपरिक राहिलेली आहे. माणसे आजही बघे आणि ‘पायकाढे राहिलेली आहेतच, त्यांच्यात तंत्रज्ञानाने ‘सेल्फीटाके ही भर बरिक पडलेली दिसतेय. आधुनिक साधनांचा चांगल्या कामांसाठी वापर करणे आजही हव्या तितक्या प्रमाणात होताना दिसत नाही, त्या तुलनेत गैरव्यवहारासाठी या साधनांचा अधिक वापर होताना दिसतो.
अस्वस्थ व्हावं अशा घटनांची कमतरता तर आपल्याकडे कधीच नसते. त्यातही आता जगभरच्या गोष्टी इंटरनेटमुळे आपल्या दाराखिडक्यांमधून सहजी घरात येतात आणि अस्वस्थता अधिकच वाढवतात. सातत्याने असंख्य घटनांची निव्वळ माहिती आदळत राहिल्याने आपल्या संवेदना अधिकाधिक दुबळ्या होत जात आहेत की काय असे आता वाटू लागले आहे, कारण केवळ प्रतिक्रिया व्यक्त करून काही लोक थांबतात, काही लोक त्यावर केवळ चर्चेचा कीस पाडत बसतात, पण प्रत्यक्ष कृती करणारे लोक हळूहळू अदृश्यच होतायत की काय असे वाटण्याचा काळ आला आहे.
माणसं तटस्थ राहतात हे आपल्यासाठी नवे नाही मात्र आम्ही तटस्थ आहोत हे सांगताना घडणाऱ्या घटनांविषयी पोकळ उत्सुकता व प्रत्यक्ष कृतिहीनता वाढते आहे. कृतिशील माणसांविषयी तुच्छता दर्शवणाऱ्या लोकांची वाढती संख्या तर भयावह आहे. “हे त्यांचे ‘वैयक्तिक’ आहे, तर त्यात कशाला पडा?” असं मत यामागे दिसतं. छेडछाड, विनयभंग, बलात्कार – अगदी सामूहिक बलात्कार देखील – असे ‘वैयक्तिक’च असतात मग; किती अन्याय-अत्याचार थेट सामूहिक दिसतात हा एक प्रश्नच आहे. आणि व्यक्तीवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ब्र काढायचा नाही, पण समूहाविषयी हिरिरीने बोलायचे, ही कुठली पद्धत?
सामाजिक कार्याची गरज, सेवाभावातील सुख आणि लोकांना अडचणीत दुःखात निर्व्याजपणे मदत करण्यात लाभणारा आनंद हे सारे आपण विसरून गेलो आहोत की काय? अशी टोकाची मतं तयार व्हावीत असंच आजूबाजूला घडतं आहे; बघे आणि पायकाढे यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
एक जुनी घटना अजून आठवते. गिरगावात, दिवसाढवळ्या, भर रस्त्यात, एकतर्फी प्रेमातून एका प्रौढ स्त्रीवर रॉकेल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न झाला होता. विद्या असं त्या स्त्रीचं नाव होतं हेही आठवतं. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या शेकडो माणसांपैकी कुणीही हा हल्ला करणाऱ्या व्यक्तीला रोखले नाही, या बधीरपणाची चर्चा त्या काळात खूप झाली होती. काही दिवसांपूर्वी लोकलमध्ये एका महिलेला ‘वैयक्तिक’ कारणाने एकाने मारहाण केली, तिचा विनयभंग केला. या घटनेचे व्हिडीओ काढले, छायाचित्रे घेतली; पण त्या गर्दीतील एकानेही त्या महिलेला मदत केली नाही. वाद व्यक्तिगत आहे किंवा काय हे अर्थातच पोलीस चौकशीनंतर उलगडले; मात्र एका स्त्रीवर गर्दीच्या वेळी हल्ला होत असेल आणि त्यावेळी लोकांना ‘लोकांच्या भांडणात आपण मध्ये का पडा’ वाटून समूहाची अशी बधीर मानसिकता तयार होत असेल तर ते निश्चितच चांगले नाही. डोळ्यांसमोर एखादा अत्याचार निमूटपणे पाहणे, हस्तक्षेपाविना तो अत्याचार होऊ देणे, म्हणजेच एका अर्थाने आपणही त्या अत्याचारात सहभागी होणे हेच होय!
सय्यद नाझिमा या स्त्रीबाबत ही घटना घडली. ती म्हणते की, “ही घटना दुखद आहे मात्र अशावेळी गर्दीतील कोणीही मदतीला पुढे येत नाही हे अधिकच निंदनीय आहे. महिला सुरक्षेसाठी अद्याप म्हणावी तशी पावले उचलण्यात न आल्यानेच असे घडते. महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी काहीतरी ठोस उपाय योजना राबवण्याची गरज आहे. प्रशासनाने कृपया याची गंभीरतेने दखल घ्यावी.”
हे निवेदन वाचल्यानंतर असे वाटले की, प्रत्येक गोष्टीकडे गोष्टीसाठी आम्ही फक्त सरकारकडेच बोट का दाखवतो पोलिसांकडून सुरक्षिततेची अपेक्षा करणं हे योग्यच आहे, मात्र पोलीस नसतील तिथे आपण मदत करणं, हे एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की नाही? आणि पोलीस असतानाही त्यांना सहकार्य करणं, साक्ष देणं हे आपलं कर्तव्य आहे की नाही? याचा विचार आपल्या स्वतःवर संकट कोसळल्यानंतर आपण करणार आहोत का?
फक्त अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या की समाजाकडून, समूहाकडून मदतीची अपेक्षा केली जाते असे नाही. लोकसहभाग हा माणसांना प्रत्येक सुखदु:खाच्या क्षणी हवा वाटतो; कारण मुळात माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. चांगल्या कामातही आपल्याला जनभागी हवीच असते. एरवीही साध्या-साध्या गोष्टींमध्येही आपण लोक काय म्हणतील असा विचार करतो किंवा अनेकदा लोकांची मते विचारात घेऊन कैक लहान-मोठी कामे पार पाडतो, लोकांच्या भावनांचा उठसूठ विचार करत असतो; असे असताना दुसर्या बाजूने हे प्रश्न, या अडचणी, ही संकटे ही त्या त्या माणसांची ‘वैयक्तिक’ आहेत असं वाटणं नेमकं केव्हापासून सुरू झालं हा एक संशोधनाचाच विषय आहे.
काही दिवसांपूर्वी अजून एक वाईट घटना महाराष्ट्रात घडली. प्रमोद कांबळे नावाचे एक शिल्पकार आहेत, त्यांच्या स्टुडिओला आग लागली. अग्निशमन दलाचे लोक तिथं पोहोचले त्याआधीच बघ्यांची प्रचंड गर्दी जमलेली होती. स्टुडिओत असलेली आग विझवण्याची साधने वापरून आग विझवण्याचा आणि कांबळे यांची स्वतःची व त्यांच्या संग्रहातील इतरांची चित्रे व शिल्पे तसेच बाकी साधनसामग्री वाचवण्यासाठी कांबळे स्वतः व त्यांचे मित्र प्रयत्न करत होते. त्याहीवेळी त्यांना मदत करण्याऐवजी आगीसमोर सेल्फी काढणे, जळत्या स्टुडीओचे फोटो काढणे, व्हिडीओ घेणे असे नसते उद्योग करणाऱ्या लोकांची संख्या ही मदत करणाऱ्या तुरळक लोकांच्या संख्येपेक्षा मुबलक होती. हे चित्र अत्यंत लाजिरवाणं आहे, असं आपल्याला वाटत नाही का? की हा स्टुडीओ त्यांच्या ‘वैयक्तिक’ मालकीचा होता, तो जळून नष्ट होणं यात त्यांचं ‘वैयक्तिक’ नुकसान होतं... समाजाला काय त्याचं? – असंच लोकांना वाटतंय?
की तुम्ही कशाचंच काही न वाटून घेणारे, भूमिका घेण्याकडे तुच्छतेने पाहणारे, अलिप्ततेचा आव आणत संवेदनाहीनतेकडे झुकत चाललेले, सिलेक्टिव्ह भावनिक होणारे, ‘तटस्थोत्तम’ आहात? असाल तर तुमच्या ‘वैयक्तिक’ आयुष्यात सारे सुबक राहावे आणि कुठल्याही अडचणी, त्रास, संकटे तुमच्यावर कोसळू नयेत यासाठी शुभेच्छा!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)