एक्स्प्लोर
विश्वचषक कुणीही जिंको, बोलबाला क्रोएशियाचाच
ल्युका मॉडरिचच्या क्रोएशियानं भल्याभल्यांचा अंदाज चुकवून फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. विश्वचषकाची फायनल गाठण्याची क्रोएशियाची ही पहिलीच वेळ आहे. जगाच्या नकाशावर क्रोएशियाचं अस्तित्व निर्माण होऊन आज केवळ २७ वर्षे झाली आहेत. एवढ्या तरुण देशानं जेमतेम ४१-४२ लाखांच्या लोकसंख्येतून फुटबॉलची चॅम्पियन टीम घडवावी, ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. क्रोएशियाच्या या यशाचं नेमकं गमक काय आहे?
आधी इव्हान पेरिसिच आणि मग मारियो मानझुकिचनं गोल झळकावलेल्या गोलनी अखेर क्रोएशियाचं स्वप्न साकार झालं. रशियातल्या फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये खेळणारा क्रोएशिया हा दुसरा संघ ठरला. रशियातल्या मॉस्कोच्या रणांगणात क्रोएशियानं खरोखरच कमाल केली. ल्युका मॉडरिचच्या या फौजेनं हॉट फेव्हरिट इंग्लंडचं आव्हान २-१ असं उधळून लावलं आणि वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी पहिल्यांदाच विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट बुक केलं. धक्का बसला ना? पण होय, क्रोएशियाचं वय सत्तावीस वर्षच आहे.
वास्तविक मूळच्या युगोस्लाव्हियातही क्रोएशियाचं अस्तित्त्व होतं. पण युगोस्लाव्हियाचं विघटन होऊन रिपब्लिक ऑफ क्रोएशिया राष्ट्राची स्वतंत्र निर्मिती झाली ती 1991 साली. त्याआधी मूळचा युगोस्लाव्हियाच फिफा विश्वचषकात सहभागी होत होता. क्रोएशियाच्या निर्मितीनंतर तो देश 1994 सालच्या पहिल्या विश्वचषकात सहभागी झाला नाही. पण 1998 साली क्रोएशियानं पहिल्याच फटक्यात विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. पण फ्रान्सकडून झालेल्या 2-1 अशा पराभवानं क्रोएशियाचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आलं. मग क्रोएशियानं हॉलंडवर 2-1 अशी मात करून 1998 सालच्या विश्वचषकात तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळवला.
आज बीस साल बाद विश्वचषकाच्या व्यासपीठावर पुन्हा बोलबाला आहे तो क्रोएशियाचा. झ्लाटको डॅलिच गुरुजींच्या पठ्ठ्यांचा... म्हणजेच ल्युका मॉडरिचच्या फौजेचा. जर्मनी, अर्जेंटिना, ब्राझिल आणि स्पेनसारख्या संभाव्य विजेत्यांवर उपांत्य फेरीआधीच पराभूत होण्याची वेळ आलेली असताना क्रोएशियानं मात्र थेट फायनलमध्ये धडक मारावी याचं साऱ्या फुटबॉलविश्वाला राहून राहून नवल वाटत आहे. तुम्हाआम्हाला प्रश्न पडला आहे की, क्रोएशियाच्या या यशाचं गमक आहे तरी काय? पण खरं तर या प्रश्नाचं उत्तर क्रोएशियातही कुणाकडे नाही.
क्रोएशियाची लोकसंख्या अंदाजे 41-42 लाखांच्या घरात, म्हणजे आपल्या मुंबईच्या लोकसंख्येच्या एक पंचमांश आहे. क्रोएशियाचं क्षेत्रफळ हे 56594 चौरस मीटर्स भरतं. याचा अर्थ 307713 चौरस मीटर्सच्या महाराष्ट्रात अंदाजे पाच क्रोएशिया सहज बसू शकतील. एवढ्या चिमुकल्या भूभागातून फुटबॉलची एक चॅम्पियन टीम उभी राहते, याचं कौतुक करायलाच हवं.
क्रोएशिया 1998 सालापासून सहापैकी पाच विश्वचषकांसाठी पात्र ठरला आहे. या सातत्यपूर्ण यशामागं एखादा फॉर्म्युला आहे का, या प्रश्नावर क्रोएशियाच्या फुटबॉल डेव्हलपमेन्टचे माजी प्रमुख रोमियो जोझाक यांच्याकडेही उत्तर नाही. त्यामुळं इतिहासावर नजर टाकायची झाली तर, क्रोएशियाला फुटबॉलची गोल्डन जनरेशन लाभली ती मूळच्या युगोस्लाव्हियाकडून. 1987 साली युगोस्लाव्हियानं चिलीत अंडर ट्वेन्टी वयोगटाचा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. युगोस्लाव्हियाची ही तरुण पिढी भविष्यात खूप मोठा पराक्रम गाजवेल असा अंदाज जाणकारांनी वर्तवला होता. पण चारच वर्षांत म्हणजे 1991 साली सुरू झालेल्या बाल्कन युद्धात युगोस्लाव्हियाचं अस्तित्वच संपून गेलं. पण चिलीतल्या गोल्डन जनरेशनमधून क्रोएशियाला रॉबर्ट यार्नी, झ्वोनिमिर बोबान, डावोर शुकेर, इगोर स्टिमाच आणि रॉबर्ट प्रोसिनेकी या गुणवान खेळाडूंची देणगी मिळाली. त्याच शिलेदारांनी पहिल्यांदाच क्रोएशियाची जर्सी परिधान करून, 1998 साली क्रोएशियाला विश्वचषकात तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळवून दिला.
त्यानंतर गेल्या वीस वर्षांत एखाद्या फुटबॉल राष्ट्राला साजेशी अशी अॅकॅडमी सिस्टिम क्रोएशियात तयार झालेली नाही. क्रोएशियातल्या फुटबॉलच्या पायाभूत सुविधा खूप ग्रेट आहेत असंही नाही. त्यांच्या युवा विकास कार्यक्रमात फुटबॉलविषयक धोरण नाही. या परिस्थितीत क्रोएशियासाठी आशेचा किरण ठरली ती तिथल्या लहानथोरांची फुटबॉलसाठीची समर्पित वृत्ती, आनुवंशिक शरीरयष्टी, प्रखर राष्ट्राभिमान आणि 1998 सालच्या यशानं दिलेली प्रेरणा.
क्रोएशियातल्या डायनॅमो झॅगरेब अॅकॅडमीनं ल्युका मॉडरिच, डेआन लॉवरेन, शिमे वरसालको, मारियो मानझुकिच आणि माटेओ कोवाचिच यांच्यासारखे गुणवान खेळाडू डझनानं घडवले. हीच मुलं आज मोठी होऊन रशियातल्या फिफा विश्वचषकात क्रोएशियाचा झेंडा डौलानं फडकावा म्हणून चिकाटीनं संघर्ष करत आहेत. त्याच चिकाटीनं, त्याच संघर्षानं क्रोएशियाला फिफा विश्वचषकाच्या फायनलचं दार उघडून दिलं आहे.
संबंधित ब्लॉग : फ्रान्सला ‘बीस साल बाद’ पुन्हा विश्वचषकाचा मान?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement