Vikram Gokhale: भूमिका जगणारा आणि भूमिका घेणारा कलावंत!
देखणं व्यक्तिमत्त्व, भेदक नजर, उच्चारांमधली स्पष्टता, अत्यंत जीव ओतून केलेला अभिनय यांचा संगम अर्थात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) आपल्याला सोडून गेलेत. अभिनयातलं एक पर्व काळाच्या पडद्याआड गेलंय.
विक्रम गोखलेंनी केलेल्या कलाकृती संख्येने त्यांच्या चाहत्यांना कदाचित कमी वाटतीलही. पण, त्यांच्या अभिनयाची उंची आणि खोलीही कमाल होती. ते साकारत असलेल्या भूमिकेच्या लांबीपेक्षा त्याच्या डेप्थचाच त्यांनी कायम विचार केला. हे त्यांनी निवडलेल्या भूमिकांमधून कायम पाहायला मिळतं.
पडद्यावर आल्यावर किंवा मंचावर एन्ट्री घेतल्यावर तो पडदा किंवा मंच व्यापून टाकण्याचं कौशल्य त्यांच्याकडे होतं. मला त्यांचे मराठीतील काही सिनेमे फार भावलेत. बाळा गाऊ कशी अंगाई, वजीर, कळत नकळत, माहेरची साडी, लपंडाव तसंच नटसम्राट हे त्यापैकीच. या सिनेमांमधून त्यांच्या अभिनयाच्या अफाट रेंजचा अंदाज येतो. 'बाळा गाऊ कशी अंगाई'मध्ये नयनतारा आणि आशा काळेंसोबत त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. तर, 'कळत नकळत'मध्ये कुटुंबवत्सल नवरा आणि मुलांचा लाडका असलेल्या पित्याचा अवचित क्षणी जेव्हा पाय घसरतो, तेव्हाचं त्यांनी दाखवलेलं ट्रान्झिशन कमाल होतं. इथे सविता प्रभुणे आणि अश्विनी भावे त्यांच्या सहकलाकार. तर, 'माहेरची साडी'मधील कठोर पिता ते मुलीच्या वियोगानंतर कोलमडून पडलेला असहाय्य बाप असा प्रवास चितारताना त्यांनी काळजाला हात घातलेला. 'वजीर' हे केवळ मराठी सिनेसृष्टीतलंच नव्हे तर गोखलेंच्या अभिनय कारकीर्दीतलंही एक मानाचं पान आहे, असं मला वाटतं. अशोक सराफ-विक्रम गोखले यांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्यातल्या सिनेरसिकाला तृप्त करते. राजकारण केंद्रस्थानी असलेल्या या सिनेमात दोघांचीही संवादफेक, नजरेने बोलणं हा अनुभव तर पुन्हा पुन्हा घेण्यासारखा.
'लपंडाव' हा गोखलेंच्या 'Style of Acting' च्या तुलनेने तसा वेगळा सिनेमा. हलक्या फुलक्या अंगाने जाणाऱ्या या सिनेमातही गोखलेंनी आपला ठसा उमटवलाय. 'नटसम्राट'मध्ये तर नाना पाटेकर-विक्रम गोखले हे दोन अभिनयसम्राट उभे ठाकले होते. त्यातील या दोघांचे एकमेकांसोबतचे सीन पाहणं हीदेखील पर्वणीच.
'अनुमती' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार, तसंच 'आघात' सिनेमाचं त्यांनी केलेलं दिग्दर्शन हे त्यांचे करिअर हायलाईट्स.
आपल्या सशक्त अभिनयाने 50 हून अधिक वर्षे नाट्य,सिने, मालिकांचं क्षेत्र गाजवणाऱ्या गोखलेंनी हिंदीतही आपलं नाणं खणखणीत वाजवलं. अग्निपथ, खुदा गवाह, हम दिल दे चुके सनम ते भुलभुलय्यापर्यंतचे अनेक सिनेमे चटकन ओठांवर येतायत. 'अग्निपथ'मध्ये अमिताभ-विक्रम गोखलेंची बॅटिंग केवळ अफलातून. पोलीस स्टेशनमधील या दोघांचा सीन मनाच्या कोपऱ्यात कायम घर करुन राहिलाय.
'क्या नाम क्या है तुम्हारा?' असा कमिशनर गायतोंडेंचा प्रश्न आणि त्यावर बिग बींनी अर्थात विजय दीनानाथ चौहान यांनी आपल्या बेसच्या आवाजात स्वत:ची करुन दिलेली ओळख. आपली नजर स्क्रीनवरुन हटत नाही. त्याला कळस चढवणारा 'आज मौत के साथ अपना अपॉईंटमेंट है..'सारखा बच्चन यांचा डायलॉग. अभिनयाची दोन विद्यापीठं समोरासमोर पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलंय. ही जोडी आणखी एकदा 'खुदा गवाह'च्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळाली. त्यातला 'खुद ही जान बचाता है, खुद ही हथकडी पहनाना चाहता है..असा अमिताभ यांचा प्रश्नार्थक संवाद आणि त्यावर 'जान बचाना इन्सानियत थी, बादशाह खान.. हथकडी पहनाना फर्ज', हे पोलीस अधिकारी असलेल्या विक्रम गोखलेंनी दिलेलं रोखठोक उत्तर आजही कानात आणि मनात रुंजी घालतंय. विक्रम गोखलेंची भेदक नजर हा त्यांच्या अभिनयातला स्ट्रेंथ पॉईंट होता. तितकंच परिणामकारक होतं त्यांचं पॉझेसमधून बोलणं. शब्दांपेक्षा बरंच काही सांगून जाणारं. बिटविन द लाईन्स आशय लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या क्षमतेला खरंच सॅल्यूट आहे. त्यांच्या अभिनयातील सहजताही मनात घर करुन राहते.
सिने पडद्याप्रमाणेच टीव्ही मालिकेतही त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्यात. 'या सुखांनो या'मधील त्यांचा रोल मला इथे चटकन आठवतो. टायटल साँगवेळचा त्यांचा तो लूक आजही डोळ्यासमोरुन हटत नाहीये.
अभिनयाशिवाय अँकरिंगचं मैदानही त्यांनी गाजवलंय. एबीपी माझाच्या 'सिंहासन' मालिकेचं त्यांचं अँकरिंग मनाला स्पर्शून जाणारं असंच. त्यातही वाक्यातले पॉझेस, शब्दांची फेक, उच्चारांमधली स्पष्टता. पुन्हा एकदा पडदा व्यापून टाकण्याची ती हातोटी.
दूरदर्शनच्या 'दुसरी बाजू' या मुलाखतींच्या मालिकेतले त्यांचे अनेक एपिसोडही मी पाहिलेत. मला इथे या मालिकेच्या 100व्या एपिसोडबद्दल सांगावं वाटतंय. त्या भागाच्या पाहुण्या होत्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता. त्यांचं स्वागत करताना विक्रम गोखलेंनी आधी त्यांना वाकून नमस्कार केला आणि मग म्हणाले, आज तुमच्या या शिष्याशी तुम्ही हातचं राखून न ठेवता बोलायचंय. बाई, तुम्ही आम्हाला माहिती आहात. आमच्या पुढच्या पिढीला थोड्याशा माहिती आहात. पण, त्यानंतरच्या पिढ्यांना तुम्ही माहिती नाही, हे काही बरोबर नाही. म्हणून मी हा खास एपिसोड तुमच्यासोबत करतोय. तुम्ही जेवढं सांगता येईल तेवढं सांगा. पुढच्या पिढीला भरभरुन द्या.
विक्रम गोखलेंच्या मनातलं विजया मेहतांबद्दलचं अर्थात आपल्या गुरुबद्दलचं स्थान अधोरेखित कऱणारा हा संवाद. स्टेज आर्टिस्टचा बेस असलेल्या गोखलेंनी 'बॅरिस्टर'सारख्या अनेक नाटकांमधून रंगमंचावरही आपली अभिनय पताका फडकत ठेवली.
कला क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही ते कार्यरत राहिले. याशिवाय एखाद्या विषयावर ज्याला स्टँड घेणं किंवा भूमिका घेणं असं आपण म्हणतो, तेही त्यांनी नेहमीच केलं. ज्यावर मतमतांतरं आली, चर्चा झाल्या. तरी ते भूमिका घेण्यापासून मागे हटले नाहीत. त्यांच्या अभिनयातल्या ठामपणासारखाच त्यांच्या भूमिका घेण्यातही ठामपणा असायचा. पडद्यावरच्या भूमिका अक्षरश: जगणाऱ्या आणि दैनंदिन आयुष्यातही जगताना अत्यंत थेटपणे भूमिका घेणाऱ्या आणि तितक्याच परखडपणे ती मांडणाऱ्या मनस्वी कलावंताने आज आपला निरोप घेतलाय. काळजातला एक कप्पा त्यांच्यासाठी कायम रिझर्व्ह राहील.