BLOG : जलसिंचन घोटाळ्याची 'ती' गोष्ट
BLOG : हॅलो मॅडम, मी निसार खत्री बोलतोय. तुम्ही मला फोन आणि मेसेज केलेत पण मला बोलता आलं नाही. मला तुम्हाला भेटायचंय आणि काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत.
जवळपास महिनाभर मी प्रयत्न करत होते पण निसार खत्री काही माझ्या फोनला उत्तर द्यायला तयार नव्हता. अचानक त्याचा फोन आल्याने मला जरा आश्चर्यच वाटलं पण गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या माझ्या स्टोरीतला एक महत्वाचा दुवा एकदाचा सापडला म्हणून बरंही वाटलं...
निसार खत्री आणि त्याच्या कंपनीच्या बाबतीत ज्या बातम्या मी गेले काही दिवस एबीपी माझा वर दाखवत होते त्याचा विचार करता या व्यक्तीला मी बाहेर एकट्याने भेटणं टाळणं जास्त बरं होतं.
त्यामुळे ऑफीसलाच भेटायला या असं सांगून आणि वेळ ठरवून मी फोन ठेवला. खरं तर निसार खत्री ऑफीसला यायला टाळाटाळ करत होता, पण नंतर तयार झाला... निसार खत्री भेटायला ऑफीसला येतोय असं म्हटल्यावर बॉससह सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या...
शेवटच्या क्षणी कॅमेराची जुळवाजुळव करणं कठीण होतं.. "अरे कॅमेरा अरेंज करा, तो चारशे कोटींचे तेराशे कोटी करणारा जादूगार येतोय ऑफीसला, काय म्हणतोय ते रेकॉर्ड करा."
संध्याकाळी सातच्या सुमारास निसार खत्री ऑफीसला अवतरला..
पहिल्या मजल्यावरच्या ऑफीसला त्यांना भेटल्यावर मी त्यांना घेऊन थेट सातव्या मजल्यावरच्या कँटीनमध्ये गेले.
कॉफी ऑर्डर केली.
"बोला तुम्हांला काही बोलायचं होतं."
"मॅडम तुम्ही त्या धरणाच्या आणि आमच्या कंपनीबाबतच्या बातम्या करताय त्याबद्दल जरा बोलायचं होतं" निसार खत्री शब्द अत्यंत जपून उच्चारत होता बहुधा त्याला दुसरंच काहीतरी बोलायचं होतं पण बोलावं की नाही या विचारात तो असावा...
"तुमचं जे काही म्हणणं असेल ते मला समजून घ्यायचं आहे".
आम्ही हे बोलत असताना मागून कॅमेरामन आला.. फ्रेम कशी लावू, असा विचारणारा कॅमेरामनचा आवाज आला आणि खत्रीने मागे वळून पाहिलं. कॅमेरा पाहून तो चमकला आणि कॅमेरा कशाला आणला असा थेट पण जरा घाबरलेल्या आवाजातला प्रश्न त्याने मला विचारला..
मी सांगितलं की इतकी मोठी बातमी आहे तुमचं म्हणणं जाणून घेणं गरजेचं आहे.. नाही पण मला जरा वेगळंच बोलायचं होतं असं काहीसं अस्पष्ट बोलून फोन घेऊन निसार खत्री बाजूला गेला.. पुढच्या मिनिटाला तो टेबलाजवळ आला आणि खाली कोणीतरी आलंय मला जायला हवं लगेच पाच मिनिटांत परत येतो, असं म्हणून तो खाली गेला.. सातव्या मजल्यावरच्या खिडकीतून मी खाली पाहिलं तेव्हा तो गाडीजवळ फोनवर बोलत होता.. मी पुन्हा फोन केला तेव्हा निसार खत्रीने मला सांगितलं की, त्याचा कोणीतरी नातेवाईक रूग्णालयात दाखल झाला होता आणि त्याला जाणं गरजेचं होतं. तो गाडीत बसून निघून गेल्याचं मी सातव्या मजल्यावरून पाहिलं. निसार खत्री पळून गेला हे मला लक्षात आलं आणि मी न्युजरूममध्ये परत आले. निसार खत्रीशी झालेली ती माझी पहिली आणि अखेरची भेट..
निसार खत्रीने त्यानंतर माझ्या एकाही फोनला किंवा मेसेजला प्रतिसाद दिला नाही..
निसार खत्री हा एफ ए कन्स्ट्रक्शनमधील पार्टनर होता.. आणि एफ ए कन्स्ट्रकशन ही कंपनी महाराष्ट्रातल्या जलसिंचन घोटाळ्यातली प्रमुख सूत्रधार होती... 2012 च्या मार्च महिन्यात एबीपी माझाने बाळगंगा धरणाच्या कामात सुरू असलेल्या बेबंदशाही कारभाराचा पर्दाफाश केला आणि दोनच दिवसांत हा घोटाळा म्हणजे महाराष्ट्रभर पोसल्या गेलेल्या जलसिंचन घोटाळ्याच्या हिमनगाचं फक्त एक टोक आहे हे स्पष्ट व्हायला लागलं..
ही गोष्ट आहे 2012 सालची.
रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा नदीवर धरण बांधलं जातंय आणि लोकांचा विरोध असूनही जमिनी घेतल्या जातायत, अशी माहिती मला मिळाली. काय आहे ती बातमी जागेवरच जाऊन करावी म्हणून मी धरणावर गेले.. इकडे तिकडे टोकाची गरीबी असलेल्या गावांमध्ये धरणाचं काम सुरू झालं होतं.. खरं तर धरणाची जागा म्हणजे निसर्गानं दिलेलं दानंच होतं.. तीन बाजूंनी डोंगर पाणी अडवण्यासाठी सज्ज होतं.. एक भिंत तेवढी उभी करायची होती.. भिंतीला लागणारा सगळा दगड थेट धरणाच्या पोटातच उपलब्ध होता.. तो वाहून नेण्याचीही गरज नव्हती.. परिणामी 2015 साली जे धरण पूर्ण व्हायला हवं होतं ते 2011 सालीच पूर्ण झालं होतं..
एरवी आपल्या सरकारी कामांमध्ये अशी तत्परता शोधून सापडली नसती पण बाळगंगा त्याला अपवाद होतं.. कारण बाळगंगा धरण म्हणजे सगळ्या संबंधितांसाठी मोठं घबाड होतं आणि त्या घबाडातला वाटा लवकरात लवकर आपल्या पदरात पडावा यासाठी मंत्र्यांपासून ते धरणाच्या इंजिनीअर पर्यंत प्रत्येकजण अगदी व्यवस्थित झटत होता. खरं तर वेळेआधी काम पूर्ण झालं तर त्यामुळे पैशांची बचत होते पण बाळगंगा धरणाच्या बाबतीत मात्र काम वेळेआधी पूर्ण झालं म्हणून धरणाची किंमत तब्बल तिपटीने वाढली. 380 कोटींचं धरणाचं काम तब्बल 1200 कोटींवर पोहोचलं. या धरणाचं कंत्राट निसार खत्रीच्या एफ ए कंन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलं होतं. बातमी प्रसिद्ध झाली आणि महाराष्ट्रात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या, फोन खणखणायला लागले आणि बाळगंगा हे फक्त धरण नव्हतं तर जलसंपदा खात्याच्या लुटमारीच्या हिमनगाचं फक्त एक टोक होतं हे स्पष्ट व्हायला फक्त काही दिवस पुरले.
बाळगंगा धरणाची बातमी महाराष्ट्रासमोर आली आणि त्यानंतर लगेचच मला माहिती मिळाली ती रायगड जिल्हयातल्याच कर्जत तालूक्यातल्या कोंढाणे धरणाची. कोंढाणे हा लघुप्रकल्प होता. यात पाण्याची फार मोठी साठवणूक होणार नव्हती पण आजूबाजूच्या गावांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा होता. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर सुटणारच होता वर थोडीफार जमीनही सिंचनाखाली येणार होती. साठ ते सत्तर कोटींचा हा प्रकल्प होता. अचानक एका रात्रीत हा प्रकल्प मध्यम प्रकल्प म्हणून बदलला गेला आणि त्याची किंमत थेट सहाशे कोटींवर पोहोचली. ही अद्भूत लुटमारी किमया साधणाऱ्या टोळीत रायगडचेच असणारे जलसंपदा मंत्री, कोकणाचा जलसंपदा विभाग यांच्यासोबतच तिसरा कलाकार होता तो म्हणजे एफ ए कन्स्ट्रक्शन.
एफ ए कन्स्ट्रक्शन या नावाभोवतीचा गुंता आता वाढायला लागला होता. एफ ए कन्स्ट्रक्शनला राज्य सरकारने खोऱ्याने धरणांची कंत्राट बहाल केली होती आणि हे करत असताना अर्थातच नियमांचा, कायद्याचा कसलाही धरबंध नव्हता. माजी जलसंपदा मंत्री यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ज्या धरणांच्या किंमती वाढवण्यात आल्या त्यासाठी तर कागद एकाच दिवशी रायगड, नवी मुंबई, ठाणे, मुंबई अशा चार जिल्ह्यातून एकाच दिवशी फिरले. सगळ्या कागदांवर एकाच दिवशी सह्या झाल्या. अर्थातच रस्त्याने किंवा रेल्वने हा प्रवास शक्य नव्हता.. हेलिकॉप्टर वापरल्याचा काही पुरावा नव्हता त्यामुळे ही किमया जलसंपदा खात्याने कशी साधली हा प्रश्न अधिकृतपणेतरी अजूनही अनुत्तरीतच आहे. पण कायद्याच्या रखवालदारांनी, कायद्याच्या चौकटीत राहून, दिवसाढवळ्या एकत्रितपणे केलेली लुट हा मुद्दा लक्षात घेतली तर ही कार्यपद्धती त्यांनी नक्की कशी साधली असेल हे कळायला फार तीक्ष्ण बुद्धीची आवश्यकता नक्कीच नाही.
एफ ए कन्स्ट्रक्शनने कोकणात आणखी किती धुमाकूळ घातलाय याची माहिती घेण्यासाठी मी कोकण भुवनमधलं जलसंपदा खात्याचं ऑफीस गाठलं. ऑफीसच्या बाहेर एक महिला कर्मचारी माझ्याकडे आल्या. मला अधिकाऱ्यांना भेटायचं आहे, आणि मला धरणांचा माहिती हवी आहे असा मेसेज मी त्या बाईंकडे दिला सोबत माझं कार्डही दिलं. बाई केबिनमध्ये गेल्या आणि दुसऱ्याच क्षणाला बाहेर आल्या ते साहेब मिटिंगमध्ये बिझी आहेत, आज भेटू शकणारच नाही असा निरोप घेऊन. मी वाट पाहते मिटींग संपली की भेटायला सांगा, मला अगदी थोड्याच वेळासाठी भेट हवीय असा उलटा निरोप मी आत पाठवला. बाई पुन्हा बाहेर आल्या आणि आता साधारण दरडावल्याच्या आवाजात मला म्हणाला, साहेबांना वेळ नाही तासाभराने जमलं तर थोडा वेळ भेटतील, तुम्ही उद्याच या. मी शांतपणे बसून राहिले. अर्ध्या तासातच केबिनमधली मिटिंग संपली, काही माणसे बाहेर आली, पण माझी अधिकाऱ्यांशी भेट व्हायची काही लक्षणं दिसेनात. बाई आत बाहेर करत होत्याच.
तासाभराने मी बाईंना पुन्हा एकदा साहेबांना विचारा असं सांगितलं तर आधीपेक्षा जरा जास्तच जरब आवाज आणून बाईंनी सांगितलं की, मिटींग अजूनही सुरूच आहे आणि तुम्ही भेटू शकत नाही. ही सरकारी कार्यालयं जनतेच्या पैशातून चालतात याचा बाईंना नक्की विसर पडला होता. मी माझी बॅग उचलली, बाईंच्या बाजूने आत जायला लागले तसं तुम्ही आत जाऊ शकत नाही असं ओरडून सांगण्याचा आणि मला अडवण्याचा बाईंनी प्रयत्न केला तोपर्यंत मी थेट दरवाजा उघडून केबिनमध्ये प्रवेश केलाही होता. अवघ्या केबिनमध्ये जेवणाचा वास पसरला होता. पायावर पाय टाकून, समोरच्या ताटातल्या पदार्थांवर ताव मारत दोन्ही अधिकारी निवांत गप्पा मारत होते. माझ्या अशा अचानक आत येण्याने दोघेही दचकले. शांतपणे मी माझी ओळख दिली. अधिकाऱ्याने बाईंना नजरेनेच बाहेर जायला सांगितले. मला कोकण विभागात आणखी किती धरणांची कामं सुरू आहेत, त्यांची मुळ आणि राखीव अंदाजपत्रकं काय आहेत आणि ही कामं कोणत्या कंत्राटदाराला दिलीत याची माहिती हवी होती.. दुसऱ्या दिवशी सगळी माहिती देण्याचं अधिकारी सांगत होता शिवाय जेवणाचा आग्रहही होताच मी दोन्ही अमान्य केल्यानंतर त्यांनी बेल वाजवून फाईल्स आत मागवल्या आणि मला माहिती दिली. मी त्या ऑफीसमधून बाहेर पडले तेव्हा मला खाऊ की गिळू नजरेने पाहणाऱ्या त्या बाईंना पाहून मला मराठीतल्या काही खास म्हणी आठवल्या. कोकणातल्या ज्या धरणांची यादी मला अधिकाऱ्यांनी दिली त्यातील अनेक धरणांची कामं ही एफ ए कन्स्ट्रक्शनलाच देण्यात आली होती. एफ ए चं जाळं इतकं घट्ट होतं की अगदी प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळवणं सुद्धा कठीण होतं.
एफ ए कन्स्ट्रक्शनने अधिकाऱ्यांची जी बडदास्त ठेवली होती त्याला तर तोडच नव्हती. या बडदास्तीची अगदी लहानशी झलक मला बाळगंगा धरणावर पहायला मिळाली. बाळगंगा धरणाची बातमी कव्हर करण्यासाठी मी थेट धरणाचं बांधकाम जिथे सुरू होतं तिथे गेले. धरणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बुडणार होत्या ते अनेक शेतकरी मला पेण-खोपोली मार्गावरच भेटले. तिथपासून धरणापर्यंतचा रस्ता जवळपास आठ दहा किलोमीटरचा होता. माझ्याकडे वाहन होतं मात्र अनेक शेतकऱ्यांकडे कोणतंच वाहन नव्हतं. पण माझ्यासोबत धरणापर्यंत येण्याची इच्छा अनेकांची होती. मग कुणी सायकलवर, कुणी मोटरसायकलवर ट्रिपल सीट करत धरणाच्या भिंतीपर्यंत पोहोचले. धरण बांधून पूर्ण झालं होतं पण धरणाला दरवाजे बसवण्यात आले नव्हते. कारण सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्याशिवाय दरवाजे बसवण्याची परवानगी मिळणार नव्हती. विजय कासाट नावाचे अधिकारी धरणावर उपस्थित होते. मी त्यांच्याशी बोलले धरणाची माहिती विचारली, विजय कासाटांनी मला अगदी मुलाखतही दिली. धरणावर टीव्ही चॅनलची प्रतिनिधी आल्याने कासाट जरा वैतागलेच होते पण गावकऱ्यांसमोर नाराजी दाखवणं त्यांना परवडणारं नव्हतं. भर दुपारी त्या धरणाच्या भिंतीवर उन्हाने अक्षरश: लाहीलाही होत होती. शूट संपेपर्यंत कासाटांनी एक क्षणही मला नजरेआड होऊ दिलं नाही. मी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत होते ती प्रत्येक मुलाखत कासाट कान देऊन ऐकत होते.
अखेर माझं काम संपलं आणि मी निघणार तेवढ्यात कासाटांना मला चहासाठी विनंती केली. तळपत्या उन्हात चहा कोणाला हवाय आणि इथे कुठे चहा मिळणार असे प्रश्न डोक्यात घोळवत प्रश्नार्थक नजरेने मी इकडे तिकडे पाहिलं, तोच कासाटांनी मला वर टेकडीकडे चलण्याची खूण केली. टेकडीवर एक लहानसं घर असावं असं बांधकाम होतं. आम्ही सगळेच तिथे गेलो. कासाटांनी मला आत बोलावलं आणि बाकीचे शेतकरी बाहेर राहतील याची नजरेनेच काळजी घेतली. कासाट काहीतरी बोलत होते पण माझं लक्षच नव्हतं, धरणावरच्या त्या गेस्ट हाऊसमध्ये माझी नजर भिरभिरत होती. मी येण्याआधीच ती रूम थंडगार झालेली होती. चकचकीत जमीन आणि त्यावर महागडे सोफे, महागडे टेबल्स होते. बाजूलाच असलेलं वॉश बेसिनही श्रीमंतीची ओळख देत होतं. आतमध्ये एक दोन बेडरूम्स आणि किचन असावं बहुधा, मी फक्त अंदाज केला. एखाद्या हिल स्टेशनवरच्या अलिशान हॉटेलमधील रूम वाटावी अशी ती व्यवस्था होती. ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी धरणाने आपल्या पोटात घेतल्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे तर भाव एकाच वेळी आश्चर्य आणि संतापाचे होते. याआगोदर त्यांच्यापैकी एकही शेतकरी तिथे पोहोचू शकला नव्हता हे स्पष्टच होतं. आमचं काही जूजबी बोलणं होईपर्यंत एक शिपाई काजू, बदाम, अक्रोड अशा सुक्या मेव्याच्या प्लेट्स घेऊन आला. वर्षानुवर्षे शेतात राबून रापलेल्या चेहऱ्यांवरच्या, खिडकीच्या बाहेरून त्या खोलीत भिरभिरणाऱ्या नजरा आणि समोर आलेला तो सुका मेवा पाहून मला त्या रूममधून कधी बाहेर निघते असं व्हायला लागलं. समोर आलेल्या चहाच्या क्रॉकरीकडे मी फक्त एक नजर टाकली. तिथे उपस्थित सगळ्यांना पुरेसा चहा नव्हता याची कल्पना मला आलीच. कारण बाहेर चहा देताना स्वस्त कप, स्टीलचे पेले, ग्लास असा चहाचा जेमतेम प्रवास सुरू होता. धरणावरच्या अधिकाऱ्यांना मला जी माहिती देता येणं शक्य होतं ती त्यांनी आधीच दिली होती. काही कागदपत्रांची मी मागणी केली ती आमचे साहेब देतील असं त्यांनी आधीच सांगितलं होतं. त्या अधिकाऱ्यांनी मला आनंदाने चहा द्यावा इतके ते माझ्या येण्याने समाधानी नक्कीच नव्हते. मग मला जाणूनबूजून त्या रेस्ट हाऊस पर्यंत नेण्याचे कारण काय हा प्रश्न माझ्या मनात येणं स्वाभाविक होतं. कदाचित त्यांच्या आर्थिक ताकदीचा मला अंदाज यावा इतकंच असेल. जर अधिकाऱ्यांसाठी डोंगरातल्या ओसाड टेकडीवर अशी व्यवस्था होऊ शकते तर मग विचार करा इतकाच संदेश बहुधा माझ्यासाठी होता.
दोन दिवसांत बातमी प्रसारित झाली आणि तिसऱ्याच दिवशी ज्या अधिकाऱ्याकडे कागदपत्र मागितली होती त्यांचा मला फोन आला. कागदपत्र देतोच पण भेटायचं आहे असा त्यांचा सूर होता. आपण ज्यांच्याबाबतीत बातमी करतो, टीका करतो त्यांना भेटायला नकार देणे मला कधीही संयुक्तिक वाटत नाही त्यामुळे मी होकार दिला. माझी ऑफीसची वेळ आणि भेटण्याची जागा याची काही जुळवाजुळव होते का याचा विचार करून मी काही पर्याय सुचवू पाहत होते तेव्हढ्यात त्यांनीच म्हटले की तुम्ही फक्त तुमची निघण्याची वेळ सांगा मी तुमच्या इमारतीखाली येतो. कोणताही अधिकारी माहिती देण्यासाठी इतका उतावीळ नसतो हे कळण्याइतका पत्रकारितेतला अनुभव मी नक्कीच गोळा केला होता. उद्देश फक्त कागद आणि माहिती देणे इतका नाही हे मला कळलं होतं पण मी तरीही धीर करून हो म्हटलं कारण समोरचा माणूस सरकारी अधिकारी होता त्यामुळे मी थोडीफार निर्धास्त होते. एका मित्राला आणि सहकाऱ्याला मी या व्यक्तीला उद्या भेटणार आहे असं सांगितलं होतं. मी करत असलेल्या स्टोरीची त्यांना कल्पना होतीच. मी माझ्या घरापासून काही दूर अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनजवळ या असं त्या अधिकाऱ्यांना सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी घरातून निघण्याआधीच महाशय तिथे येऊन पोहोचले होते. या अधिकाऱ्याचं ऑफीस कोलाडला होतं. तिथून मला ठरलेल्या ठिकाणी भेटायला येणं म्हणजे त्यांचा जवळपास दिवस वाया जाणार होता मात्र तरीही ते आले. मी चालत पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाले. एक चकचकीत काळ्या रंगाची आणि तितक्याच चकचकीत काळ्या काचा असलेली स्कॉर्पिओ गाडी मी चालत असतानाच माझ्या शेजारी येऊन थांबली. ते अधिकारी गाडीतून खाली उतरले. हे काय माझ्या वाटेवर नजर ठेवून होते की काय असा विचार माझ्या मनात आला. आपण कुठेतरी जरा निवांत बसूयात का, असं विचारत त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला. मी गाडीत बसले. आता मी फारशी कम्फर्टेबल नव्हते लवकरात लवकर आपल्याला या गाडीतून बाहेर पडायला हवं इतकंच मला कळत होतं. कारण बातमी टीव्हीवर दिसल्यानंतर मी या अधिकाऱ्यासोबत एका गाडीत बसून फिरते असं कुणी पाहिलं तर त्याचे काय काय अर्थ निघतील याचा मला अंदाज होता. हा आपल्यासाठी लावलेला सापळा तर नाही ना असा तद्दन फिल्मी विचारसुद्धा माझ्या मनात आला. जेमतेम पाच मिनिटांत मला मॅकडीचा बोर्ड दिसला आणि मी पटकन बोलले आपण तिथेच बसूया. मॅकडी मध्ये बसण्याची त्या अधिकाऱ्याची इच्छा नाही हे मला स्पष्ट दिसलं पण मी त्याला कसलीही दाद न देता स्वतच गाडी ड्रायव्हरला तिथे घ्यायला सांगितली. मॅकडी मध्ये उपचार म्हणून काही ऑर्डर केलं आणि हे महाशय टेबलावर येऊन बसलं. काचेतून बाहेर पाहताना कुणी आपल्यावर लक्ष तर ठेवून नाही ना याकडेच माझं लक्ष लागलं होतं. जुजबी चार दोन वाक्य बोललो आणि ते पुन्हा ऑर्डर आणायला गेले. पुन्हा चिप्स खात काही जुजबी बोलणं सुरू झालं. पण त्यांना काहीतरी बोलायचं होतं आणि ते त्यांना बोलायला जमत नव्हतं हे खरं. मी फक्त आणि फक्त धरणाच्या बाबतीत बोलत होते आणि त्यांना नेमकं तेच सोडून काहीतरी बोलायचं होतं. मी ऑफीसची वेळ झाली आहे, असं सांगत निघण्याचा इशारा केला. स्टेशनला सोडतो असं म्हणत त्यांनी मला परत गाडीत बसायला सांगितलं. गाडीत बसताच त्यांनी एक पाकीट माझ्या हातात दिलं. मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहताच मला हवे असलेले कागद आहेत असं सांगितलं. मी पाकीट उघडायला लागताच त्यांनी तुम्ही नंतर चेक करा असं सांगितलं. दोन तीन मिनिटांत गाडी स्टेशनला आली. ट्रेन मध्येच पाकीट उघडायचा बेत होत पण कोणीतही ओळखीचं भेटलं. ऑफीसला मेकअपरूममध्ये गेले आणि पाकीट उघडलं आणि आत पाहिलं तर त्यात नोटांचं बंडल होतं. त्या कितीच्या नोटा होत्या आणि किती होत्या हेही न पाहता मी थेट त्या अधिकाऱ्याला फोन लावला. त्यांना शक्य तितक्या शांत आवाजात सांगितलं की पत्ता द्या मी तुमचं पाकीट कुरिअर करते तुम्ही त्यात काय ठेवलंय ते तुम्हाला माहितीच आहे. त्यांनी मला काहीतरी सांगायचा प्रयत्न केला पण मी काही ऐकायच्या स्थितीत नव्हते. मी आत्ता कुरिअर करते पत्ता द्याच असं म्हणताच वैतागलेल्या सुरात त्यांनी माणूस ऑफीसला पाठवतो दोन तासांत असं सांगितलं. मी फोन ठेवला आणि थेट संपादकांच्या केबिनकडे निघाले. ते न्युजरूममध्येच होते. धरणाच्या अधिकाऱ्याने मला कागदपत्रांच्या नावाखाली पैसे दिलेत आणि मी ते त्याला परत न्यायला सांगितले आहेत असं सांगितलं. ठीक आहे इतकंच त्यांनी म्हटलं. ती गोष्ट फारशी गांभीर्यानं घेण्यासारखी नाही ही त्यांची प्रतिक्रिया मला दिलासा देणारी होती.
ऑफिसला येऊन पळून जाणारा निसार खत्री, धरणावर श्रीमंतीचं दर्शन घडवणारा इंजिनीअर, पैशाचं पाकीट थेट हातात देण्याची हिंमत करणारा अधिकारी, हे तिघेही पुढच्या महिनाभरात जेलमध्ये गेले. काही काळ तिथे मुक्काम केल्यानंतर ते जामीनावर बाहेरही आले. या सगळ्या घोटाळ्याभोवती महाराष्ट्राचं राजकारण केंद्रित झालं आणि आघाडीचं सरकारही पडलं. अर्थात सरकार पडायला फक्त धरण घोटाळाच कारणीभूत नक्की नव्हता पण महत्वाचा नक्कीच होता. ही बातमी प्रसारित केल्यापासून गेल्या जवळपास दशकभरात जनतेसमोर आणि पडद्यामागे अनेक गोष्टी घडल्या, गुन्हे दाखल झाले, चौकशा झाल्या, बैलगाड्या भरून पुरावे आले, अहवाल तयार झाले, जेलच्या वाऱ्या झाल्या, मंत्र्यांचे राजीनामे झाले, यथेच्छ राजकारण झालं आणि शेवटी एका भल्या पहाटे राज्यातलं सगळ्यात अल्प मुदतीचं सरकार स्थापन होत असताना घोटाळा करणारे आणि घोटाळ्याच्या बाबतीत शिरा ताणून ओरडणारे अशा दोघांनी मिळून तो घोटाळा अरबी समुद्रात विसर्जित केला. एका रात्रीत सगळे आरोप धुवून निघाले आणि पुढच्या काही तासांत ते औटघटकेचं सरकारही विसर्जित झालं. हा घोटाळा बाहेर येताच थांबवलेल्या अनेक कामांपैकी काही कामांना त्यावेळी घोटाळ्याच्या विरोधात ओरडणाऱ्या पण आता घोटाळेबहाद्दरांसोबत सत्ता वाटून घेणाऱ्या सरकारने गेल्याच आठवड्यात पुन्हा परवानगी दिली. घोटाळ्याची सूत्रधार असलेल्या एफ ए कन्स्ट्रक्शनला जवळपास क्लीन चीट दिली गेली. त्यासंदर्भातली माहिती वाचली आणि आणि या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
घोटाळ्याबाबत मी लेखात फारशी चर्चा केली नाही. कारण त्यातल्या अनेक बाबी बहुतेकांना माहीत आहेत. पण एक घोटाळा बाहेर येतो तेव्हा पत्रकार अनेक बरेवाईट अनुभव त्याच्या गाठी बांधत असतो त्यातून तोही समृद्ध होतोच. त्याच अनुभवांपैकी काही निवडक अनुभव तुमच्यासमोर मांडले. पण धरण घोटाळ्याच्या बातमीच्या अनुभवाची शिदोरी मोठी आहे.