BLOG | साहित्य संमेलनं आणि वाद : एक अतुट नातं
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं आणि वाद यांचं नातं अतिशय घट्ट असं. नाशिकमध्ये होत असलेलं 94 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनातही ही वादाची परंपरा कायम राहिली. संमेलनापूर्वी अनेक वाद आणि चर्चा घडल्यात. मात्र, पेल्यातील वादळाप्रमाणे ते वाद शमलेत. यामुळेच नाशिकचं साहित्य संमेलन सर्वार्थानं भव्य-दिव्य झालेत असं म्हणावं लागेल. नाशिकच्या संमेलनापुर्वीही अनेक वादांची चर्चा झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत हे साहित्य संमेलन होत असतांना आयोजकांना त्यांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा विसर पडल्याची टीका सावरकरवादी मंडळींनी केली. संमेलनात त्यांच्या योगदानाचा पुरेसा आणि यथोचित सन्मान झाला नसल्याची सल त्यांना मानणाऱ्या लोकांमध्ये होती.
संमेलनात राजकीय व्यक्तींच्या उपस्थितीवरून होणारे वाद नवे नाहीत. या संमेलनानिमित्ताने त्यावरही चर्चा झालीच. यासोबतच या साहित्य संमेलनाचं जे गीत तयार करण्यात आलं आहे, त्या गीतातल्या दृश्यांवरून नव्या वादाला तोंड फुटलं होतं. साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये वापरण्यात आलेल्या दृश्यांवरून आता नवीन वाद निर्माण झाला होता. या गीतात वापरण्यात आलेले व्हिडीओ चोरून वापरण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला आहे. गीतात चोरून इतर कलाकार आणि निर्मात्यांची व्हिडिओ क्लिप वापरणं हा कलाकारांचा अनादर असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत असून थेट साहित्य संमेलनाच्या फेसबुक पेजवरच हा आरोप करण्यात आला होता.
या संमेलनातील ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांना प्रमुख अतिथी म्हणून दिलेलं निमंत्रणही वादाचा विषय ठरला. सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या पाटील यांची काही प्रकरणात चौकशी सुरू असल्याने त्यांना दिलेल्या निमंत्रणावर काहींनी आक्षेप घेतला. तर ग्रंथदिंडीत मराठीतील आद्यग्रंथ समजल्या जाणाऱ्या 'लिळाचरित्रा''ला स्थान नसण्याच्या मुद्द्यावरही आक्षेप घेतला गेला. काल संमेलनाच्या उद्घटनाला संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित राहिलेत. त्यामुळे संमेलनाध्यक्षाच्या अनुपस्थितीवरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
आतापर्यंत 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं झालीत. नाशिकचं साहित्य संमेलन हे 94 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. संमेलन आणि वाद असे समीकरण मराठी संस्कृतीने तयार केले आहे. नव्हे तो संमेलन संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे. संमेलनापूर्वी किंवा संमेलनात वाद घडले नाही तर मराठी समाजाला काहीतरी चुकल्यासारखे वाटते. एवढी अपरिहार्यता या संमेलनांनी तयार केली आहे. ही वाद परंपरा प्रत्येक साहित्य संमेलनाने सांभाळली आहे. अलीकडच्या दोन दशकांतील प्रत्येक संमेलनं साहित्यापेक्षा गाजलीत ती त्यानिमित्ताने घडलेल्या वादांनीच. आतापर्यंतची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं अन त्यात झालेले वाद यांचा हा मागोवा....
काही संमेलनं अन गाजलेले वाद :
पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, 1878 पुणे :
मराठी साहित्य संमेलनातील वादाला मोठा इतिहास आहेय. मराठी साहित्य संमेलनाला 143 वर्षांची परंपरा आहे. अगदी पहिलंच साहित्य संमेलन गाजलं होतं ते वादांनी. मराठी साहित्याच्या समृद्ध प्रवाहाला प्रवाहित करणाऱ्या साहित्य संमेलनाची अन त्यासोबतच्या वादाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली ती अगदी पहिल्याच मराठी साहित्य संमेलनात. पहिलं मराठी साहित्य संमेलन भरलं पुण्याच्या हिराबागेत. वर्ष होतं 1878.. तारीख होतीय 11 मे... या संमेलनाला 'ग्रंथकार संमेलन' असं नाव होतं. या संमेलनाचे अध्यक्ष होतेय न्यायमूर्ती रानडे... मात्र, संमेलनातील वादाची परंपरा सुरू झालीय याच संमेलनापासून....या संमेलनाचं निमंत्रण महात्मा फुलेंनी नाकारलं होतं. शूद्रातिशूद्रांच्या प्रश्नांसह शेतकर्यांच्या प्रश्नांवर या संमेलनात चर्चा होणार नसल्यानं महात्मा फुलेंनी हे निमंत्रण नाकारलं होतं. अन् पहिल्या संमेलनापासून सुरू झालेली वादाची परंपरा आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे.
1932 मधील कोल्हापुरचं मराठी साहित्य संमेलन :
1932 साली कोल्हापूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाला संमेलनाध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाडच वादामुळे अनुपस्थित राहिले होते. या संमेलनातील राजेशाही थाट टिकेचा विषय बनला होता. 1932 साली कोल्हापुरात त्यावेळच्या आयर्विन म्युझियममध्ये (आताचे जिल्हाधिकारी कार्यालय) साहित्य संमेलन संपन्न झाले होते. अध्यक्ष होते महाराजा सयाजीराव गायकवाड. ते येऊ शकले नव्हते. त्यांचे लिखित भाषण वाचून दाखविण्यात आले होते. या संमेलन आयोजनामागे संस्थानी थाटमाट होता. संमेलनादिवशी सैन्यदलाच्या तुकड्या तसेच प्रवेशद्वाराजवळ पिंजऱ्यात चित्ते ठेवले होते. चार हत्तीही बांधून ठेवण्यात आले होते. स्वागताध्यक्ष छत्रपती राजाराम महाराज होते. याही संमेलनात काही वाद झाले होते. त्या काळातील ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वादाची किनार या संमेलनावर होती. ‘केसरी’, ‘राष्ट्रवीर’ या नियतकालिकातून या वादाचे पडसाद त्याकाळात सतत पडले होते. आयोजक, साहित्यिक, वर्गरचना आणि संस्थानी वर्ग यांच्यातील प्रत्यक्षाप्रत्यक्ष तणाव संमेलनकाळात होता.
48 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, 1975, कऱ्हाड.:
संमेलनातील सर्वाधिक गाजलेला वाद आहेय तो 1975 साली कऱ्हाड येथे झालेल्या साहित्य संमेलनातला. या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा दुर्गा भागवत यांनी आणीबाणीविरोधात ठोस भूमिका घेत पद्मश्री पुरस्कार परत केला होता. दुर्गा भागवत यांनी थेट साहित्याच्या व्यासपीठावरून थेट इंदिरा गांधींना आव्हान देत साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या भूमिकेला तेव्हा साहित्य क्षेत्रातून व्यापक पाठिंबा मिळाला होता. यशवंतराव चव्हाणांच्या गावात झालेलं हे संमेलन प्रंचड गाजलं होतंय.
72 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, 1999, मुंबई. :
राज्यात युतीचं सरकार असतांना मुंबई येथील 72 वं मराठी साहित्य संमेलन गाजलं बाळासाहेब ठाकरेंच्या एका वक्तव्यानं. बाळासाहेबांनी साहित्यिकांची संभावना 'बैल' म्हणून केली होती. या टिकेला तेव्हाचे संमेलनाध्यक्ष वसंत बापटांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. बाळासाहेबांनी संमेलनाला सरकार देत असलेल्या अनुदानावरही भाष्य केलं होतं. वसंत बापटांनी साहित्यिक सरकारच्या अनुदानाला 'मोहताज' नसल्याचं सुनावत ते नाकारण्याची भूमिका घेतली होती.
82 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, 2009, महाबळेश्वर :
मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात महाबळेश्वरचं 82 वं साहित्य संमेलन वादामूळे प्रचंड गाजलं होतं. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आनंद यादव यांची निवड झाली होती. आनंद यादव यांनी त्यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीत तुकारामांचे विपर्यास्त चित्रण केले असल्याचा वाद याकाळात निर्माण झाला होता. यामूळे यादव यांनी संमेलनाआधीच राजीनामा दिला होता. अध्यक्षांविना पार पडलेले एकमेव संमेलन अशी या संमेलनाची नोंद झाली होती.
92 वं भारतीय मराठी साहित्य संमेलन, 2019, यवतमाळ. :
अलिकडच्या काळात वादांनी सर्वाधिक गाजलेलं साहित्य संमेलन म्हणजे यवतमाळला 2019 मध्ये झालेलं '92 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन'. यवतमाळचं साहित्य संमेलन हे सर्वार्थाने वादळी ठरले होतं. या संमेलनाच्या उद्घाटिका म्हणून निमंत्रण जेष्ठ इंग्रजी साहित्यिका नयनतारा सहगल यांना देण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या भाषणातील मुद्द्यांवर वाद होऊ शकतो, असं म्हणत आयोजकांकडून त्यांचं निमंत्रण परत घेतल्या गेलं. अन् झालं, संमेलन राहिलं बाजूला.... अन् सुरू झालेत वाद, टीका, आरोप-प्रत्यारोप, राजीनामानाट्य... अन् यातूनच अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांना राजीनामा द्यावा लागला होता. ऐनवेळी संमेलनाचं उद्घाटन वैशाली येडे या आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवेच्या हातानं करण्यात आलं होतं. यात संमेलनाध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांनी विवेकाचा आवाज दाबल्या जात असल्याची भावना व्यक्त करीत सरकारवर जोरदार ताशेरे ओढले होते. तर संमेलनाच्या उद्घाटक असलेल्या शेतकरी विधवा वैशाली येडेंनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सरकार आणि व्यवस्थेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करीत शेतकरी आणि वंचितांचं दु:ख सरकार आणि साहित्याच्या वेशीवर टांगलं होतं.
वाद आणि संमेलनं : एक संक्षिप्त मागोवा :
- 1878 : संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती रानडे... शूद्रातिशूद्रांच्या प्रश्नांसह शेतकर्यांच्या प्रश्नावर या संमेलनाच चर्चा होणार नसल्यानं या संमेलनाचं निमंत्रण महात्मा फुलेंनी नाकारलं होतंय. महात्मा फुलेंनी हे निमंत्रण नाकारलं होतंय.
- 1932 : कोल्हापूर येथील या संमेलनाला संमेलनाध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाडच वादामुळे अनुपस्थित. या संमेलनातील राजेशाही थाट टिकेचा विषय.
- 1974 : इचलकरंजीच्या पन्नासव्या संमेलनात संमेलनाध्यक्ष पु.ल.देशपांडे यांनी राजकीय व्यक्तींच्या वावराबद्दल पहिल्यांदा नापसंती व्यक्त केली होती.
- 1975 : 1 कऱ्हाड येथील या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा दुर्गा भागवत यांनी आणीबाणीविरोधात ठोस भूमिका घेत पद्मश्री पुरस्कार परत केला होताय.
- 1992 : कोल्हापूरला 65 वे साहित्य संमेलन गाजले अध्यक्षपदाच्या निवडणुकीने. त्यावेळी रमेश मंत्री व इंदिरा संत अध्यक्षपदाच्या निवडणुकीस उभे होते. त्यामध्ये रमेश मंत्री निवडून आले. रमेश मंत्री हे लेखक म्हणून कोणत्याच पिढीला माहीत नव्हते.
- 1999 : मुंबई येथील 72 वं मराठी साहित्य संमेलन गाजलं बाळासाहेब ठाकरेंच्या एका वक्तव्यानं. बाळासाहेबांनी साहित्यिकांची संभावना 'बैल' म्हणून केली होतीय. या टीकेला तेव्हाचे संमेलनाध्यक्ष वसंत बापटांनी सडेतोड उत्तर दिलं होतंय.
- 2009 : महाबळेश्वरचं 82 वं साहित्य संमेलन वादामूळे प्रचंड गाजलं होतंय. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आनंद यादव यांची निवड झाली होतीय. आनंद यादव यांनी त्यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीत तुकारामांचे विपर्यस्त चित्रण केले असल्याचा वाद याकाळात निर्माण झालाय. यामूळे यादव यांनी संमेलनाआधीच राजीनामा दिला होताय. अध्यक्षांविना पार पडलेले एकमेव संमेलन अशी या संमेलनाची नोंद झालीय.
- 2013 : चिपळून येथील 86 व्या संमेलनात परशूराम आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव संमेलन स्थळाला देण्यावरून वाद.
- 2019 : यवतमाळ येथील 92 व्या साहित्य संमेलनात उद्घाटक जेष्ठ इंग्रजी साहित्यिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण परत घेतल्यानं वाद.
कौतिकराव ठाले पाटलांच्या पुस्तकात संमेलनांतील वादांवर भाष्य :
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वादांवर प्राचार्य कौतितराव ठाले पाटलांनी 'संमेलनाच्या मांडवाखालून' या पुस्तकांतून प्रकाश टाकला. यात अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील वादांवर प्रकाश टाकत भाष्य केलं आहे.
संमेलनं आणि वाद हे यापुढील काळातही झडत राहणारच. साहित्य संमेलनांतून मराठी साहित्याचा प्रवाह अधिक प्रवाही होण्याचा उदात्त हेतू होताय. मात्र, या संमेलनातील वाद, त्याला आलेले उत्सवी स्वरूप यामूळे संमेलनातलं साहित्य खरंच हरवत आहेय का?, असा प्रश्न निर्माण होतोय. हे थांबणार कधी हाच खरा प्रश्न आहे.