BLOG: भाषा पैशाची : टर्म इन्श्युरन्स म्हणजे नेमके काय?
आपण भाषा पैशाची या सदरामध्ये आर्थिक नियोजनापासून सुरुवात केली होती, यात प्रामुख्याने एखाद्याने आपले वित्तीय नियोजन कसे करावे या बाबत चर्चा करत आहोत. यात प्रमुख विषय म्हणजे टर्म इन्श्युरन्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे पण काही करतो ते आपल्या परिवारासाठी करत असतो. आपल्याला काही झाले तर परिवाराचे काय? याचा विचार करत जरी असलो तरी त्याला प्रत्यक्षात उतरवण्यात आपण कुठे ना कुठे असमर्थ ठरत असतो. आपल्यापैकी किती लोकांनी याचा विचार केला आहे? केला सगळ्यांनी असेल पण त्यासाठी पावले किती जणांनी उचलली आहे हे महत्वाचे आहे. साधारणपणे एक प्रोडक्ट आपल्याला मोठ्या प्रमाणात विकले जाते, ते कुठले??
वार्षिक 70 हजार भरावे, त्यात प्रत्येक पाच वर्षांनी आपल्याला दोन लाखाचा मनी बॅक मिळेल. 25 वर्षांनी 25 लाख मिळतील आणि सोबत 10 लाखाचा इन्शुरन्स असेल वरतून यावर टॅक्स सेव्हिंग सुद्धा घेऊ शकता. आपल्याला जर का लहान पाल्य असेल तर आपल्याला त्याच्या शिक्षणात या मनी बॅकचा उपयोग होईल, गरजेच्यावेळी या एकरकमी 25 लाखाचा फायदा होईल. 10 लाखाचे इन्श्युरन्स आणि टॅक्स सेव्हिंग हे सगळेच उजवे वाटत असल्याने आपण हा प्लॅन खरेदी करतो. कुठला प्लॅन चांगला, कुठला खराब हे कसे ठरवायचे?? वरील नमूद केलेल्या प्लॅनचे कॅल्क्युलेशन जर का मांडले तर असे लक्षात येईल की आपल्याला 6 ते 8% परतावा वरील नमूद केलेल्या प्लॅनमध्ये मिळतो. हा परतावा पुरेसा आहे का? आपण भाषा पैशाचीच्या पहिल्या सदरात बघितले आहे की किमान 6 ते 8 टक्के परतावा आपल्याला मिळावा. म्हणजे वरील प्लॅनमध्ये केवळ आपण महागाईला बिट करतोय.पण परताव्याचे काय? परताव्याच्या नावावर तर हा प्लॅन सपशेल अपयशी ठरतोय... इन्श्युरन्स पुरेसे आहे काय? आपल्याला काही झाले तर घरच्यांना किती मिळावे ?? ह्याचे उत्तर शोधणे महत्वाचे आहे
आत्ताचे वय | 35 |
जोडीदाराचे वय | 33 |
अपेक्षित आयुर्मान | 85 |
किती वर्षाचे नियोजन आवश्यक | 52 |
मासिक खर्च | 30,000 |
वार्षिक खर्च | 3,60,000 |
रिअल रेट ऑफ रिटर्न | 2 टक्के |
किती रक्कम आज असावी | 11572181.97 |
एका पस्तीशीच्या व्यक्तीला किती इन्श्युरन्स कव्हर असावा? ह्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. 35 वयोगटाच्या असलेल्या व्यक्तीचा जोडीदार (महिला किंवा पुरुष असा भेदभाव करत नसून, आजकाल दोघेही अर्थार्जन करणारे असतात असे गृहीत धरले आहे) हा साधारण 33 चा असेल तर आज मला काही झाले तर जोडीदार तर पूर्ण आयुष्य जगेल असे धरून आकडेमोड केली आहे. भारतात आयुर्मान 85 धरले जाते. आंतरराष्ट्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात आयुर्मान वाढले आहे. आणि ते आता 85 च्या घरात आहे म्हणजेच जोडीदार आज जर 33 वर्षाचा असेल आणि मला काही झाले तर माझ्या पश्चात एवढे पैसे असावे जेणेकरून जोडीदार 85 पर्यंत म्हणजे पुढील 52 वर्षे आजची जीवनशैली आहे त्याप्रमाणे जगू शकला पाहिजे.
त्यात आजचा मासिक खर्च 30 हजार रुपये पकडला आहे, म्हणजे वार्षिक खर्च 3 लाख 60 हजार रुपये. आज मला काही झाले तर दरवर्षी 3 लाख 60 हजार माझ्या जोडीदाराला परिवार चालवण्यासाठी प्रति वर्ष मिळत राहावे. ह्यात प्रामुख्याने महागाईला कन्सिडर करणे आवश्यक आहे. कारण पहिल्या वर्षी जे 3 लाख 60 हजार लागणार आहे ते पुन्हा पुढील वर्षी तेवढेच मिळून चालणार नाही. ह्यात महागाई खर्च वाढवेल. दहा वर्षांनी अजून वाढवेल म्हणजेच, 3 लाख 60 हजार प्रति वर्षे कदाचित पुरणार नाही. म्हणजे 52 वर्षे 3 लाख 60 हजार आपण बघितले तर 52 गुणिले 3 लाख 60 हजार म्हणजे 1 कोटी 87 लाख 20 हजार होतात. पण महागाईमुळे हे पुरेसे नाही. आता एक गंमत बघूया. आज काही झाले तर जे ही काही पैसे घरच्यांना मिळतील, ते पैसे काही घरी तिजोरीत ठेवणार नाही. अशा कुठल्या ठिकाणी गुंतवले जातील जिथे जो काही महागाईचा दर असेल त्या पेक्षा केवळ दोन टक्के अधिक परतावा मिळेल.आता जोडीदार/ घरचे काही जोखीम घेणार नाही, कारण जे ही काही आहे ती हीच रक्कम आहे. अशात कॅलक्युलेशन केले तर लक्षात येईल आज मला काही झाले तर घरच्यांना 1 कोटी 15 लाख जवळपास मिळाले, ते महागाईच्या वर दोन टक्के मिळेल अश्या कुठल्या ठिकाणी गुंतवले तर जोडीदाराचे आणि घरच्यांचे आत्ता सारख्या स्तरावर जगणे सुसह्य होईल.
म्हणजे आधी बघितलेल्या उदाहरणानुसार जे ही काही दहा लाख रुपयांचे इन्श्युरन्स आपल्याला पुरेसे वाटत होते तर ते बिलकुल पुरेसे नसून किमान एक कोटीचा इन्श्युरन्स हा असला पाहिजे. त्यासाठी काय पर्याय आहे? एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. जेव्हा केव्हा गुंतवणूक, परतावा, इनश्युरन्स, कर बचत सगळे एकाच ठिकाणी हवे असेल तर कदाचितच काही फायदा होईल. तेव्हा इन्श्युरन्स म्हणजे केवळ इन्श्युरन्स असा विचार करणे आवश्यक आहे. अशात टर्म इन्श्युरन्स एक पर्याय असू शकतो.
टर्म इन्श्युरन्स म्हणजे नेमके काय?
हे आपल्या गाडीच्या इन्श्युरन्ससारखे असते. गाडीला काही झाले नाही तर आपण क्लेम करू शकत नाही तर त्या वर्षीचे प्रीमियम गेले आणि पुढील वर्षी पुन्हा प्रीमियम भरून इन्श्युरन्स रीन्यू करावा लागेल. तसेच व्यक्तीचे सुद्धा असते. एकदा नेमका कितीचा इन्श्युरन्स हवा याचे कॅलक्युलेशन करावे आणि मग त्यासाठी टर्म इन्श्युरन्सचे प्रीमियम किती हे जाणून घ्यावे. 35 वर्षीय व्यक्तीला एक कोटीचा टर्म प्लॅन 25 ते 30 हजारात येईल.
आता तुम्ही म्हणाल की, 30 हजार भरा आणि परतावा शून्य, यात आपण 100 वर्षे जगलो तर घरच्यांना काही मिळणार पण नाही. पण यालाच तर इंश्युरन्स म्हणतात ना. आता आपण भरत असलेल्या 70 हजार प्रतीवर्षे (जे कॅल्क्युलेशन वर बघितले होते, मनी बॅक प्लॅन) त्या पैकी 30 हजार पुढील 25 वर्षे भरेल तर तो व्यक्ती 7 लाख 50 हजार केवळ प्रीमियम म्हणून भरेल त्यात त्याला काही झाले तर घरच्यांना एक कोटी मिळतील आणि उरलेले 40 हजार त्याने 25 वर्षे भरले तर त्याला 56 लाखाच्या जवळपास केवळ 12% वर मिळतील. आणि हीच ताकत आहे इन्श्युरन्स आणि म्युच्युअल फंडचे अचूक आणि योग्य गणित बसवले तर.
तेव्हा आजच आपल्याला कितीचा इन्श्युरन्स कव्हर हवाय ते जाणून घ्या आणि आपल्या एजंटला बोलावून त्वरित टर्म इन्श्युरन्स काढून घ्या. उगाच इतर प्लॅनला बळी पडू नका आणि म्युच्युअल फंड आणि टर्म इन्श्युरन्सचे ब्लेंड हे आपल्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. टर्म इन्श्युरन्स करताना एजंटचा उपयोग करावा. काही हजार वाचवण्याच्या नादात ऑनलाईन टर्म प्लॅन खरेदी केल्यास तुमच्या पश्चात काय सर्व्हिस मिळेल याची खात्री नसते. तसे तर एजंटकडून त्यावरही काही खात्री घेता येत नाही. पण ओळखीच्या एजंटकडून हा प्लॅन घेतला तर किमान शक्यता तरी अधिक आहे की आपल्या पश्चात सर्व्हिस योग्य मिळेल, कारण आधीच परिवार भावनिक अडचणीतून जात असेल अशात आर्थिक बाजू एजंटने सांभाळून घेतली तर मदतच होईल. तेव्हा आजच टर्म प्लॅन घ्या...बघा पटतंय का ??