Nilesh Rane Vs BJP: गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले, रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, म्हणाले, 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही'
Nilesh Rane slam BJP: निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी एका भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकली होती. त्यावेळी घरात मोठ्याप्रमाणावर पैसे सापडले होते.

Nilesh Rane Vs BJP in Sindhudurg: मालवण नगरपरिषद निवडणुकीच्यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्यात संघर्ष रंगला आहे. या संघर्षाने शनिवारी आणखी पुढची पायरी गाठली. कारण, मालवण पोलिसांकडून निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यावर भाजप कार्यकर्त्याच्या घरी बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे निलेश राणे आणि भाजप (BJP) यांच्यातील संघर्ष आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यावर टीकास्त्र सोडले.
माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, हे अपेक्षित होतं. ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस देखील देण्यात आलेली नाही. मात्र, माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आम्ही गुन्हा पकडून दिला, हा आमचा गुन्हा झाला. ज्याने कॅमेरा पकडला होता त्यालादेखील आरोपी करण्यात आले आहे. हे सर्व दबावाखाली सुरु आहे, हे स्पष्ट दिसतंय. तुमची लोकं काही केलं तरी त्यांना मोकाट सोडलं जातं, सगळे अधिकार आहेत. चोरी करा, डाका टाका, पैसे उथळा, त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीत. अजून माझ्यावर दहा केसेस झाले तरी मी पुढचे तीन दिवस यांना सोडणार नाही. आता पोलीस मला अटक कधी करणार, असा सवाल निलेश राणे यांनी विचारला.
गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे. ते किती वेळाने कोणा कोणाच्या नंबरवर फोन करत आहेत, त्यांचा पीए किती लोकांच्या संपर्कात आहे, हे सर्व मला माहिती आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले. या टीकेला आता रवींद्र चव्हाण काय उत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Nilesh Rane news: निलेश राणे यांच्यावर गुन्हा का दाखल झाला?
बेकायदेशीरपणे घरात घुसल्याची तक्रार विजय केनवडेकर यांनी मालवण पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवण पोलीस स्थानकात 189(1),189(2),329(4) 356(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी आमदार निलेश राणे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.189(1) बेकायदेशीर जमाव, 189(2) सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी, 329(4) चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केल्याप्रकरणी आणि 356(2) मानहानी केल्याच्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा























