BLOG | लस मिळणार कधी?
लसीकरणाच्या अनुषंगाने सर्व तयारी झाली असताना लस टोचणीचा मुहूर्त कधी साधणार याकडे आता सर्वाचेच लक्ष लागले आहे.
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने लसीला परवानगी दिली. लस कशी द्यायची याची रंगीत तालीम झाली. लस साठवून ठेवण्याची जागा ठरली. लस कुठे देणार या आरोग्य केंद्राची यादी तयार झाली. सर्वात अगोदर कोणत्या व्यक्तींना लस द्यायची ते ठरलं. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. मग आता लस टोचणार कधी ? या प्रश्नाचे उत्तर अजून तरी देण्यात आलेले नाही. भारतात दोन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यातील एक आहे लंडन येथील ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोव्हीशील्ड लस याचे उत्पादन पुणे येथील सिरम इन्स्टिटयूटमध्ये करण्यात आले आहे. तर दुसरी आहे कोव्हॅक्सीन लस स्वदेशी बनावटीची भारत बायोटेकने आपल्याच देशात विकसित केलेली आणि त्याचे उत्पादनही हैद्राबाद येथेच करण्यात आले आहे. त्यामुळे आता दोन लशींचा पर्याय उपलब्ध असल्याने ( येत्या काळात अजून विविध औषधनिर्मितीच्या कंपन्यांच्या लस येण्याची शक्यता आहे) सरकार कोणती लस घेतं हे उत्सुकतेचे आहे. लसीकरणाच्या मोहिमेसाठी लसीची मागणी मोठी असल्याने सध्याची परिस्थिती पाहता या दोन्ही कंपन्यांची लस सरकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही लशींच्या प्रतिनिधींनी लसीची उपयुक्तता, परिणामकारकता आणि सुरक्षितता केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ञ समोर सिद्ध केली आहे. लसीकरणाच्या अनुषंगाने सर्व तयारी झाली असताना लस टोचणीचा मुहूर्त कधी साधणार याकडे आता सर्वाचेच लक्ष लागले आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीवरून त्यांच्या राज्यात आणि देशात मकरसंक्रांतीपासून लसीकरणास प्रारंभ होईल हे जाहीर केले आहे. संपूर्ण देशात लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम असून या प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच अनेक अफवा पसरण्याचीही शक्यता आहे. पण, अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केलं आहे. देशातील काही राजकारणी लसीच्या अनुषंगाने काही वक्तव्य करीत आहे त्यामुळे नागरीकांच्या मनात लसीकरणाच्या मोहिमेबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. लसीकरणाच्या कार्यक्रमाकडे शास्त्रीय आणि वैद्यकीय दृष्टिकोन ठेवणे पाहणे गरजेचे आहे. यामध्ये कोणतेही राजकरण आणल्यास नागरिकमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकारण्यांनी लसीच्या बाबतीत वक्तव्य करताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. गेलं वर्ष नागरिकांनी कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली काढली असून अजूनही काही काळ परिस्थिती तशीच राहणार आहे. वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, लस हे कोरोनाच्या विरोधातील शस्त्र आहे त्याचा वापर केल्यास या आजारापासून दूर राहण्यास मदत होते. या आजाराच्या विरोधात रोग प्रतिकारकशक्ती लसीमुळे निर्माण होते. त्यामुळे नागरिकांमध्ये लसीला घेऊन कमालीची उत्सुकता आहे.
"आरोग्यच्या या आणीबाणीच्या काळात कोरोनाविरोधातील लस हाच त्यावर उपाय असून, आपतकालीन वापरासाठी मंजुरी म्हणजे शासनाने जो प्राधान्यक्रम ठरविला आहे त्यांना देणे. त्यासाठी चार -पाच महिन्याचा अवधी जाऊ शकतो. त्यानंतरच्या काळात या लसीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यानंतर ती सर्व सामन्याच्या वापराकरिता बाजारात मिळू शकते. डी जी सी आय ची लसीला मान्यता मिळणे खरोखरच आनंददायक बाब आहे. आणखी काही कंपन्यांच्या लसी तोपर्यंत बाजारात येऊ शकतात. लस ही सुरक्षित आहे. त्यासंदर्भात जर कुणी अफवा पसरवत असतील तर त्यावर विश्वास ठेऊ नका." असे राज्य कोरोना विशेष कृती दलाचे अध्यक्ष डॉ संजय ओक यांनी ए बी पी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले.
व्ही जी सोमाणी - भारतीय औषध नियंत्रक, यांनी लसीच्या सुरक्षिततेबाबतीत माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, "आम्ही लशीला परवानगी देताना सुरक्षिततेचा संपूर्ण विचार केला आहे. ही लस 110% सुरक्षित आहे. थोडा ताप, दुखणे आणि साधारण ऍलर्जी सारखे साईड इफेक्टस जे कोणत्याही लशीत असतात. "
ऑक्टोबर 31, 2020 ला ' लस, राजकारण आणि नियोजन ' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, भारतातील नागरिकांसाठी कोरोनाविरोधातील लस हा संवेदशील विषय असून त्यामध्ये कुणी दुजाभाव केल्यास सर्वसामान्य नागरिक खपवून घेणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कारण लस सगळ्यांनाच हवी आहे. अनेक नागरिक या लसची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. कोरोना या विषयाला घेऊन लोकांमध्ये जबरदस्त भीती निर्मण झाली आहे. वैद्यकीय तज्ञांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत लस येत नाही तोपर्यंत सुरक्षिततेचे नियम पाळा असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लस आली की या कोरोनामय वातावरणातून सुटका होणार याची मनाशी खूणगाठ नागरिकांनी बांधली आहे.
सध्याच्या घडीला सगळ्याचं लशीच्या या मानवी चाचण्या सुरु आहेत, त्यात काही कंपन्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, मात्र रशियाचा दावा सोडला तर अद्याप कुणाचीही लस तयार झालेली नाही. औषधनिर्मिती शास्त्रातील सर्व तज्ञ लस तयार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. परंतु ज्यापद्धतीने जागतिक पातळीवर या लशीच्या संदर्भात बातम्या येत आहेत त्यावरून लवकरच ( केव्हा ते माहित नाही ) लस येईल अशी अपेक्षा असल्या कारणाने ती कोणाला आधी द्यायची, त्याचा प्राधान्यक्रम कशा पद्धतीने असणार आहे याच्या नियोजनास केंद्रीय पातळीवर जोरदार तयारी केली. त्याकरिता प्रत्येक राज्यातून आरोग्य कर्मचारी, डॉक्टर ज्यांनी कोरोनाकाळात काम केले आहे त्यांची माहिती मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मोफत कोरोना लशीची घोषणा करण्यात आली होती यावर सर्व स्तरांतून टीका करण्यात आली होती. अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर लस सगळयांनाच देण्यात येईल असेही सांगण्यात आले होते.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून सीरमच्या आणि भारत बायोटेकच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. आपल्या मेहनती शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. डीसीजीआयनं कोरोनावरील सीरम आणि भारतबायोटेकच्या लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. कोरोना विरोधातील उत्साही लढा मजबूत करण्यासाठी हा निर्णायक टप्पा असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. हा निर्णय निरोगी आणि कोविड-मुक्त देश होण्याच्या वाटचालीकडे वेगाने जात असल्याचं द्योतक आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
लसीच्या या परवानगीमुळे आता या कोरोना सारख्या संसर्गजन्य आजराच्या नायनाटाकडे उचलले हे शेवटचे पाऊल असे म्हणण्यास हरकत नाही. लसीकरणाची मोहीम सुरु असताना या लसीच्या कुठल्याही प्रकारचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता अन्न आणि औषध प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र पोलीस विभाग काळजी घेईल असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. लसीकरणाची मोहीम लवकरच चालू व्हावी अशी सर्व सामान्य नागरिकांची इच्छा आहे. यासाठी केंद्र सरकार अजून किती वेळ घेतं याकडे सर्वच राज्यांचे डोळे लागले आहे.