(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | मनुष्यबळ आणायचं कुठून ?
कोरोनाच्या या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे खासगी सेवेतील डॉक्टरांना मदतीला घेतलं जात आहे. ज्या डॉक्टरांनी नर्सिंग होम किंवा क्लिनिक बंद ठेवल्या आहेत, ती उघडण्यासाठी विनंती केली जात आहे. वेळप्रसंगी नोटिसा दिल्या जात आहेत.
>> संतोष आंधळे
या कोरोनामय काळात रुग्णांना बेड कमी पडू नये म्हणून महापालिका प्रशासनाने फील्ड हॉस्पिटलची शहरात उभारणी केली. मात्र ती हॉस्पिटल चालवण्याकरिता लागणारं कंत्राटी कुशल मनुष्यबळ जसं की डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय सहाय्यक, चतुर्थ श्रेणी कामगार ह्या समस्येने व्यवस्थेसमोर मोठं आव्हान उभं केले आहे. फक्त सरकारी नव्हे तर शहरातील खासगी रुग्णालये हे मनुष्यबळ मिळावी म्हणून धावा-धाव करताना दिसत आहेत. राहण्याचं, खाण्याचं आणि चांगल्या पगाराचं आमिष देऊन सुद्धा म्हणावं तितकं मनुष्यबळ शहरात उपलब्ध होताना दिसत नाही. आज जर अनेक वृत्तपत्रातील जाहिराती बघितल्या तर लक्षात येईल की राज्यातील विविध महापालिकांनी कंत्राटी पद्धतीवर हे मनुष्यबळ मिळावं म्हणून जाहिराती दिल्या आहेत. खासगी रुग्णलायांनी तर इतर राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, अशा ठिकाणाहून हे कुशल मनुष्यबळ कस प्राप्त होईल यासाठी शोध मोहीम सुरु केली आहे.
काही दिवसांपूर्वी केरळ राज्यातून काही डॉक्टर आणि नर्सेस आल्या, आणि अजूनही येत आहे. त्याचप्रमणे या शहरात अनेक दिवसापासून कार्यरत असणाऱ्या केरळच्या नर्स हे मुंबई सोडून पुन्हा आपल्या राज्यात परतल्या आहेत. राज्य शासन पूर्ण ताकतीने मनुष्यबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ज्या जिल्ह्यात कमी रुग्ण संख्या आहे त्या जिल्ह्यातील डॉक्टर व नर्सेसचा वापर करता येईल का? याची चाचपणी सुरु आहे. खासगी सेवेतील डॉक्टरांना मदतीला घेतलं जात आहे. ज्या डॉक्टरांनी नर्सिंग होम किंवा क्लिनिक बंद ठेवल्या आहेत, ती उघडण्यासाठी विनंती केली जात आहे. वेळप्रसंगी नोटिसा दिल्या जात आहेत.
मुंबई शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालकाने माहिती न देण्याच्या अटीवर सांगितले की, "आरोग्य सेवेतील तरुण मंडळींनी खरं तर न घाबरता सेवा देण्यास पुढे यायला हवे. सर्व काळजी घेऊन लोकांनी काम केले पाहिजे. पण का कुणास ठाऊक अनेक खासगी रुग्णालयातील नर्सेस घरी निघून गेल्या आहेत. आम्ही आपल्या राज्यात मनुष्यबळ मिळत नाही म्ह्णून बाहरेच्या राज्यात मनुष्यबळ मिळत आहोत का? याची चाचपणी करत आहोत. आम्ही येथे त्यांची चांगली व्यवस्था करत आहोत. मानधन त्यांच्या पदाप्रमाणे आणि कामाप्रमाणे देत आहोत. मात्र अजूनही हवं तितकं मनुष्यबळ प्राप्त झालेलं नाही."
संपूर्ण देशात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात असून बहुतांश जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. शहरातील बऱ्याच लोकांनी गावाकडे धाव घेतल्यानंतर ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे मुख्य शहरांसोबत आता ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर याचा हळूहळू ताण पडू लागलाय. अर्थव्यवस्था सुरळीत करण्याबरोबर नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या व्यवस्था निर्माण करण्यासाठी महापालिकेने शहरात विविध ठिकाणी, तात्पुरत्या स्वरुपाचे शेकडो खाटांचे कोविड केअर सेंटर, स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभारले आहे. काही दिवसापूर्वी या तात्पुरत्या स्वरूपाच्या सेंटर्समध्ये हजारो खाटांची व्यवस्था शहरातील विविध भागात करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात विविध आरोग्याशी संबंधित विभागात 20-25 हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत, त्या भरण्याचा शासनाने या अगोदरच निर्णय घेतला आहे. मात्र त्या कधी भरल्या जातील, याचं उत्तर येणाऱ्या काळातच मिळू शकेल.
राज्य सरकारच्या अखत्यारीत सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि नगरविकास खात्यांतर्गत येणाऱ्या महापालिकेतील रुग्णालये या व्यवस्थेतून नागरिकांना आरोग्याच्या विविध सुविधा नाममात्र दारात मिळत असतात. याच व्यवस्थेवर राज्यातील अनेक नागरिक हे अवलंबून असतात. सगळ्यात मोठा नागरिकांचा भर या रुग्णालयावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे या सर्व व्यवस्थेवर राज्य सरकारचे नियंत्रण असते. या विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असून यामध्ये डॉक्टरांची पदे असून ती नजीकच्या काळात भरण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.
गेल्या महिन्यात, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लष्करातील आरोग्य विभागातून निवृत्त झालेले, तसेच आरोग्य संबंधित प्रशिक्षण घेऊनही हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे नोकरीपासून दूर राहिलेल्यांनी सध्याच्या संकटात पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहन केले होते. तसेच जे कुणी निवृत्त सैनिक आहेत ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे. अनेक निवृत्त परिचारिका, वॉर्ड बॉय, वैद्यकीय सहाय्यकाचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्ती ज्यांना सध्या काम मिळालेलं नसेल, अशा लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असेही सांगितले होते. त्याकरिता खास त्यांनी 'कोविड योद्धा' या नावाने राज्य सरकारने एक इमेल आयडी तयार करून माहितीही मागितली होती. याकरिता प्रतिसाद मिळालाही. मात्र अनेक प्रयत्न करून मनुष्यबळ अजूनही कमीच पडत आहे.
अनेक खासगी रुग्णलायत बेड असून तेथे केवळ कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे त्यांना अतिरिक्त रुग्ण घेता येत नाही. अजूनही शहरात म्हणावी तशी सार्वजनिक वाहतूक व्यस्था चालू झालेली नाही. महत्वाचं म्हणजे लोकल अजूनही बंदच आहे. शहरापासून दूर राहणाऱ्या लोकांना प्रवास करणं कठीण जात आहे.अनेक फिल्ड हॉस्पिटल अजूनही पूर्णपणे भरलेली नाहीत. जर आपल्याकडे वेळेत रुग्णाला उपचार मिळाले तर कोरोनाला अटकाव करणे शक्य होणार आहे. परंतु त्यासाठी गरज आहे ती अतिरिक्त कंत्राटी कुशल मनुष्यबळाची. आजही आपली आरोग्य यंत्रणा ताण पडत असला तरी जीवाची बाजी लावून काम करत आहे. यासाठी खरंतर त्यांच कितीही कौतुक केले तरी कमीच आहे. राज्यासमोर पडलेली ही समस्यांचं निराकरण लवकर होईल अशी अशा व्यक्त करूया.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं