डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
पोलिसांनी घटनेची रितसर फिर्याद नोंदवल्यानंतर, वाघोड गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यावर संशयित आरोपींच्या रावेर शहरातील रेकी मोहिमेची माहिती मिळाली होती.

जळगाव : शहरासह गाव खेड्यातही चैन स्नॅचिंगच्या (Gold) घटनांमध्ये वाढ झाली असून चैन स्नॅचिंगच्या चोरट्यांचं पोलिसांपुढे आव्हान बनलं आहे. रावेर (Jalgaon) तालुक्यात वाघोड फाट्यावरून रस्त्यावरून पायी जात असलेल्या वाघोड येथील रहिवासी शोभा सुरेश पाटील यांच्या गळ्यातून चैन पळवून नेणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. शोभा पाटील ह्या रस्त्यावरुन एकट्या जात असताना महिलेजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोन भामट्यांनी खिरवड रस्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या डोळ्यात माती फेकली. डोळ्यात माती फेकताच गळ्यातील सोन्याची पोत जबरीने ओरबाडून चोरटे पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अंतुर्ली शिवारात सापळा रचून अटक केली. याप्रकरणी, आरोपींना रावेर न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस (Police) कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी घटनेची रितसर फिर्याद नोंदवल्यानंतर, वाघोड गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यावर संशयित आरोपींच्या रावेर शहरातील रेकी मोहिमेची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथील शेती शिवारात सापळा रचला. अंतुर्ली शिवारात झडपघालून आरोपी मोटारसायकलवर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रावेर पोलिसांनी दोन्ही आरोपींचा पाठलाग करून त्यांची मुसक्या आवळल्या. अजय गजानन बेलदार (वय 20) व नरेंद्र उर्फ नीलेश अशोक बेलदार (वय 20), दोघेही अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर अशी आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींकडून 75 हजारांची मोटारसायकल आणि 1 लाख 75 हजार रुपयांचे 13 ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत केले आहे. याप्रकरणी, सायबर क्राइम पोलिस कॉ. मिलिंद जाधव आणि गौरव पाटील यांनी तपासासाठी मदत केली. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे, तपास फौजदार तुषार पाटील करीत आहेत.
हेही वाचा
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात























