BLOG | 'त्या' डॉक्टरांना मरणाने छळले होते
डॉक्टरी पेशातील लोक संपूर्ण आयुष्य रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी वेचत असतात, अनके वेळ प्रसंगी स्वतःची जीवाची परवा न करता रुग्णांना उपचार देत असतात. रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकाने उपचार झाल्यानंतर 'थँक यू' म्हटल्यावर डॉक्टरांना हत्तीचं बळ येतं. मात्र जेव्हा कोरोना सारखी वैश्विक महामारीचं संकट उभं ठाकल्यानंतर डॉक्टर जीवाची बाजी लावतो आणि रुग्णांना उपचार देतो, तेव्हा त्याचं अभिनंदन देशाच्या पंतप्रधानांसह अख्खा देश करतो.
>> संतोष आंधळे
कोरोनाचा प्रादुर्भाव देशातील काही जणांचे बळी घेतोय, तर मोठी रुग्ण संख्या वाढवतोय. यावर आपली आरोग्य यंत्रणा त्याचा सक्षमपणे मुकाबला करून त्यावर लवकर विजय मिळवेल यामध्ये दुमत नाही. परंतु हा कोरोना माणसांमध्ये विषमतेची बीज पेरतोय त्याला मात्र नागरिकच आवर घालू शकतात. गेल्या सात दिवसात देशाच्या विविध प्रांतातील तीन डॉक्टर आपले कर्तव्य बजावत असताना धारातीर्थ झाले. रुग्णांना उपचार देत असताना त्यांना या रोगाची लागण झाली, असून त्यांचे निधन झाले. मात्र या तीन डॉक्टरांच्या अंत्यविधीला समाजातील काही समाजकंटकांनी अडथळे निर्माण केले. पोलिसांची मदत घेऊन त्यांचे हे विधी पार पाडण्यात आले. ही घटना केवळ निंदनीय नसून या घृणास्पद कृत्याचा निषेध समाजातील सर्वांनीच करायला हवा.
डॉक्टरी पेशातील लोक संपूर्ण आयुष्य रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी वेचत असतात, अनके वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची परवा न करता रुग्णांना उपचार देत असतात. रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकाने उपचार झाल्यानंतर 'थँक यू' म्हटल्यावर डॉक्टरांना हत्तीचं बळ येतं. मात्र जेव्हा कोरोना सारखी वैश्विक महामारीचं संकट उभं ठाकल्यानंतर डॉक्टर जीवाची बाजी लावतो आणि रुग्णांना उपचार देतो, तेव्हा त्याचं अभिनंदन देशाच्या पंतप्रधानांसह अख्खा देश करतो. आज त्या डॉक्टरांच्या वाट्याला मरणानंतरही छळलं जातंय, यापेक्षा काय मोठी शोकांतिका असावी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या या लढाईत डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलीस यांची गणना 'योद्धे' म्हणून केली आहे. या योद्ध्याच्या नावाने देशभरात थाळ्याचा आवाज करून अभिवादनही केले होते, त्या थाळ्याचा निनाद हवेत कोठे विरून गेला तेच कळत नाही.
मूळचे आंध्रप्रदेश येथील डॉ लक्ष्मीनारायण रेड्डी (60) पेशाने ऑर्थोपेडिक सर्जन 12 एप्रिल रोजी त्यांचा रविवारी चेन्नई, नेलोर येथील रुग्णालयात कोरोना प्रादुर्भावाने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना अंत्यविधीसाठी तेथील जवळ अम्बतूर येथे अंत्यविधीसाठी नेले असता तेथील स्थानिकांनी या अंत्यविधीला विरोध केला. स्थानिक रहिवाशी यांनी विरोध दर्शवत येथे जर यांचा अंत्यविधी येथे केला तर कोरोनाचा या परिसरात प्रादुर्भाव होईल, असं सांगत त्यांना तेथून हुसकावून लावले. शेवटी पोलिसांच्या मदतीने डॉ. रेड्डी यांचे अंत्यविधी थिरुवरकडू येथे दुसऱ्या ठिकाणी पार पाडले गेले.
तामिळनाडू येथील 55 वर्षीच्या न्यूरो सर्जन डॉ. सिमॉन हर्क्युलस यांच्या वाट्यालाही मरण नंतरच्या यातना भोगाव्या लागल्या आहेत. रुग्णांना उपचार देताना दर डिमॉन यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि रविवारी 19 एप्रिल रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे नातेवाईक, मित्र आणि आरोग्य कर्मचारी जेव्हा त्याचं शव घेऊन अण्णा नगर येथील परिसरात अंत्याविधीसाठी घेऊन गेले, तेव्हा तेथे आधीच उपस्थित असलेल्या जमावाने अॅम्बुलन्सवर दगडाने पथराव करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी अॅम्बुलन्सच्या पूर्ण काचा फोडून टाकल्या. अॅम्बुलन्सचा ड्रायव्हर व नातेवाईक तेथून बाजूला झाले. डॉ. सिमॉन यांच्या मित्रांनी कसे बसे करून त्यांचे शव ताब्यात घेऊन, पोलिसाच्या उपस्थित अंत्यविधी पार पाडले. मात्र नातेवाईकांना या अंत्यविधीस उपस्थित राहता आले नाही. कारण जमाव फार मोठ्या संख्येने दगडफेक करत होता, याप्रकरणी पोलिसांनी 20 लोकांना ताब्यात घेतले आहे.
मेघालय येथील 69 वर्षीय डॉ. जॉन एल सायलो रायनाथथिंग यांचा शिलॉंग येथे कोरोनाच्या प्रादुर्भावाने सोमवारी 15 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यांनी या परिसरात बेथनी हॉस्पिटलची स्थापना केली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर तेथील स्थानिकांनी त्यांच्या अंत्यविधीला विरोध केला. डॉ. सायलो यांच्या नातेवाईकांना त्यांचे अंत्यविधी त्यांच्याच फार्महाऊस नोंओगपोह येथे करावयाचे होते. मात्र गावातील स्थानिकांनी याला तीव्र विरोध केला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकाना त्यांच्या अंत्यविधीसाठी रियातस्मीथय प्रेसबरीटेरिअन या दफनभूमीत येथे काही लोकांनी जागा दिली.
समाज आपल्याला कशा पद्धतीची वागणूक देतो, हे सांगण्याकरिता या तीनही घटना अत्यंत बोलक्या आहेत. एका बाजूला कोरोनसारखं महाभयंकर संकट आलं आहे, म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन याचा लढा दिला पाहिजे असे म्हणत आहोत. मात्र समाजातील काही महाभाग या ऐक्याला तडा देत आहेत. या गोष्टी येथेच थांबायला हव्यात, नाहीतर भविष्यात आपल्या सगळ्यांनाच याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय माजी अध्यक्ष, डॉ. रवी वानखेडकर सांगतात की, "या तीनही घटना अत्यंत्य दुर्दैवी आहेत, याचा जितका निषेध केला जाईल, तितका थोडाच आहे. विशेष म्हणजे हे तीनही डॉक्टर आपले कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडले आहेत. अशावेळी समाजाने या डॉक्टर कुटुंबियांच्या मागे उभे राहायचे सोडून अशा पद्धतीने हीन वागणूक देणे हे गलिच्छपणाचे आहे."
ते पुढे असे सागतात की, "आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने माननीय पंतप्रधानांना पत्र लिहून केंद्र सरकारने डॉक्टरांच्या हल्ल्याविरोधातील देशभरात कायदा संमत केला पाहिजे, अशी मागणी आम्ही केली आहे. कारण आजही अनेक डॉक्टर आणि पॅरा मेडिकल स्टाफला त्यांच्या राहत्या परिसरात आजूबाजूचे लोक त्रास देत आहे. याला कुठे तरी आळा बसलाच पाहिजे. 22 एप्रिल रोजी देशभर डॉक्टर संध्याकाळी मेणबत्ती लावणार असून त्यानंतर काळ्या फिती लावून काम करून या घटनेविरुद्ध निषेध व्यक्त करणार आहेत."
याठिकाणी आज कवी सुरेश भट यांच्या कवितेच्या काही ओळी आठवतात. जर ते आज हयात असते तर त्यांना या घटनांनी नक्कीच व्यथित केले असते आणि त्यांनी त्यांच्या कवितेत 'मरणानेही छळले होते' असा बदल केला असता.
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
खरंतर कवी सुरेश भटांनी दुर्दम्य आशावाद ठेवून, त्यांच्या या कवितेत लिहून ठेवलंय की माणसाला जगत असताना ज्या यातना भोगाव्या लागल्यात किमान त्या यातना त्याला मरण पावल्यावर त्याच्या वाट्याला येणार नाही. परंतु देशातील या तीन डॉक्टरांना आयुष्यभर खस्ता खाऊन रुग्णांना उपचार दिले. त्यांना उपचार करता-करता त्यांना कोरोना आजाराचा प्रादुर्भाव त्यांना झाला. त्यातच त्यांचं निधन झालं. मात्र निधन झाल्यानंतर लोकांनी त्यांच्या अंत्यविधीलाही विरोध केला. यापेक्षा वाईट ते काय असू शकतं.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!