नुकत्याच मुंबई शहरात करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणात (रक्तद्रव सर्वेक्षण) झोपडपट्टीतील नागकिरांमध्ये निम्म्यांपेक्षा जास्त 57 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज (रोगप्रतिकारक शक्ती) निर्माण झाल्याचे दिसत आहे. तर काही प्रमाणात बिगर झोपडपट्टी रहिवाश्यांमध्ये 16 टक्के अशाच स्वरुपाच्या रोगप्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी आढळून आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरचा हळू-हळू का होईना हर्ड इम्युनिटी (समूह रोगप्रतिकार शक्ती) कडे प्रवास सुरु झाल्याचे आशादायक चित्र दिसत आहे. मात्र अजूनही हे प्रमाण कमी असून सर्वसाधारण वैद्यकीय शास्त्रानुसार 60-70 टक्के प्रमाण झाल्यास समाजात हर्ड इम्युनिटी निर्माण झाली आहे असू म्हणू शकतो. मात्र याकरिता निश्चित किती काळ लागेल हे आताच सांगणे मुश्किल आहे, तरी आणखी काही काळ जावा लागणार आहे. एकदा समाजात एवढ्या मोठ्या प्रमाणात हर्ड इम्युनिटी निर्माण झाली तर कोरोनाचा संसर्ग होऊ आजारी पडण्याचा धोका मंदावतो. त्यामुळे सध्या तरी नागरिकांनी गाफील न राहता सुरक्षिततेचे सर्व नियम पाळूनच आपला वावर ठेवला पाहिजे. सर्व साधणारपणे ज्या व्यक्तीच्या शरीरात ह्या अँटीबॉडीज तयार होतात त्या व्यक्तींना त्या आजारच संसर्ग होण्याचा धोका कमी असतो.


जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सेरो सर्वेक्षण (रक्ताचे नमुने घेऊन सर्वेक्षण) नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांनी संयुक्तरित्या सुरु केले होते. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्‍त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान, ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हेदेखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी होते.


भारतातील एक व्यापक अवछेदी सर्वेक्षण (क्रॉस-सेक्शनल सर्वे) म्हणून या अभ्यासाचे उद्दिष्‍ट नागरिकांमध्‍ये असलेल्या रक्‍तातील प्रतिद्रव्‍य (ऍन्‍टीबॉडीज) चे प्राबल्य जाणून घेणे हे होते. त्यासाठी यादृच्छिक पद्धती (रँडम) ने नमुने संकलित करण्यात आले. त्यात सर्वसाधारण लोकसंख्येचे वय आणि लिंग यातील स्तरानुसार तसेच आरोग्य कर्मचारी यांचे नमुने घेऊन या साथ आजाराचा फैलाव कसा झाला, त्याचा अभ्‍यास करण्‍यासाठी दोन फेऱ्यांमधून सर्वेक्षण घेण्‍याचे निश्चित करण्यात आले होते. पहिल्या फेरीमध्ये अंदाजित केलेल्या 8 हजार 870 पैकी एकूण 6 हजार 936 नमुने संकलित करण्यात आले. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या 3 विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींची स्वच्छेने संमती प्राप्त करून त्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोविड आयजीजी ॲण्टीबॉडीची पडताळणी करण्यात आली.


कोरोनाच्या या काळात गेली अनेक दिवस आपण विविध वैद्यकीय तज्ञांकडून हर्ड इम्युनिटी हा शब्द ऐकत आहोत. त्याचा नेमका अर्थ काय हे आपण समजून घ्यायला पाहिजे. हर्ड या शब्दाला सर्वसाधारण मराठी अर्थ कळप असा आहे, आणि इम्युनिटी शब्दाला रोगप्रतिकारक शक्ती असे म्हणतात. कळपातील किंवा समूहातील रोगप्रतिकारक शक्ती असा शब्द प्रयोग सर्वसाधारणपणे वापरला जातो. वैद्यकीय शास्त्रानुसार, जेव्हा नागरिकांमध्ये सुरु असलेल्या एखाद्या साथीच्या आजारा विरोधात मोठ्या प्रमाणात प्रतीकार करण्याची शक्ती निर्माण होते. त्यावेळी त्या आजाराचा संसर्ग झाला तरी फारसा कळून येत नाही. आता हे मोठे प्रमाण म्हणजे 60-70% इतके असू शकते. त्यामुळे अशा पद्धतीची एखाद्या आजाराच्या विरोधात हर्ड इम्युनिटी तयार होत असेल तर ते दिलासादायक चित्र असल्याचे मानण्यास हरकत नाही. सध्या देशभरात आपल्याकडे जे लस बनविण्याचे काम सुरु आहे त्याचा हेतू तोच आहे, ती लस शरीरात टोचल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीच्या शरीरात त्या आजाराच्या विरोधात अँटीबॉडीज तयार होत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीला तो आजार होण्याची शक्यता कमी असते किंवा होत नाही.


समाजात कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती अधिक क्रियाशील होते. या विषाणूचा सामना करण्यासाठी नैसर्गिकरित्या प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) तयार होतात. त्यामुळे ज्या रुग्णांची प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) चाचणी पॉझिटिव्ह येते त्यामुळे त्या व्यक्तीला संसर्ग झालाअसल्याची शक्यता नाकारता येत नाही, किंवा त्याला तो आजार होऊनही गेला असल्याचे कळत नाही.


राज्याच्या मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ अविनाश सुपे सांगतात की, " या सर्वेक्षणातून तर सध्या असे दिसत आहे की झोपडपट्ट्यांमधील नागरिकांमध्ये अँटीबॉडीज निर्माण होण्याचे प्रमाण बिगर झोपडपट्टीमधील नागरिकांच्या तुलनेने अधिक आहे. त्यांचे एक कारण म्हणजे दाटीवाटीची लोकवस्ती. त्यामुळे सध्या या भागामध्ये 57 टक्के (ऍन्‍टीबॉडीज) चे प्राबल्य आढळून आले आहे. त्यामुळे 'हर्ड इम्युनिटी' येण्याच्या मार्गावर आहोत. काही महिन्यांनी हा आकडा वाढला आणि हे प्रमाण 70 % पर्यंत गेले तर तर आपण 'हर्ड इम्युनिटी' निर्माण झाली आहे असे म्ह्णू शकतो. मात्र हायराइस सोसाट्यांमधील, इमारती मधील नागरिकांमध्ये अजूनही अँटीबॉडीज निर्माण होण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे, तेथे फार कमी प्रमाणात अँटीबॉडीस तयार झाल्याचे या सर्वेक्षणात आहेत."


ते पुढे असेही सांगतात की, " या सगळ्यामध्ये याचा आपल्या विचार करायला पाहिजे कि ह्या अँटीबॉडीज किती काळ शरीरात टिकतात. हे अजून कुणालाच माहित नाही. मात्र काही परदेशी वैद्यकीय नियतकालिकात हा कालावधी किमान 2-4महिने असल्याचे वाचनात आले आहे. यावर सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. आता पर्यंतच्या अनुभवावरून एकदा का एखाद्या साथीच्या विरोधात अशा अँटीबॉडीज तयार झाल्यानंतर पुन्हा त्या आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या तरी आपण 4-5महिने या अँटीबॉडीज राहतील असे गृहीत धरूया, आशा आहे की त्यापेक्षा जास्त टिकून राहतील. मात्र यावर कुणी अजूनही अभ्यास केलेला नाही. मात्र या प्रकारामुळे आपण गाफील राहून चालणार नाही. आपण सातत्त्याने सुरक्षिततेचे नियम पाळतच राहिले पाहिजे."


अशाच प्रकारचा प्रयोग मे महिन्याच्या सुरुवातील संपूर्ण देशात करण्यात आला होता. नागरिकांचे रक्ताचे नमुने घेऊन आयजीजी (इम्युनोग्लोबीन) एलिसा चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) कोविड-19 साठी अँटीबॉडीज शोधण्यासाठी स्वदेशी आयजीजी एलिसा चाचणी किट तयार करण्यात आले होते, त्यांच्या साहाय्याने करण्यात आली होती. याकरिता केंद्राने 21 राज्यातील 69 जिल्ह्याची निवड केली होती. मात्र नागरिकांमध्ये फारसा रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचे दिसून आले नव्हते. हे सर्वेक्षण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्र यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. संसर्गाच्या संपर्कात असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण समजून घेण्यासाठी, देखरेखीसाठी अँटीबॉडीज चाचणी महत्त्वपूर्ण ठरत असते.


"मुबई शहराच्या या सर्वेक्षणातून या आजाराचा संसर्ग हा किती सौम्य प्रकारचा आहे की तो इतक्या लोकांना होऊन गेले ते कळलेलं पण नाही. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसताच त्यावरील उपचार घेणे गरजेचे आहे. जो पर्यंत या विषयी शासन स्वतःहून काही मार्गदर्शक सूचना जाहीर करत नाही तोपर्यंत सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. हे नक्कीच हर्ड इम्युनिटी दिशेने जाण्यास सुरुवात केली आहे असे आपण म्हणू शकतो." असे, राज्याच्या आरोग्य विभागाचे डॉ प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी सांगतात.


तर, मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयातील श्वसनविकार तज्ञ डॉ समीर गर्दे सांगतात की, " सर्वेक्षणाचे निकाल नक्कीच चांगले आहेत. मात्र यावर आणखी ठामपणे सांगता यावे याकरिता सर्वेक्षण मोठ्या प्रमाणात करून त्यात बिगर झोपडपट्टीवासी नागरिकाचा आकडा पुन्हा एकदा तपासून पाहणे गरजेचे आहे. आपण योग्य दिशेने वाटचाल करीत आहोत. परंतु अजूनही काही काळ आपल्याला यापुर्वीसारखीच काळजी घ्यावी लागणार आहे. लोकांनी नाका-तोंडावर मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळले पाहिजे."


मात्र अशा परिस्थितीत प्रशासनाने घाई न करता काही काळ थांबून सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण कसे राहील याची वाट बघत राहणे उपयुक्त ठरू शकते. कारण हर्ड इम्युनिटी ही अशी काही महिन्यात ठरवून निर्माण होत नाही , ती तेवढ्या प्रमाणात निर्माण होण्याकरिता तिचा ती स्वतःचा वेळ घेत असते. या सर्वेक्षणानुसार आता फक्त झोपटपट्टीतील नागरिकामध्ये अँटीबॉडीजचे अधिक प्रमाण आढळून आले आहे. मात्र बिगर झोपडपट्टीमधील नागरिकांमध्ये अजूनही हे प्रमाण म्हणावे तसे दिसून आलेले नाही. फक्त झोपड्पट्टीमधील नागरिकची रोगप्रतिकारक शक्ती वाढून चालणार नाही तर संपूर्ण समाजातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती वाढणे गरजेचे आहे. तरच आपण हर्ड इम्युनिटी आली असे म्हणून आणि त्याचा लाभ नागरिकांना होऊ शकतो. मात्र आजही तशी परिस्थिती आपल्याकडे नाही. ती येण्याकरिता काही काळ वाट बघणे एवढंच आपल्या हातात आहे. तो पर्यंत प्रशासनाने आखून दिलेल्या सर्व सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करत राहणे हितकारक ठरणार आहे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग