BLOG : राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेसला फायदा होईल?
गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसला (Congress) सतत पराभवाचा सामना करावा लागलाय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा वारू चौफेर उधळला आणि त्यात काँग्रेसला सूपडा साफ झाला. मात्र या पराभवानंतर काँग्रेसनं काहीही धडा घेतला नाही याची जाणीव 2019 मध्ये पुन्हा झाली. 2019 लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला दारुण पराभव झाला. राहुल गांधींची फिक्स असलेला अमेठी लोकसभा मतदारसंघही त्यांच्या हातून भाजपच्या स्मृती ईराणी यांनी खेचून घेतला. राहुल गांधी जर वायनाडमधून जिंकले नसते तर त्यांचे लोकसभेत जाणेही कठिण झाले असते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसला मोठी गळती लागली. अनेक मोठे नेते काँग्रेस सोडून भाजपसह दुसऱ्या पक्षांमध्ये गेले.
काँग्रेसमध्येच असलेल्या ज्येष्ठ नेत्यांनीही काँग्रेस नेतृत्वावर टीका करण्यास सुरुवात केली. काँग्रेसचे नेतृत्व गांधी कुटुंबाबाहेर सोपवावे असेही या नेत्यांनी म्हटले. काँग्रेसमध्ये एवढा असंतोष असतानाही तो दूर करण्याऐवजी गांधी कुटुंब स्वतःचीच खुर्ची सांभाळण्यात मग्न राहिले आणि आज काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. आणीबाणीनंतर इंदिरा गांधीची जी स्थिती झाली होती त्यापेक्षा वाईट स्थिती सध्या काँग्रेसची आहे. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती ती राज्येही काँग्रेसच्या हातातून जाऊ लागलीत. ज्या राज्यांनी काँग्रेसची सत्ता कायम ठेवली त्यात गांधी कुटुंबापेक्षा प्रादेशिक नेत्यांचा मोठा वाटा आहे. एकूणच केवळ पक्षातच नव्हे तर संपूर्ण देशात काँग्रेसची स्थिती काही चांगली नाही.
आणि हाच विचार करून राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेची (Bharat Jodo Yatra) आखणी केली. या ‘भारत जोडो’ यात्रेला आजपासून कन्याकुमारीतून सुरुवात झाली. तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांना पुन्हा काँग्रेसशी जोडून घेण्यासाठी राहुल गांधींच्या या ‘भारत जोडो’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 150 दिवस चालणारी ही भारत जोडो यात्रा 3500 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा काँग्रेसशी कार्यकर्ते आणि जनतेला जोडून घेण्याचा प्रयत्न या यात्रेतून केला जाणार आहे. या दरम्यानच काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तिढाही सुटणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 19 ऑक्टोबरला काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. मात्र या निवडणुकीवरही काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतलाय. अर्थात नेहमीप्रमाणेच गांधी कुटुंबाने या आक्षेपांकडे अजूनतरी दुर्लक्ष केल्याचेच दिसून येत आहे.
यापूर्वी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनीही 1983 मध्ये ‘भारत यात्रा’ काढली होती आणि त्यांनीही यात्रेची सुरुवात कन्याकुमारीपासूनच केली होती. आणि यात्रेचा शेवट दिल्लीत झाला होता. त्यानंतर सहा वर्षांनी चंद्रशेखर पंतप्रधान झाले होते. लालकृष्ण आडवाणी यांनीही ‘रथयात्रा’ काढली होती आणि त्याचा भाजपला चांगलाच फायदा झाला होता आणि भाजपचे सरकार आले होते. या देशभरातील यात्रांसोबतच काही राज्यातील नेत्यांनीही राज्यात यात्रा काढल्या होत्या. ज्याचा त्यांना खूपच फायदा झाला होता. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर आणि नंतर त्यांचे पुत्र आणि आत्ताचे आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनीही संपूर्ण आंध्र प्रदेश पिंजून काढला होता. चंद्राबाबू नायडू यांची यात्रा, अखिलेश यादव यांची ‘सायकल यात्रा’ या काही गाजलेल्या यात्रा आहेत.
एकीकडे राहुल गांधींची ही ‘भारत जोडो’ यात्रा सुरु झाली असतानाच दुसरीकडे शरद पवार, नितीश कुमार, केजरीवाल, केसीआर, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे असे काही नेते भाजपविरोधात आघाडी तयार करण्याचे प्रयत्न करीत आहेत. शरद पवार आणि नितीश कुमार यांनी जरी पंतप्रधानपदात रस नसल्याचे सांगितले असले तरी त्यांचे लक्ष पंतप्रधानपदाकडेच आहे. केसीआर, केजरीवाल आणि ममता बॅनर्जींचे लक्षही पंतप्रधानपदाकडे आहे. यापैकी काही जणांना काँग्रेसला सोबत घ्यायचे आहे तर केजरीवाल आणि ममतांना काँग्रेससोबत नको आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाखाली विरोधी आघाडी एकत्र येण्याची शक्यता धूसरच आहे.
असे असताना आणि काही नेत्यांनी काढलेल्या यात्रांच्या धर्तीवर राहुल गांधींनी ‘भारत जोडो’ यात्रा सुरु केली आहे. राहुल गांधींचे विचार स्तुत्य असले तरी जोपर्यंत पक्षातील सुंदोपसुंदी आणि ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर होत नाही तोपर्यंत काँग्रेसला अच्छे दिन दिसण्याची शक्यता कमीच आहे. राहुल गांधी जरी सर्व राज्यांमध्ये जात असले तरी राज्यांमध्ये प्रादेशिक नेता महत्वाचा असतो. कार्यकर्ते जोडणे, मतदारांना काँग्रेसला मतदान करण्यास प्रवृत्त करणे हे काम नेते आणि कार्यकर्तेच करीत असतात. पण पक्षाचे दोन महत्वाचे खांब असलेले हे दोघेच जर नाराज असतील तर त्या ‘भारत जोडो’ला अर्थच उरत नाही. त्यातच राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्याचाही नकारात्मक परिणाम कार्यकर्ते आणि नेत्यांवर झाला आहे. गांधी कुटुंबाबाहेर ज्याला काँग्रेसचे अध्यक्षपद मिळेल तो नेता सर्वसामान्य कार्यकर्ते आणि अन्य नेत्यांना मान्य झाला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. राहुल गांधींनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून एक चांगले पाऊल उचलले आहे. पण ते खरोखर यशस्वी होईल का असा प्रश्न काँग्रेसची आजची अवस्था पाहून पडतो.