BLOG : 'द कश्मीर फाइल्स' बजेट 'लो' 'बिग' हिट
BLOG : विवेक अग्निहोत्रीचा 'द कश्मीर फाइल्स' चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय झाला आहे. गेल्या आठवड्यात हा चित्रपट रिलीज झाला. पहिल्या दिवशी या सिनेमाने फक्त साडे तीन कोटींचा गल्ला मिळवला होता. 'द कश्मीर फाइल्स'च्या अगोदर संजय लीला भन्साळींचा 'गंगुबाई काठियावाडी' हा बिग बजेट चित्रपट रिलीज झाला होता. आलियाचा अभिनय प्रेक्षकांना आकर्षित करीत होता. याच दरम्यान विवेक अग्निहोत्रीने 'द कश्मीर फाइल्स' रिलीज केला. पहिल्या दिवसानंतर माउथ पब्लिसिटी सुरू झाली आणि बॉक्स ऑफिसवरील प्रेक्षकांची संख्या वाढू लागली. हा-हा म्हणता केवळ एका आठवड्यात 19 कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला गोळा केला. आणि आजही हा चित्रपट देशभरातील हजारो चित्रपटगृहात चित्रपट दाखवला जात आहे. चित्रपटाला होत असलेली गर्दी पाहाता हा चित्रपट 300 कोटींचा गल्ला गोळा करेल असे आताच म्हटले जाऊ लागले आहे. ज्या चेन्नईत हिंदी चित्रपट रिलीज होत नाहीत तेथेही 'द कश्मीर फाइल्स'ला तूफान गर्दी होताना दिसत आहे.
बॉलिवूडच्या इतिहासात लो बजेट असलेल्या चित्रपटांनी उत्पन्नाचे विक्रम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. चांगली कथा, दिग्दर्शकाने उत्कृष्टपणे केलेली मांडणी आणि कलाकारांनी जीव ओतून केलेला अभिनय असेल तर बॉक्स ऑफिसवर तो चित्रपट प्रचंड यश मिळवतोच. मग तो भव्य दिव्य बिग बजेट असो वा लो बजेट. उरीमध्ये अतिरेक्यांनी भारतीय सैन्याने हल्ला केला. त्यानंतर भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करीत पाकिस्तानमध्ये जाऊन उरीवर हल्ला केलेल्या अतिरेक्यांचा खात्मा केला. यावरच आधारित उरी-द सर्जिकल स्ट्राईक चित्रपट तयार करण्यात आला. ४५ कोटीत तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींचा गल्ला गोळा केला. हाऊ इज द जोश हा डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला होता. भाजपने या चित्रपटाचेही प्रचंड प्रमोशन केले होते.
चार वर्षांपूर्वी श्रीराम राघवन 'अंधाधुन' चित्रपट घेऊन आला होता. रामगोपाल वर्माचा सहाय्यक असलेल्या श्रीरामच्या या चित्रपटाचे बजेट फक्त 32 कोटी रुपये होते. या चित्रपटात आयुष्मान खुराना, राधिका आपटे आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका होत्या. शेवटपर्यंत रहस्य टिकवण्यात यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाने केवळ देशातच 440 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला तर चीनमध्येही या चित्रपटाने 335 कोटी रुपये कमवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराघरात शौचालय योजनेवर आधारित टॉयलेट एक प्रेमकथा 32 कोटीत तयार झाला होता. श्रीनारायण सिंह दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयकुमार आणि भूमी पेडणेकर ही जोडी होती. सामाजिक विषय मनोरंजक पद्धतीने मांडल्याने प्रेक्षकांना तो आवडला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला. दिग्दर्शक अमर कौशिकने हॉरर कॉमेडी जॉनरचा 'स्त्री' चित्रपट तयार केला. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर अभिनीत या चित्रपटाचे बजेट 20 ते 22 कोटी होते. मात्र चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा गल्ला गोळा केला.
अमर शर्मा दिग्दर्शित 'बधाई हो' 29 कोटीत तयार झालेला चित्रपट. आयुष्मान खुराना, नीना गुप्ता, गजानन राव, सान्या मल्होत्रा अभिनीत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा व्यवसाय केला होता.
अमर शर्मा दिग्दर्शित 'बधाई हो' 29 कोटीत तयार झालेला चित्रपट. आयुष्मान खुराना, नीना गुप्ता, गजानन राव, सान्या मल्होत्रा अभिनीत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा व्यवसाय केला होता.
गुलजार यांची मुलगी मेघना गुलजारने आलिया भट्टला घेऊन 'राजी' चित्रपट तयार केला. भारतातील एक मुलगी पाकिस्तानात जाऊन भारतासाठी हेरगिरी करते अशी या चित्रपटाची कथा. 40 कोटीत तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा गल्ला गोळा केला.
मराठीतील प्रख्यात लेखक अनिल बर्वे यांचा मुलगा राही अनिल बर्वे आणि त्याचा मित्र आनंद गांधी यांनी तुंबाड हा हॉरर चित्रपट तयार केला. फक्त 5 कोटीत तयार झालेल्या या चित्रपटाने एकूण 13 कोटींचा व्यवसाय केला.
विद्या बालनचा 'कहानी' फक्त 8 कोटी रुपयात तयार झाला होता. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींच्या वर व्यवसाय केला. त्यामुळेच निर्मात्यांनी 'कहानी 2' ची ही निर्मिती केली. पण 'कहानी 2' म्हणावा तितका यशस्वी झाला नाही. याशिवाय अजूनही असे काही लो बजेट चित्रपट आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम केलेत. यात इरफान खान अभिनीत पान सिंह तोमर, रघुवीर यादवचा पीपली लाईव्ह, जॉन अब्राहम निर्मित आयुष्मान खुराना अभिनीत विकी डोनर, फरहान अख्तर निर्मित फुकरे या चित्रपटांचाही समावेश आहे.
मात्र या सगळ्यात 'द कश्मीर फाइल्स'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन वेगळे म्हणावे लागेल. आणि याचे कारण चित्रपटाला लाभलेला राजकीय आशीर्वाद. काश्मीरमधील पंडितांच्या पलायनाला कोण कारणीभूत होते हे विवेक अग्निहोत्रीने प्रखरपणे मांडले. या चित्रपटामुळे आजच्या पिढीला 30 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये काय झाले आणि ते किती भयंकर होते याची जाणीव झाली. यानिमित्ताने हिंदूंना एकत्र येण्याची संधी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाची प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर अगदी मंत्री, खासदारापासून नगरसेवकांपर्यंत सगळ्यांनीच या चित्रपटाचे मोफत शो आयोजित केले. चित्रपट संपल्यानंतर चित्रपटगृहात प्रेक्षक स्वतःहून राष्ट्रगीत गाऊ लागतात. भारतमाता की जयच्या घोषणा देतात. सोशल मीडियावरही चित्रपटाच्या प्रचारासाठी हजारो पोस्ट केल्या जात आहेत. त्याचा परिणाम म्हणूनच दिवसेंदिवस चित्रपट पाहाणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. काँग्रेस आणि काही मुस्लिम नेत्यांनी चित्रपट कसा चुकीचा आहे असे सांगण्यास सुरुवात केलीय. त्याचा परिणाम असा झाला की, हिंदू जास्तीत जास्त एकवटू लागलाय. आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्श्वभूमी तयार होऊ लागली, असेही म्हटले जाऊ लागले आहे. पण काहीही झाले तरी चित्रपटाचा गल्ला दिवसेंदिवस वाढू लागला आहे हे मात्र नक्की.
आतापर्यंत बजेटपेक्षा 100 पट जास्त कमाई आजवर कोणताही चित्रपट करू शकलेला नाही
मात्र लो बजेट असतानाही 100 पट व्यवसाय करणारा एकमेव चित्रपट म्हणजे जय संतोषी मां. जय संतोषी मां हा चित्रपट फक्त पाच लाख रुपयात तयार झाला होता. आणि या चित्रपटाने बजेटपेक्षा 100 पट जास्त म्हणजे 5 कोटी रुपयांचा व्यवसाय 1975 मध्ये केला होता. आतापर्यंत बजेटपेक्षा 100 पट जास्त कमाई आजवर कोणताही चित्रपट करू शकलेला नाही. 50 आठवडे हा चित्रपट धो धो चालला होता. त्या काळात मल्टीप्लेक्स नव्हते आणि सिंगल स्क्रीनमध्ये तिकीटाचे दरही एक रुपया, दीड रुपया असे होते. तर चांगल्या चित्रपटगृहात पाच रुपयांपर्यंत तिकीट होते. असे असताना या चित्रपटाने बजेटच्या 100 पट कमाई केली होती. आजवर हा विक्रम कोणत्याही चित्रपटाने मोडलेला नाही. आणि भविष्यातही कोणी मोडेल असे वाटत नाही.