BLOG | शांततेच्या चर्चा करतानाच उत्तराखंडमध्ये चीनची घुसखोरी
एकीकडे सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करायची आणि दुसरीकडे भारताच्या भूभागात घुसखोरी करायची असा दुतोंडी कारभार चीन करू लागला आहे. लडाखमध्ये सैनिकांची जमवाजमव करीत असतानाच आता उत्तराखंडच्या बाराहोटीत चीनी सैनिकांनी घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाठीत खंजीर खुपसणाऱ्या चीनवर आता भारतानं करडी नजर ठेवून जशास तसं प्रत्युत्तर द्यायचे ठरवले आहे.
चीनने गेल्या वर्षी लडाखच्या गलवानमध्ये भारतीय सीमेत घुसखोरी केली होती. भारतीय सैन्यानं चीनची घुसखोरी मोडून काढली होती. भारतीय सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत चीनचे अनेक सैनिक ठार झाले होते. त्यानंतर चीनने माघार घेतली आणि सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरु केली. या चर्चेच्या जवळ-जवळ दहा ते बारा फेऱ्या पडल्या होत्या. चीन आता शांत होईल असे वाटत असतानाच चीननं पुन्हा हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर लडाखजवळील सीमाभागात त्यांच्या सैन्यासाठी तंबूच्या ऐवजी पक्की घरे बांधल्याचे उघडकीस आले आहे. एवढेच नव्हे तर भारतीय सीमेवरील भारतीय सैन्याची माहिती गोळा करण्यासाठी ड्रोनचा वापरही सुरु केल्याचे समोर आले होते. त्यामुळे भारतानेही आता चीनच्या या कारवायांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळेच भारताने पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर एलएसीवर पाळत ठेवली आहे. भारतीय लष्करानं आपल्या ताफ्यात नवीन इस्रायली आणि भारतीय ड्रोनचा समावेश केलाय.
यातच आता आणखी एक माहिती समोर आली आहे. उत्तराखंडच्या बाराहोटीत गेल्या महिन्यात म्हणजे 30 ऑगस्ट रोजी चीनी सैनिकांनी LAC ओलांडली. जवळ जवळ तीन तास चिनी सैनिक इथं होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तून-जून ला' ओलांडून 55 घोडे आणि 100 हून अधिक चिनी सैनिक भारतीय हद्दीत पाच किलोमीटरहून पुढे आले होते. तेथे भारतीय सैन्य नव्हते. स्थानिकांकडून माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैनिक घटनास्थळावर दाखल होईपर्यंत चिनी सैनिक परत गेले होते. चीनी सैन्य परत गेले खरे पण जाताना या भागात मोठं नुकसान करून गेले. 1962 च्या युद्धाआधीही चीनने इथेच घुसखोरी केली होती. चीनी सैन्यानं त्यांनी बाराहोटीतील पायाभूत सुविधांचं नुकसान केलं आणि जाताना एक पूलही तोडला. इकोनॉमिक टाईम्स वृत्तपत्रानं संरक्षण दलातील सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे
पण एकूणच चीनच्या कारवाया पाहाता पुढील काही महिने भारत-चीनमध्ये चकमकी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत हे मात्र नक्की.