उदय सामंतांविरोधात चेहरा कोण? पेपर अवघड,सोपा?
कोकणातील रत्नागिरी - संगमेश्वर हा विधानसभा मतदारसंघ चर्चेतला. ते स्वाभाविक देखील आहे. कारण, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तसं पाहता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आता शिंदेना साथ असा उदय सामंत यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. थोडक्यात सत्तेच्या जवळ सामंत कायम राहिले आहेत. कारण 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले सामंत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लढले होते. 2009 मध्ये देखील उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि ते जिंकले. पण, 2014 मध्ये मात्र त्यांनी ऐनवेळी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्यानंतर 2019 ची निवडणूक देखील त्यांनी शिवसेनेकडून लढवली. पण, शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचं बंड झालं आणि अगदी 12 ते 18 तास अगोदर उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले उदय सामंत थेट गुहाटीला गेले. त्यांचा गुवाहटीचा प्रवास खुप रंजक आहे. त्यामागचं कारण देखील तसंच आहे.
मला आठवतं त्यावेळी मी मुंबईला होतो. पण, रत्नागिरीतील माळनाका या ठिकाणच्या असलेल्या शासकीय विश्रामगृहला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं सांगितलं होतं. त्याचे व्हिडीओ, बाईट आम्हाला आले होते. शिवाय, आम्ही सामंत काय करणार? यावर देखील लक्ष ठेवून होतो. अचानक सामंत गुवाहाटीला गेले. अर्थात त्यात आश्चर्य असं काही नव्हतं. कारण, मिळालेल्या माहितीनुसार उदय सामंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत एक - दोन बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिंदेंना साथ देण्याचा प्रस्ताव काहींनी फेटाळला होता. याची माहिती होती. फक्त सामंत गुवाहाटीला गेले याचं कन्फर्मेशनची वाट पाहत होतो. अर्थात उदय सामंत यांच्यावर टीका झाली तर त्यांचा तो वैयक्तिक निर्णय होता आणि आहे. कारण, राजकारणात केव्हा काय करायचं? याची प्रत्येकाची गणितं ठरलेली असतात.
उदय सामंत देखील चाणक्ष आणि हुशार राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय हा काहीतरी विचार करून नक्कीच घेतलेला असणार यात काहीही शंका नाही. मला वाटतं उदय सामंत यांनी मागील अडीच वर्षात हे सिद्ध देखील करून दाखवलं आहे. अर्थात उदय सामंत एकनाथ शिंदेंसोबत गेले तरी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते, नेते. पदाधिकारी यांची संख्या नक्कीच जास्त आहे. पण, मला वाटतं त्यावरची तड देखील सामंत यांनी काढलेली आहे, किंबहूना त्यांनी त्याचा पुरेपूर विचार गुवाहाटीला जाण्यापूर्वी नक्कीच केलेला असणार. कारण, मधल्या काळात त्यांच्या मतदारसंघात घडलेल्या छोट्या - मोठ्या घटना, नेते कार्यकर्ते यांच्या घडणाऱ्या गाठीभेटी यातून याची उत्तरं मिळतात. अर्थात हे सर्व काही असलं तरी उदय सामंत यांना यंदाची निवडणूक सोपी की अवघड असा प्रश्न सध्या कोकणात, रत्नागिरीमध्ये सुरू आहे. यावर अगदी नाक्यानाक्यावर चर्चा होते. पण, उदय सामंत यांना निवडणूक फार सोपी नसली तरी अवघड नक्कीच नाही असं नक्कीच म्हणता येईल. तसं म्हटलं तर अवघड वाटणारा हा पेपर उदय सामंत सहजपणे सोडवत आहेत की काय? असं वाटू लागलं आहे. त्याला स्थानिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडी प्रामुख्यानं कारणीभूत आहेत. प्रामुख्यानं प्रवास थोडा उलटा करू.
पहिला मुद्दा म्हणजे उदय सामंत यांच्याविरोधात सक्षम असा चेहरा कोण? कारण 2004 पासून उदय सामंत आमदार आहेत. त्यांची राजकीय घोडदौड मोठी आहे. त्यामुळे त्यांना टक्कर देणारा चेहरा विरोधकांकडे आहे का? इथून या लढाईची सुरूवात होते. शिवसेनेच्या ठाकरे गटातील तीन जण त्यांच्याविरोधात लढण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी मातोश्रीवर मुलाखती देखील दिल्या. पण, लढाई सुरू होण्यापूर्वी रत्नागिरीचे तालुकाप्रमुख प्रदिप उर्फ बंड्या साळवी यांनी शस्त्र म्यान केली. इतर दोघे ज्येष्ठ आहेत. त्यांना संधी मिळावी म्हणून माघार घेत असल्याचं ते सांगतात. पण, राजकारणात ज्येष्ठांना देखील बाजूला सारून बाजी मारावी लागते असा मानणारा देखील एक वर्ग असताना साळवींनी घेतलेला निर्णय तसा आदर्शवत. पण, दावा केला जात असल्याप्रमाणे सामंत यांच्याविरोधात असलेला आक्रोश पाहता आमदार होणं सहज सोप्प असताना कुणीही आमदारकीच्या उमेदवारीवर लाथ मारतो म्हणजे राजाकरणात नितीमत्ता पाळली जाते हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे. अर्थात कालच्या या घडामोडीनंतर रत्नागिरीकरांच्या नाक्यानाक्यावर ऐकायला मिळणाऱ्या प्रतिक्रिया मात्र मजेशीर आहे. त्यासाठी रत्नागिरीला नक्की या!
दुसरीकडे इतर पक्षातील उमेवार उदय सामंत यांच्याविरोधात चालेल का? असं खुद्द मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या दौऱ्यावेळी विचारलं. त्यामुळे हा उमेदवार म्हणजे भाजपचे माजी आमदार बाळ माने तर नाहीत ना? अशी चर्चा सध्या सुरू आहे. अर्थात माने यांनी अद्याप तरी यावर काहीही भाष्य केलेलं नाही. पण, रत्नागिरीतील अनुभवी पत्रकारांची मात्र यावर असलेली टिपण्णी महत्वाची आहे. त्यांच्यामते ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले किती मदत करतील? हा प्रश्न आहे. अर्थात याची उत्तरं येणाऱ्या निकालामध्ये नक्की मिळतील.
तिसरा मुद्दा म्हणजे नाराजीचा. सामंत यांच्याविरोधात असलेली नाराजी सध्या रत्नागिरी शहरात तरी काही प्रमाणात दिसून येते. पण, रत्नागिरीतील माझा अनुभव मात्र वेगळा सांगतो. त्यांच्याविरोधात बोलणारे प्रत्येक्षात उदय सामंत यांच्याविरोधात असतात का? हा प्रश्न आहे. कारण, उदय सामंत यांना शिव्यांची लाखोळी वाहणारे त्यांना कधी जाऊन भेटतात तेच कळत नाही. अशा काही लोकांना आम्ही पत्रकार पाहतो देखील आणि त्याची माहिती देखील मिळते. म्हणजे अगदी पंधरा मिनिटापूर्वी एका व्यक्तिनं उदय सामंत आणि किरण सामंत यांना शिव्या घातल्या आणि सोळाव्या मिनिटाला त्यानं थेट सामंतांना भेट घेतली. अर्थात एखाद्या लोकप्रतिनिधीची भेट घेणे काही चुकीचं नाही. पण, बोलताना तारतम्य असावं. त्यावेळी झालेलं बोलणं हे असं होतं की सामंत यांचा कट्टर विरोधक. पण, सोळाव्या मिनिटाला तलवार म्यान. शिवाय रत्नागिरीकर बोलतात एक आणि करतात वेगळं असं माझं मत आहे. त्यामुळे शहरातील विरोध किती मोठा? हा प्रश्न आहे. त्याचवेळी ग्रामीण भागात कुणाचं लक्ष आहे का? हा देखील प्रश्न आहे. कारण, ग्रामीण भागात उदय सामंत यांनी चांगली बांधणी केली आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. हि बाब नाकारून किंवा नजर अंदाज करून चालणार नाही. उदय सामंत यांच्यासाथीनं त्यांचे बाबा अण्णा सामंत आणि भाऊ किरण सामंत यांचा एक वेगळा करिष्मा आहे. शब्दाला मान आहे ही बाब फिरताना तुम्हाला जाणवते.
मुख्य बाब म्हणजे सामंत कुटुंबियांनी मागच्या अनेकांना आर्थित दृष्ट्या सक्षम होण्यासाठी हातभार लावला आहे. कार्यकर्ता सक्षम होईल यावर देखील भर दिला आहे. माझ्या माहितीनुसार किमान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता राणे यांच्यानंतर सामंत यांनी हे केलेलं दिसून येतं. या दोन जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींना हि बाब किती जमलीय? यावर मला थोडी शंका आहे. कदाचित त्याबाबत माझा अभ्यास थोडा कमी पडत असेल. चौथा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे. कारण, सामंतांविरोधात असलेली नाराजी आणि ठाकरे गटाचं प्राबल्य ही बाब गृहित धरली तरी 2004 आणि 2009 मध्ये सामंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकले. त्यावेळी आत्तापेक्षा विरोधक अधिक सक्षम होते. शिवसेना - भाजप युतीची या ठिकाणी ताकद होती. स्वराज्य संस्थांमध्ये देखील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी जास्त होते. पण, त्यानंतर देखील उदय सामंत यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे हि किमया नवख्या उदय सामंतांना कशी साधली? याचं उत्तर शोधलं गेलं पाहिजें. आडघडीला सामंत हे राजकीय डावपेच आणि आर्थिक आघाडीवर देखील सरस आहेत. अर्थात त्यांचं विजयी झाल्यास मताधिक्य किती? यावर चर्चा होईल. पण, त्यांना हरवण्यासाठि विरोधकांची एकजूट किती? हे निर्णायक असेल.
पाचवा मुद्दा म्हणजे उद्योगमंत्री झाल्यानंतर उदय सामंत यांनी त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणला. नाविन्यपूर्ण प्रकल्प रत्नागिरीमध्ये कसे होतील याकडे लक्ष दिलं. त्यावर देखील टिका होते. मी तर म्हणतो ते स्वाभाविक आहे. पण, गोष्ट नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या भूमिपुजनंन आणि विकासकामांचा धुमधडाका दिसून येतो. या सर्व जमेच्या बाजु असतील. पण, म्हणून मतदारांना गृहित धरण्याचं काम उदय सामंत करतील असं मला वाटत नाही. किंबहूना उदय सामंत यांनी यापूर्वीच कामाला सुरूवात केली आहे. शिवाय, अॅन्टीइनकंबसि फॅक्टर देखील असणार आहे? पण, मतदानापर्यंत त्याचं महत्त्व किंवा तो किती राहिल? तो मतपेटीत उतरेल का? हे पाहावं लागेल.
उदय सामंत यांच्यासाठी या जमेच्या बाजू असल्या तरी मित्रपक्ष भाजपची साथ कशी मिळणार हे देखील येणाऱ्या काळात अधिक स्पष्ट होईल. कारण, सध्या तरी भाजपचा या जागेवर दावा आहे.,पण, जागा भाजपला मिळेल का? ही शंका आहे. काहींनी तर उदय सामंत भाजपमध्ये येतील असा देखील दावा केला आहे. अर्थात राजकारणात काहीही नाकारता येत नाही. पण, त्याचं उत्तर आता काही दिवसांमध्ये मिळेल. असं असलं तरी विरोधक सक्षम असणे आणि दिसणे यात फरक आहे. त्यामुळे रत्नागिरी - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातील लढाई हि अधिक रंजक असेल. कारण, सर्व प्रश्नांची उत्तरं निकालाअंती मिळणार आहेत ती देखील अनेक खुलासे करून!