एक्स्प्लोर
‘ती सध्या...’च्या निमित्ताने....

नुकताच सतीश राजवाडेंचा ‘ती सध्या काय करते’ पाहिला. पहिल्या प्रेमाची हळुवार गुंफण, लग्नानंतरही त्याची कमी न झालेली भावनोत्कट गोडी, याचं उत्तम चित्रण यात केलंय. खरं तर विषय एक्स्ट्रा मॅरिटल किंवा प्री मॅरिटल अफेअरच्या मार्गाने जात उथळ होऊ शकला असता, पण तसं न होऊ देता पहिल्या प्रेमाला हळुवार स्पर्श करत तरीही लग्नानंतरच्या पती-पत्नीच्या गहिऱ्या नात्यालाही धक्का न पोहोचवता ज्या पद्धतीने दिग्दर्शकाने फिल्म कॅरी केलीय, त्याला हॅट्स ऑफ. त्याच वेळी सर्व कलाकारांचंही मोठेपण इथे मान्य करावं लागेल, एक्स्प्रेशन, देहबोली, संवाद सर्वांमधूनच त्यांनी चित्रपटाच्या आशयघनतेचा पदर ढळू दिला नाही. सो त्यांचंही दिग्दर्शकाइतकंच मोठं श्रेय. अंकुश-तेजश्रीचे सिनेमाच्या अखेरचे काही सीन्स केवळ अफलातून. हे झालं चित्रपटाबद्दल.
याच निमित्ताने आपण साऱ्यांनीच आपल्या आयुष्यातल्या पहिल्यावहिल्यात डोकावलं तर....म्हणजे फक्त पहिलं प्रेम नव्हे हं....अगदी शाळेचा पहिला दिवसापासून याची सुरुवात केली तर.... शाळेतला पहिला दिवसच घेऊया ना.....तो जर विचारात घेतला तर बहुतेकांना तो आठवणार नाही कदाचित. काहींना आठवेलही...इवलीशी वॉटर बॅग, छोटंसं दप्तर....युनिफॉर्म...बुट...थोडंसं किंवा काहींसाठी शाळा दिसली की रोजचं रडू....पुढे हेच क्षण आपण आपल्या मुलांमध्ये किंवा नातवंडांमध्ये बघतो, तेव्हा काळाची पावलं दौडत मागे जातात....आठवणींचा तो गुच्छ आपल्याला अनेक सुवासिक क्षणांचा दरवळ देऊन जातो, मागे सरलेल्या क्षणांची ती गोधडी लपेटून घेतल्यावर किती छान ऊब येते. अनुभवांची. कधी मुलगा, कधी बाबा किंवा कधी आजोबा होऊन हे क्षण जगता येतात, नात्यांचे संदर्भ, पदर वेगळे, भावनेचं ओथंबलेपण मात्र तेच.
अगदी २६ जुलैच्या पावसानेही भरलं नसेल इतक्या आठवणींचा पूर मग मनात येतो. आपल्याला ते क्षण पुन्हा जगावेसे वाटतात, किंबहुना आपण ते जगत असतो, आपल्या मुलांच्या, नातवंडांच्या रुपात. त्याच वेळी आठवण येते, मिळवलेल्या पहिल्या बक्षिसाची. आपल्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद, अन् त्याचवेळी आपल्या आईबाबांच्या चेहऱ्यांवर ओघळणारे आनंदाश्रू, सारंच स्तिमित करणारं. तीच अनुभूती आपण आई किंवा बाबा झाल्यावर....चेहरा बदलतो, भरभरुन वाहणाऱ्या आनंदाची जागा आता आपल्या मुलाच्या किंवा चेहऱ्यावर असते, तर त्याच्या आनंदाने आपण डोळ्यातून वाहत असतो.....
कॉलेजचे ते दिवसही अलगद आठवतात, असेच कधीतरी....पहिला व्हॅलेंटाईन डे, पहिला टाय डे....अन् बरंच काही, अगदी कॉलेजचा पहिला क्रशही....इथले दिवस जगून आयुष्य नावाच्या रेसमध्ये आपण खऱ्या अर्थाने पाय ठेवतो आणि जॉब नावाचं मेडल जिंकतो, तेव्हाचं सुख काही औरच.....तेव्हाही पुन्हा एकदा मन नॉस्टॅल्जिक होतं, आईवडिलांनी केलेले कष्ट आठवतात....आपलं पोट भरण्यासाठी ते अर्धपोटी झोपतात, आपल्या चेहऱ्यावरची तृप्तता पाहत, समाधानाची ढेकर देत....आपले हट्ट पुरे करण्यासाठी आपल्या स्वप्नांना आवर घालणारी आई, आपले लाड पुरवण्यासाठी सफारी सूटऐवजी साध्या शर्ट-पँटवर भागवणारे बाबा....हे सारं आपल्याला आठवतं, त्याच वेळी पहिली नोकरी मिळाल्याचं त्यांना जेव्हा आपण सांगतो, तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव शब्दात उतरवायला लेखणीही थिजी असते.
पुढे आपलं लग्न, मग नातवंडं, आयुष्याचं रहाटगाडगं सुरुच राहतं, त्याच वेळी प्रत्येक पहिल्या गोष्टीतलं थ्रिल, त्यातलं वेगळेपण, त्यातली गोडी हे एक्सक्लुझिव्ह असतं आणि राहणार.....या प्रवासात माणूस पहिल्यांदा जेव्हा कोणताही अनुभव घेतो ना....मग तो आनंदाचा क्षण असो वा कटू....तो लक्षात राहणारा असतो किंबहुना तो लक्षात ठेवावा....त्याने बरंच शिकता येतं...त्यातून पुढे जाता येतं.....झालेल्या चुका सुधारता येतात....
या पहिल्यावहिल्याबद्दल खरंच आयुष्याच्या काही ठराविक वर्षांनी आपण विचार केला पाहिजे, आयुष्य थोडंसं रिवाईन्ड करुन. दर १० वर्षांनी कदाचित. हायटेक युगात, पैसा हातात खुळखुळू लागलाय, पण हातात खेळणं होतं तेव्हापासूनचे क्षण आठवून पाहिले तर आपणच या लाईफस्टाईलचं खेळणं झालोय का, असाही विचार मनात येऊन जातो. आणखी पैसा, आणखी सोयीसुविधा, आणखी आलिशान जागा, आणखी उंची गाडी याची आस मनात जरुर असावी, महत्त्वाकांक्षा असायलाच हवी, पण त्याची जागा आता हव्यासाने घेतलीय का, हे जरा पहिल्यावहिल्या गोष्टी आठवून पाहिलं की, रिएलिटी चेक मिळेल.
आयुष्य म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास असं म्हटलं तर, तो प्रवास आणखी संस्मरणीय करण्यासाठी जर पहिल्या स्टेशनची पहिली पायरी केव्हा चढलो, कसे चढलो, कधी चढलो, हे चाचपून पाहिलं तर अनेक गोष्टी उलगडत जातील, अनेक बरेचसे प्रश्न पडणारच नाहीत कदाचित किंवा उत्तर लगोलग मिळतील. आयुष्य आणखी सुसह्य, काहीसं सोपं आणि बरंचसं लॉजिकल होईल. ती सध्या....च्या निमित्ताने मीही तुमच्यासोबत हा संवाद करतोय, त्याच वेळी माझ्या पहिल्यावहिल्या गोष्टींचा, अनुभवांचा अल्बम उघडतोय अलगद....अनेक यादगार क्षणांचा कोलाज सापडतोय....तुम्हीही पहिल्यावहिल्या आठवणींचं मोरपीस फिरवून बघा मनावर....
एका कलाकृतीची ही जादू आहे....जिने आयुष्य जगतानाच ते गहिरेपणानेही बघावं, हे सांगितलं. आयुष्य रिवाईन्ड केलं....अन् रिफ्रेश अन् रिचार्ज्डही.....थँक्स टू टीम सतीश राजवाडे....
अश्विन बापट
View More
























