BLOG | वंदनीय लतादीदींना पत्र...!
तुमचं गाणं ऐकताना आमची दु:ख, वेदना, अडचणी सारं काही गळून पडतं. सुरु असतो तो तुमच्या दैवी स्वरांचा आमच्या हृदयाशी संवाद. तुमची गाणी फक्त कानातच नव्हे तर मनात, हृदयात, रोमारोमात ऐकू येतात. दीदी, तुम्ही आमचं जगणं फक्त सुंदरच नाही, तर समृद्ध केलंय.
वंदनीय लतादीदी,
सविनय प्रणाम. अन् आपल्याला 91 व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. तुम्ही आमच्यासाठी जे भरभरुन दिलंय, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न. खरं तर तुमच्याबद्दल लिहिताना शब्द आणि बुद्धी दोन्हीही खुजी असल्याची पूर्ण जाणीव आहे. तुमची गीतं, तुमचा थक्क करणारा स्वरप्रवास, तुम्ही कुटुंबासाठी घेतलेले कष्ट, स्वत:च्या गाण्यासाठी घेतलेली मेहनत याबद्दल अनेक सिद्धहस्त लेखकांनी भरभरुन लिहिलंय. तरीही, या 91 वाढदिवसानिमित्ताने तुमच्याबद्दल लिहावसं वाटतंय. खरं तर शालेय जीवनापासून आता पत्रकारितेपर्यंतच्या आयुष्यातील विविध टप्प्यांमध्ये तुमच्या गाण्यांची साथ एखाद्या आपल्या माणसासारखी सोबत करतेय. ऋणुझुणु ऋणुझुणु किंवा अरे अरे ज्ञाना झालासी पावन सारखी भक्तिरचना आत्मिक शांतता, समाधान देते. 'सुखकर्ता, दु:खहर्ता' आरती तुमच्या आवाजात ऐकली की, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा उत्सव झाल्यासारखं वाटतं, गणपती बाप्पांची मूर्ती डोळ्यासमोर येते. हात आपोआपच जोडले जातात.
'भय इथले संपत नाही', सारखी रचना वेगळ्या वातावरणाची अनुभूती देते. दुसरीकडे राजसा जवळ जरा बसा..सारखं गाणं आपलं अस्तित्व विसरायला लावत.
त्याच वेळी 'अनपढ'मधलं आपकी नजरो ने..सारखं गीत किंवा लग जा गले...सारखं गाणं, आमचं मीपण पुसून टाकतं, कधी आम्ही त्या गाण्याचे आणि पर्यायाने तुमचे होऊन जातो, ते कळतही नाही. मेघा रे मेघा रे...गाण्यातला तुमचा स्वरवर्षाव आम्हाला अंतर्बाह्य भिजवून टाकतो. तर 'आके तेरी बाहो मे'..मधील आर्तता वेगळ्या विश्वात घेऊन जाते.
दीदी तुमचा ग्रेटनेस हा आहे की, काळाची पानं उलटली, संगीतकारांच्या, अभिनेत्रींच्या पिढ्या पुढे गेल्या तरी तुमच्या आवाजाची मोहिनी, सात्विकता, लाघव तेच आहे. म्हणजे 'आयेगा आनेवाला'मधल्या मधुबाला यांनाही तुमचा प्लेबॅक आणि 'लगान'मधील 'ओ पालनहारे' मध्ये ग्रेसी सिंगलाही तुमचाच आवाज. 'ये दिल तुम बिन' गीतात तनुजा यांनाही तुमचा प्लेबॅक तर 'डीडीएलजे'मध्ये त्यांची कन्या काजोलचं 'मेरे ख्वाबो में' ही तुम्हीच गायलंय. हे अचंबित आणि थक्क करणारं आहे.
तुमचं गाणं ऐकताना आमची दु:ख, वेदना, अडचणी सारं काही गळून पडतं. सुरु असतो तो तुमच्या दैवी स्वरांचा आमच्या हृदयाशी संवाद. तुमची गाणी फक्त कानातच नव्हे तर मनात, हृदयात, रोमारोमात ऐकू येतात. दीदी, तुम्ही आमचं जगणं फक्त सुंदरच नाही, तर समृद्ध केलंय.
भारतरत्न लतादीदी, तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून नमस्कार. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना.
जाता जाता इथे मला ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव यांचे तुमच्याबद्दलचे शब्द आठवतात. त्यांनी तुमच्याबद्दल लिहिलंय, 'सगळे गाती सूर लावूनि, जीव लावूनि गातो कोण, कवितेच्या गर्भात शिरुनी भावार्थाला भिडतो कोण'.