BLOG | स्वच्छतेमुळे रोगराईला दूर ठेवलेलं कोलाम पोड
यवतमाळ जिल्ह्याच्या डोंगराळ आणि जंगल भागांमध्ये वस्ती करुन पोडावर राहणारे आदिवासी कोलाम बांधव. निसर्गाशी जुळलेला हा समाज त्यांची वस्ती त्यांचे घर, त्यांचे अंगण आणि त्यांचा ठेवणारा हा दूत. ही साधीभोळी माणसं कसा काय आपला पोड रोगमुक्त ठेवतो, त्यांचे जगण्याचे प्रश्न काय यावर एक पोडावरच बातमीच्या अनुषंगाने भेट दिली तेव्हा जे पाहिलं जे अनुभवलं ते जसाच्या तसं.
यवतमाळ जिल्ह्याच्या डोंगराळ आणि जंगल भागांमध्ये वस्ती करुन पोडावर राहणारे आदिवासी कोलाम बांधव. निसर्गाशी जुळलेला हा समाज त्यांची वस्ती त्यांचे घर, त्यांचे अंगण आणि त्यांचा ठेवणारा हा दूत. ही साधीभोळी माणसं कसा काय आपला पोड रोगमुक्त ठेवतो, त्यांचे जगण्याचे प्रश्न काय यावर एक पोडावरच बातमीच्या अनुषंगाने भेट दिली तेव्हा जे पाहिलं जे अनुभवलं ते जसाच्या तसं.
अनेक जण म्हणतात, गावाकडे काय आहे? मी गावाकडे बरंच काही पाहिले, जे शहराकडे नाही. गावाकडे मुक्तहस्ताने सर्वांचे स्वागत करणारा निसर्ग आहे. डोंगराळ भागात राहणारे कष्टकरी आहेत, शेतकरी आहे. चटणी भाकरीत समाधान मानणारी आणि सीमित गरजा असलेली मनमिळावू माणसे आहेत. हक्काने आणि अधिकारवाणीने बोलणारी आणि सर्वाना आपलंसं करणारी जिवाभावाची माणसे आहेत. अशाच एका कोलाम पोडवर वास्तव जगणं.
यवतमाळच्या घाटंजी आणि पांढरकवडा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या शिवानी पोडावर आपल्या विश्वात जगणारी माणसं बघितली. या संपूर्ण पोडावर आपसात केवळ कोलामी भाषा बोलणारी ही माणसे. डोंगराळ भागात राहत असूनही ते बहुतांश मातीच्या, कुडाच्या घरात राहतात त्यांचे घर त्यांचे अंगण त्यांचा परिसर पोड स्वच्छतेच्या बाबत 100 टक्के मार्क मिळावे असाच आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत ही माणसे कुठेच कधीच तडजोड करीत नाही. प्रामुख्याने येथील महिलांना याचे श्रेय द्यावे लागेल. त्यासर्वांची स्वच्छतेच्या बाबत आग्रही भूमिका दिसून आली. महिलांची दिनचर्या पहाटे 5 वाजल्यापासूनच सुरु होते.
अनेकांची घर मातीची मात्र दारात सडा, सारवण, अतिशय सुंदर रांगोळी आणि घराच्या दारासमोर असलेला झाडू असं प्रत्येक घरी हमखास दृष्टीस पडणारे चित्र दिसते आणि त्यामुळेच आमच्या वस्तीकडे कुठलाच साथरोग किंवा जग ज्याला महामारी म्हणतात तो कोरोना कधीच येणार नाही असा विश्वास येथील ग्रामस्थांना आहे.
पहाटे महिला दारासमोरील अंगण, गल्लीबोळ झाडल्याशिवाय चहा घेणार नाही, स्वयंपाकाला हात लावणार नाहीत. आधी परिसर स्वच्छ, त्यात तुळशीजवळ आणि दारात सुबक रांगोळी मगच दुसऱ्या कामाला सुरुवात, असा अलिखित आणि नित्याचा दिनक्रम वर्षानुवर्षापासून येथे महिला पाळतात.
परिसरात केरकचरा कुणालाही दिसला की तो उचलून त्याचं नीट नियोजन केले जाते. या सर्वांचे घर, अंगण प्रसन्न दिसतं, कुणीही पाहताक्षणी प्रसन्न होईल असं ते स्वच्छ नीटनेटक कोलाम पोड. मोठ्या शहरांत अपार्टमेंटमध्ये राहतात त्या नागरिकांपेक्षा या कोलाम पोडावर स्वच्छता अधिक चांगली दिसते.
शिवानी साधारण 400 लोकवस्तीचे हे पोड. गावाच्या मध्यभागी चौकोनी आणि सीमेंट बांधकाम करुन तयार केलेले देवाचं ठिकाण त्याला लागूनच इलेक्ट्रिक खांबा, एवढा उंच एक लाकडी खांब आणि त्यावर झेंडा असं सारं चित्र.
त्या सर्वांची घर जवळपास असली तरी प्रत्येक घराला लागून एक बोळ- एक गल्ली आहे. प्रत्येक दारासमोर वाळलेल्या तुराट्याचा मंडप त्याला आंब्याच्या पानांचं तोरण, पसरीत एक झाडू आणि एक बाजूला त्रिकोणी लाकडी खांबावर पाणी पिण्यासाठी ठेवलेला माठ आणि काही एक बाजूला एक दोन बकऱ्या, एक-दोन गायी, पाच-सहा कोंबड्या असा सारा वैभव त्या प्रत्येक घरी दिसतो. बहुतांश रोजमजुरी करुन जीवनचरितार्थ चालवणारा हा समाज स्वभावता लाजाळू आहे .
चटणी भाकर खाऊ मात्र आपलं घर अंगण आणि परिसर स्वच्छ ठेवू अशी भूमिका या डोंगराळ भागात राहणार्या या कोलाम समाज बांधवांची असल्याने आज हा संपूर्ण भाग स्वच्छ रोगमुक्त पाहायला मिळतो .
आम्ही एकोप्याने राहतो अन् आमचं घर अंगण आम्ही स्वच्छ ठेवतो त्यामुळे कोरोना महामारी (बेमारी) आमच्या गावा येणार नाही असा विश्वास या बांधवांनी व्यक्त केला आहे. आदिवासी कोलाम बांधव प्रामुख्याने लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत आपसात कोलामी भाषा बोलतात.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रेडिओ, टीव्ही आणि मोबाईलवर ज्या कोरोना टाळण्यासाठी ज्या शासनाने खबरदारी म्हणून सूचना दिल्या त्यांचे पालन हे ग्रामस्थ करतात. कामाशिवाय घराबाहेर पडत नाही. घरातच राहून स्वच्छता पाळतात वेळोवेळी हात धुतात आणि लॉकडाऊनचे प्रत्यक्षात पालन करताना ही मंडळी दिसली.
सर्वच शेतमजूर, कष्टकरी समाज कुठे रोजमजुरी करुन उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या घरात फार काही अन्नाची साठवणूक केली नसल्याने त्यांच्या अडचणीत आता मात्र वाढ होताना दिसत आहे. अनेकांच्या जनधन खात्यात पैसे आले म्हणून आदल्या दिवशी बँकेत जाण्यासाठी 10 -12 किलोमीटरची सकाळी पायपीट केली. मात्र काहींच्या पदरी निराशा आली. अशाही काही महिला येथे भेटल्या पुढे कसा निभाव लागेल याचीही चिंता आता त्यांना वाटू लागली आहे.
आम्ही पूर्वीपासूनच आमचं घर, अंगण आम्ही स्वच्छ ठेवतो त्यामुळे कोरोना आमच्या गावात येणार नाही असा विश्वास या बांधवांना आहे. येथे राहणाऱ्या लोकांचा स्वभाव मनमिळावू आणि जिवाभावाचा आहे. इथे माणसं एकोप्याने स्वच्छता राखत असल्याने, त्या सर्वांनी रोगराईला दूर ठेवले आहे. त्यामुळेच या पोडावर कुठल्याही रोगाची साथ येणार नाही असं चित्र मला दिसले.