एक्स्प्लोर
Advertisement
BLOG | क्षी जिनपिंग : चीनचं वागणं समजण्यासाठी महत्वाचं आहे हा माणूस कळणं!
अमेरिकेतही एकवेळ ट्रम्प यांच्याविरोधात आंदोलनं होऊ शकतात, ते निवडणूक हरू शकतात, पण, क्षी हे चीनमध्ये आजीवन सर्वोच्च स्थानी आहेत आणि यापुढेही राहणार आहेत. कारण, त्यांच्याजागी कुणाची निवड होण्यासाठी निवडणुकाच होणार नाहीत.
क्षी जिनपिंग....
फक्त चीनच नव्हे, जगातील सर्वशक्तिमान व्यक्ती...
अमेरिकेतही एकवेळ ट्रम्प यांच्याविरोधात आंदोलनं होऊ शकतात, ते निवडणूक हरू शकतात, पण, क्षी हे चीनमध्ये आजीवन सर्वोच्च स्थानी आहेत आणि यापुढेही राहणार आहेत. कारण, त्यांच्याजागी कुणाची निवड होण्यासाठी निवडणुकाच होणार नाहीत. जगातील पहिल्या क्रमांकाची लोकसंख्या, दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, तिसऱ्या क्रमांकाची सैन्यसुरक्षा आणि अतिपूर्वेपासून, आग्नेय आशिया आणि मध्यआशियापर्यंत पसरलेल्या प्रचंड आकारमान असणाऱ्या देशाचा सर्वोच्च नेता आहे. क्षी जिनपिंग. चीनी राष्ट्राचा निर्माता माओ त्से तुंग आणि आधुनिक चीनचा उद्गाता डेंग झाओपिंग यांच्यानंतर हयातीतच अख्यायिका बनलेला नेता आहे क्षी जिनपिंग.
हजारो मैलांचा प्रवास आधी पहिल्या पावलानं सुरू होतो. चीनी तत्वज्ञ लाओ त्झूचं हे विधान क्षी जिनपिंग यांच्या आयुष्यालाही लागू होतं. चीनचा सर्वोच्च नेता, जगातला सर्वशक्तिमान व्यक्ती असलेल्या क्षींच्या आयुष्याची सुरूवात जरी सत्ता नांदणाऱ्या घरातून झाली तरी, कुमार वयातंच त्यांना खडतर जीवनही जगावं लागलं. क्षी यांचे वडिल क्षी झॉंगझुन यांनी चीनी यादवीच्या काळात माओसोबत क्रांतीत सहभाग घेतला. माओनंतरचे ते महत्वाचे नेते होते. अशा घरात क्षी यांचा जन्म 1953 मध्ये झाला. राजकारणाचं बाळकडू त्यांना तिथूनच मिळालं. मात्र, 1962 मध्ये माओ यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्या एका पुस्तकाची पाठराखण केल्यामुळे क्षी यांच्या वडलांची माओच्या कम्युनिस्ट पक्षानं हकालपट्टी केली. तिथूनच क्षी कुटुंबियांची परवड सुरू झाली. याच काळात कुमार वयीन क्षी यांना चीनच्या वायव्येकडील क्षांझी प्रांतात कष्टाच्या कामांसाठी पाठवण्यात आलं. तिथून पळून क्षी बिजिंगला आले जिथं ते सहा महिने तुरूंगात होते. तिथून पुढे क्षी लियांगझ्ये या यानान प्रांतातल्या गावी आले जिथं क्रांतीकारकांचा तळ होता. गुफांमध्ये राहणं, प्रचंड कष्ट, गरीबी अशा परिस्थिीत क्षी यांनी तिथं सहा वर्ष काढली. 1970ला सांस्कृतिक क्रांती कोसळल्यावर जिथं अन्य तरूण सामान्य आयुष्य जगू लागले, तिथंच क्षी यांनी मात्र कडवा कम्युनिस्ट होण्याचं ठरवलं.
1973, क्षीनं या काळात कम्युनिस्ट पक्षात दाखल व्हायचं ठरवलं. मात्र, क्षीला तब्बल 10 वेळा प्रयत्न केल्यावर पक्षाचं सदस्यत्व मिळालं. क्षीच्या वडिलांच्या माओविरोधी इतिहासानं त्यांची इथंही अडवणूक केली. याच दरम्यान, माओचा मृत्यू झाला आणि डेंग झाओपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीन कात टाकू लागला. याच काळात तरुण क्षीच्या आयुष्यातही बदल होत होते. 1975 साली बिजिंगमधल्या त्सिंगहुआ विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीत पदवी मिळवून क्षी प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय झाले. पुढे दोन दशकांत त्यांनी चीनच्या विविध भागात पालिका आणि शासनाच्या अनेक पातळ्यांवर काम केलं. क्षी यांच्या कारकिर्दीत, झेजियांग प्रांतात 2002 ते 2007 दरम्यानची पक्षप्रमुखाची जबाबदारी ही महत्वाची घटना ठरली. इथं त्यांनी खासगी उद्योगांना उत्तेजना देऊन आर्थिक प्रगती साधून दाखवली. ज्यामुळे, क्षी यांचा पक्षांतर्गत पाठिंबा वाढला. पुढे, चेन लियांग्यु या शांघाईमधल्या पक्षप्रमुखाला भ्रष्टाचारामुळे हटवण्यात आलं, तेव्हा क्षी यांनी त्यांच्या जागी नेमणूक झाली. शांघाईमध्ये क्षी यांनी पडद्यामागेच राहणं पसंत केलं. आणि अचानक 2007 मध्ये त्यांची निवड पक्षाच्या सर्वोच्च अशा पॉलिटब्युरो स्टॅण्डिंग कमिटीमध्ये झाली. याच काळात क्षी आणि आज चीनचे पंतप्रधान असलेले ली केकियांग यांना तत्कालीन चीनचे राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचे उत्तराधिकारी मानलं जाऊ लागलं. 2008मध्ये क्षी उप राष्ट्राध्यक्ष झाले. आता सर्वोच्च पदापासून ते फक्त एक पाऊल दूर होते.
पक्षीय राजकारणात अशी चढती कमान असलेल्या क्षी यांचं 1987 मध्ये पेंग लुयान या लोकगीत गायिकेशी लग्न झालं. क्षी यांच्यामुळे त्यांची पत्नी पेंग यांचाही झपाट्यानं राजकीय उदय झाला. चीनी सैन्याच्या संगीत दलात त्या मेजर जनरल हुद्यापर्यंत गेल्या. प्रचारकी गाणी प्रभावी आणि आकर्षकपणे रचण्यात त्या वाकबगार आहेत. त्यांना क्षी मिंग्झी ही मुलगीही आहे जिनं हार्वर्डमध्ये शिक्षण घेतलंय.
कम्युनिस्ट पक्षाच्या आणि देशाच्या अध्यक्षपदाकडे क्षी यांची झालेली वेगवान वाटचाल विस्मयकारक आहे. काही तज्ज्ञ यामागे क्षी यांच्या वडलांची पुण्याई असल्याचं सांगतात. 1970 नंतर बदललेल्या चीनमध्ये आणि चीनी कम्युनिस्ट पक्षात माओच्या काळात अन्याय झालेल्यांबाबत सहानुभूती निर्माण झाली. त्याचाच फायदा क्षी यांना मिळाला. अखेर, 2013मध्ये कम्युनिस्ट पक्षाचं महासचिव पद, केंद्रीय लष्करी आयोगाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर, क्षी चीनचे राष्ट्राध्यक्ष झाले. अर्थात, 1997 साली केंद्रीय समितीतील शेवटचा सदस्य ते राष्ट्राध्यक्ष होईपर्यंतचा क्षी यांचा प्रवास गूढ आणि रहस्यमय आहे. इथं हेही सांगायला हवं की, क्षी हे त्यांच्या आधीच्या नेत्यांपेक्षाही अधिक समार्थ्यवान होते, कारण त्यांच्याकडे एकाचवेळी पक्षाचं महासचिवपद, लष्कराचं प्रमुखपद आणि राष्ट्राध्यक्ष पद ही तीन पदे होती व आहेत. सत्तेवर येताच क्षी यांनी पक्षात व देशात भ्रष्टाचारविरोधी मोहिम राबवली. अनेक यानिमित्तानं क्षी यांनी आपल्या अनेक प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढला आणि चीनमधल्या शक्तीशाली लोकांवरही वचक बसवला. सामान्य चीनी जनता मात्र यामुळे क्षी यांच्यावर खुश होती.
11 मार्च 2018, चीनच्या आधुनिक इतिहासात ही तारीख कायम आठवली जाईल. याच दिवसापासून क्षी यांचा राष्ट्राध्यक्ष ते राष्ट्रपिता होण्याचा मार्ग मोकळा झाला. कारण याच दिवशी चीनी घटनेतून राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकालाच्या मुदतीची सीमा काढण्यात आली. त्यामुळे आता क्षी चीनचे तहहयात अध्यक्ष बनले आहेत. इतकंच काय, खुद्द माओनंतर क्षी हेच असे चीनी नेते आहेत ज्यांचे राजकीय विचार हे चीनी घटनेत अंतर्भूत करून घेण्यात आलेत. अशा प्रकारे क्षी चीनचे राष्ट्रपिताच बनलेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अर्थात, यामागे क्षी यांची एक दुखरी नसही आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी इतक्या लोकांना दुखावलं आहे, की त्यांनी सत्ता सोडल्यास त्यांचे सगळे विरोधक क्षी यांचं जगणं अवघड करून टाकतील.चीनमध्ये आपलं नेतृत्व अढळ केल्यानंतर आता क्षी यांना जगात चीनचं पर्यायानं स्वत:चं एकमेवाद्वितीय नेतृत्व प्रस्थापित करायचं आहे. त्यातूनच, चीनच्या आधीच्या सर्व आंतरराष्ट्रीय भूमिकांना क्षी तिलांजली देतायत. हाँगकाँगसाठीची एक देश-दोन धोरणं भूमिका, तैवानची स्वायत्तता, दक्षिण चीनी समुद्रात कृत्रिम बेटं बनवणं, रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्हद्वारे लहान-मोठ्या देशांना अंकित करणं, सागरी राष्ट्रांवर आर्थिक जाळं टाकून महत्वाचे सागरी व्यापारी मार्ग अंकित करणं, आफ्रिकेत प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करणं, भारतासारख्या प्रतिस्पर्ध्याला सर्व बाजूनं घेरणं, अमेरिकेला विविध स्तरांवर स्पर्धा उभी करणं अशा प्रकारे चीन आज जगातील सर्वात विध्वंसकारी शक्ती बनत चाललीय. आणि आता तर कोरोना हेही चीनच्या या जागतिक महत्वाकांक्षेला प्रत्यक्षात आणण्याचं जैविक अस्त्र असल्याचीही चर्चा आहे.
क्षी यांची ही राजकीय वाटचाल जगाच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेली नाही, आणि ती शेवटचीही नसेल. मात्र, आसुरी महत्वाकांक्षा ठेवून जग जिंकायला निघालेल्या नेपोलिअन, हिटलर, चंगेझ खान अगदी अमेरिका यांचे तळपणारे सूर्य अस्ताकडेही जातातच हा इतिहास क्षी विसरलेले दिसतात. अर्थात, हुकूमशहांच हेही एक लक्षणच असतं...नाही का?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement