एक्स्प्लोर

BLOG | राम जाने..

उद्धव ठाकरे यांनी आज सरकारला 100 दिवस झाल्यानिमित्त अयोध्या दौरा करुन शिवसेनेनं कडवं हिंदुत्व सोडलं नसल्याचं आधोरेखित केलं. राजकारणात रामाचं नाव हे केंद्रस्थानी राहिलंय. पण सुप्रीम कोर्टानं जेव्हा वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचा आदेश दिला, तेव्हा अयोध्येला भेट दिल्यानंतर आमचे प्रतिनिधी अभिजित करंडे यांचे अनुभव...

9 नोव्हेंबर 2019 चा दिवस. दुपारी दीडचा सुमार. मी लखनौ एअरपोर्टबाहेर उभा होतो. ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस सुरु होता. मी जमेल तितक्या वाचत होतो. अर्थात अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिरच उभं राहणार असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिला होता. शिवाय मुस्लिमांना मस्जिद बांधण्यासाठी स्वतंत्र 5 एकर जागा उपलब्ध करुन द्या असंही कोर्टानं उत्तर प्रदेश सरकारला सांगितलं होतं. त्यामुळे आजूबाजूला उभ्या असणाऱ्या प्रवाशांमध्येही त्याचीच चर्चा होती. अनेकजण आनंद, समाधान व्यक्त करत होते. काहींच्या बोलण्यात ‘अखेर रामाचा वनवास संपला’ असे शब्द होते.

तेवढ्यात माझा फोन वाजला. तो आमच्या सारथ्याचा बिपीनचा अर्थात ड्रायव्हरचा होता. त्याच्यासोबतच पुढचे दोन-तीन दिवस काढायचे होते. बिपीन आला. लगबगीनं त्यानं आमचं सामान गाडीत ठेवण्यासाठी मदत केली. मी त्याला विचारलं की आपल्याला अयोध्येला पोहोचायला किती वेळ लागेल? तो म्हणाला फारतर अडीच-तीन तास. त्यामुळे डोक्यात लवकर पोहोचून काय काय करता येईल याची गणितं सुरु होती. अयोध्येतील सहकाऱ्यांशी बोलून गेल्या-गेल्या कुठून सुरुवात करायची हे ठरत होतं.

अर्धं अंतर पार पडलं. सोनिया गांधी ज्या रायबरेलीतून निवडून येतात ते शहर काही अंतरावर दिसत होतं. मी बिपीनला म्हटलं.. 'की यार कुछ खाना पडेगा.. सुबह से हमने कुछ नहीं खाया है.. अच्छा होटल देख कर रोक लेना..' तसंही रस्त्यात एकही बरं हॉटेल दिसत नसल्याचं आम्ही पाहातच होतो. त्यानं रायबरेलीच्या चौकातल्या हॉटेलावर गाडी थांबवली. बऱ्याच आलिशान गाड्या इथं दिसत होत्या. त्यामुळे हे थोडं बरं हॉटेल असावं असं वाटलं. पण तेही यथातथाच होतं.

BLOG | राम जाने.. भरभर उरकून पुढं जायचं असल्यानं तरातरा चालत हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर गेलो. फोनवर बोलणं चालूच होतं. तेवढ्यात कॅमेरामन अजितही आला. आम्ही बिपीनची वाट पाहात होतो. पण 5-10 मिनिटं उलटल्यानंतरही बिपीन उगवत नसल्यानं मी अजितला एकदा त्याला पाहून ये म्हटलं. अजित खाली गेला, आणि बिपीन त्याच्यापाठोपाठ वर आला. मी फोनवरच बोलत होतो. मी त्याला बस म्हणून खुणावलं पण तो बसला नाही. अखेर फोन संपल्यावर मी जरा वैतागून म्हटलं.. यार बिपीन जल्दी जल्दी करो.. हमें जाके काम भी करना है.. त्यावर तो म्हणाला की साहब मै नीचे जाके खाता हूँ.. मी म्हटलं यहाँ क्या दिक्कत है..? त्यावर कसंनुसं होत दोन मिनिटं पॉझ घेऊन बिपीन म्हणाला साहब हम आपके साथ नहीं बैठ सकते.. हम छोटी जात से है.. माझ्या अंगावर हे ऐकून काटाच आला. मी कामानिमित्त आणि फिरण्यासाठी म्हणून कमीत कमी 10 ते 15 राज्यं पालथी घातलीत. तिथं जातीयवाद नाही असं नाही. तो सगळीकडे आहे. पण इतक्या उघडपणे असा अनुभव आल्यानं थोडं बावचळलो. शेवटी दमदाटी करुन मी त्याला समोरच बसवलं. जेवण मागवलं. कुणीही एक अवाक्षरही बोललं नाही. मी बिल दिलं. त्यानंतर बिपीननं उरलेला भात आणि डाळ पुन्हा पॅक करुन देण्याची विनंती वेटरला केली. मी बिपीनला म्हटलं की आपण अजून बरेच फिरणार त्यात एवढी गरमी आहे. अन्न खराब होईल. पण बिपीनला ते पॅक करुन हवंच होतं. मी त्याला फार विरोध न करता घे म्हणून सांगितलं. पण त्यामुळे डोक्यात भुंगा सुरु झाला. गाडीत बसल्यावर मी बिपीनची चौकशी केली. तर पठ्ठ्या गेली 3 महिने कामासाठी झगडत होता. आजची ड्युटी त्यानं व्हेंडरच्या हातापाया पडून घेतली होती. घरात रेशन संपत आलं होतं. घरात बायको आणि एक लहान मूल होतं. ऐन दिवाळीतही बिपीनच्या घरी चार दिवेही नीट पेटले नव्हते. लिहायलाही धजत नाही, इतकी वाईट अवस्था होती. त्यामुळे चार-पाच चमचे भात आणि डाळीची किंमत काय असू शकते याची जाणीव झाली. प्रभू रामाची अयोध्या अजून तासाभरावर होती. त्याआधीच माणसाच्या आयुष्यात खरंच राम उरलाय का? आपण कसे जगतो? एखाद्याकडे भरमसाठ आणि दुसऱ्याकडे मूठभरही का नाही? असे समाजवादी प्रश्न पडून पार नैराश्य आलं. रायबरेलीपासून फैजाबादपर्यंत म्हणजे अयोध्येपासून गाडी 5-7 किलोमीटरवर असेपर्यंत गाडीत कुणीही काहीही बोललं नाही. बिपीन कदाचित चार दिवसानंतर काय? या विचारात असेल. आणि मी आयुष्यातला राम कशात आहे? याचा विचार करत होतो.

BLOG | राम जाने..

रात्री बिपीननं कामात खूप मदत केली. त्याला चॅनलचं काम कसं चालतं पहिल्यांदा बघायला मिळालं. काम संपलं तोवर जेवणाची वेळ उलटून गेली होती. राहायला हॉटेल मिळत नव्हतं. त्यामुळे डोक्याची मंडई झाली होती. अखेर रात्री साडेअकराला रुम मिळाली. अगदी साधी. एक बेड आणि टॉयलेट-बाथरुम. बिपीन पुन्हा कसानुसा झाला. रुमपेक्षा बाहेर गाडीत झोपतो म्हणाला. दिवसभर काम केल्यानंतर त्याला अशा अवस्थेत सोडणं योग्य नव्हतं. त्यामुळे त्याला रुममध्येच झोप म्हणून सांगितलं. जेवण मागवलं तर बिपीनला दुपारच्या पार्सलची आठवण झाली. अर्थात ते खराब झालं होतं. ते बघून बिपीनचा चेहराच उतरला. त्याची समजूत घातली. पण दोन वेळच्या जेवणाचे हाल होत असलेल्या माणसाला तुम्ही काय समजून सांगणार?

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर काम सुरु झालं. शरयू घाटावर लोकांची बरीच गर्दी होती. स्नान, अर्घ्य, पूजाअर्चा, भजनं आणि रामनामाची भजनं. त्यात भव्य राम मंदिर उभारण्याचं स्वप्नं सत्यात उतरत असल्याचा आनंद. त्यामुळे एकदम माहौल होता.

शहरभर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. सगळ्या सीमा बंदिस्त. गावात वाहन नेण्यास बंदी होती. त्यामुळे सगळी परेड चालत. आम्हीसुद्धा शरयू घाटावरून चालत चालत कार्यशाळेडे निघालो. जिथं राम मंदिरासाठीचे दगड घडवण्याचं काम सुरु होतं. जाताना जुन्या अयोध्येचा नजारा दिसू लागला.

भव्य वाडे. भक्कम दरवाजे. छोट्या वीटांची जुनी घरं. कळकट्ट. रंग उडालेली. काही पडलेली. रया गेलेली. अरुंद गल्ल्या. मध्येच वाहन पार्क केलेलं. म्हणजे फारतर दुचाकी जाईल तेवढीच रस्त्यावर जागा. दोन्ही बाजूला गटारं उघड्यावर वाहतायत. मुलं रस्त्यावरच खेळतायत. मोकाट जनावरांचा तर सुळसुळाटच. कचरा उचलणारे लोक दिसतायत. पण तेसुद्धा सगळं साफ करता करत मेटाकुटीला आलेले. साडेपाच सहा लाखाचं शहर. त्यात रामाची भूमी. वर्षाला कोट्यवधीचा निधी इथं येतो. पण त्याचं काय होतं? रामच जाणे.

BLOG | राम जाने..

अयोध्येत शेकड्यांनी आश्रम आहेत. अगदी रहिवाशी भागातही. जिथं साधू, योगी आणि हटवाद्यांचं वास्तव्य असतं. त्यांची जगण्याची पद्धत आणखीच निराळी. ते ब्रह्मचारी. त्यामुळे स्वत:ची सगळी कामं स्वत:च्या हातांनीच करण्याची पद्धत. प्रत्येकाची पूजेची, भक्तीभावाची पद्धत वेगळी. कुणी फक्त अंगाला राख लावून. कुणी एकाच पायावर. कुणी मौनात. रामाच्या भूमीत जगण्याच्या आणि जगवण्याच्या अशा नाना तऱ्हा दिसतात. पण अयोध्येत एक धागा समान आहे आणि तो म्हणजे रामनाम. शरयू तीरापासून ते रामलल्लापर्यंत कुठेही जा, तुम्हाला रामनाम ऐकू येतच राहणार. कुठे भजन, कुठे रामाचा महिमा सांगणाऱ्या कथा तर कुठे केवळ रामनामाचा जप आणि अगदीच काही नाही तर लांब कुठेतरी लाऊडस्पीकरवर अवध भूमीत सीयारामाची महती सांगणारं भजन, कीर्तन सुरुच असतं. राम या शहराच्या कणाकणात आणि मनामनात आहे, याची जाणीव क्षणाक्षणाला होत असते.

कार्यशाळेची सफर करुन आम्ही हनुमानगढीपाशी पोहोचलो. खालून शंभरएक पायऱ्या चढून गेल्यावर उंचावर हनुमान शांतपणे उभा आहे. तिथं जाणं म्हणजेही एक नवी कसरत असते. कारण रावणाची लंका जाळून आलेल्या हनुमानापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला सीआरपीएफ आणि पोलिसांच्या सुरक्षेचं कडं भेदावं लागतं. सुरक्षा रक्षकांकडे अत्याधुनिक एके-47 आणि काय काय शस्त्रं असतात. गढीकडे जाताना पोलिस एकेकाची कसून तपासणी करतात. मेटल डिटेक्टरही असतंच.

तिथून 500 मीटरवर रामलल्लांकडे जाण्याचा मार्ग आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे हेवी पोलीस बंदोबस्त होता. उत्तर प्रदेश पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच-पंचवीस जवान उभे होते. हातातले कॅमेरे वगैरे पाहून त्यांनी लांब उभं राहायला सांगितलं. पण आम्हाला दर्शन घ्यायचंय सांगितल्यावर त्यांनी आधी सगळी चौकशी केली. ओळखपत्र तपासलं. नाव, गाव, पत्ता बघितला. त्यानंतर कॅमेरा तर सोडाच, पण मोबाईल फोन, चार्जर, इअरफोन, खिशातली चिल्लर, हातातलं घड्याळ, पाकीट काहीही अंगावर ठेऊ नका असं सांगितलं. आणि तिथून आम्ही आत जायला निघालो.

जाताना आजूबाजूला दुकानं, त्यात रामाशी निगडीत वस्तू विकण्यासाठी ठेवल्या होत्या. पुढे गेल्यानंतर रामाच्या आयुष्यावरचे देखावे होते. त्यासमोर दानपेट्या. अर्थात हे सगळं खासगी लोकांनी उभं केलं होतं. तिथून आणखी पाचसातशे मीटर पुढे गेल्यानंतर दोन्ही बाजूला कमीत कमी शे-दीडशे ठिकाणी लॉकर्सची सोय. जिथं चुकून तुम्ही काही आणलं असेल तर लॉकरमध्ये ठेवायची व्यवस्था. आता पहिल्या चेक पोस्टनंतर तुम्ही किमान १ किलोमीटर अंतर चालून आलेले आहात. आणि यानंतर तुमची खरी कसरत सुरु होते. मग पुढचे दोन किलोमीटर तुम्ही बॅरिकेटिंग केलेल्या रस्त्याने चालायचं असतं. तुमच्यावर सीआरपीएफच्या जवानांची नजर असतेच. थोड्या थोड्या अंतरानं किमान 7 चेकपोस्ट पार करुन गेल्यानंतर आणि प्रत्येक ठिकाणी कडक सुरक्षा तपासणी झाल्यानंतर तुम्ही अखेर रामलल्लांकडे जाण्यासाठी सज्ज होता.

BLOG | राम जाने..

तुमच्या दोन्ही बाजूला बारीक लोखंडी सळ्यांची जाळी असते. तशीच डोक्यावर देखील. थोडक्यात तुम्ही एखाद्या लोखंडी सुरुंगातून चालत असता. आणि त्याच्या दोन्ही बाजूला अत्याधुनिक शस्त्रधारी धिप्पाड पुरुष आणि स्त्री जवान पहारा देत असतात. टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता असते. जवान निर्विकार चेहऱ्यांनी पहारा देत असतात. तुमची नजरानजर झाल्यानंतर ते साधं स्माईलसुद्धा देत नाहीत. बरं हा लोखंडी जाळीचा सुरुंग सरळसोट नाही. तो आडवातिडवा आहे. त्यातून एकावेळी एकच व्यक्ती चालत जाऊ शकते. दोन लोक एकत्रितपणे चालू शकत नाहीत. त्यामुळे स्वाभाविकपणे तुम्हाला लाईनमधूनच चालावं लागतं. असं किमान किलोमीटरभर गेल्यानंतर तुम्ही रामल्लापर्यंत जाऊन पोहोचता. ज्या जाळीतून तुम्ही चालताय ती कापून त्याला एक खिडकी केलीय. त्या खिडकीतून २०-२५ फुटावर रामलल्ला दिसतात. एका जीर्ण झालेल्या मोठ्या झोपडीवजा पालात त्यांचा मुक्काम आहे. त्यांच्याशेजारी सीआरपीएफचा जवान असतोच. तुम्ही जिथे उभे आहात तिथं एका बाजूला सीआरपीएफ जवान आणि दुसऱ्या बाजूला पुजारी. आम्ही गेलो तेव्हा नितेश नावाचा पुजारी तिथं होता. पाया पडल्यानंतर तो हातात प्रसाद ठेवतो. लोक जोरजोरात जयश्रीराम अशा घोषणा देतात. भाविक त्याला प्रतिसाद देतात. सुरक्षा रक्षक तितकेच निर्विकार दिसतात. पुजारी यांत्रिकपणे जयश्रीरामही म्हणतो आणि आशीर्वाद देऊन पुढं चलण्याचा मार्गही दाखवतो. तुम्ही डोळे भरुन रामाकडे पाहता. आनंदी होता. पण रामाचं काय? तो जगाचा पालनकर्ता, भूपती, आदर्श, एकवचनी, एकपत्नी, मर्यादापुरुषोत्तम आहे. प्रजेच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी तो वेळोवेळी अग्नीपरीक्षेला सामोरा गेला. त्यानं धर्म आणि राजधर्म दोन्ही पाळण्याचे संकेत आपल्या आदर्श वर्तनातून दिले. रावणाचा वध केल्यानंतर त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यास विरोध करणाऱ्या बिभीषणाला रामानं ठणकावून सांगितलं होतं, की मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणावर अंत्यसंस्कार केले नाहीस तर मी करेन. त्याच रामानं अवधभूमीत 1992 ला रक्तपात पाहिलाय. आणि त्यानंतरचा द्वेष अजूनही संपलेला नाही. आज रामाच्या भूमीत धर्म आणि राजधर्म जगवण्याची जबाबदारी योगींवर आहे. पण त्यांच्याच राज्यात राम आता अस्वस्थ, अगतिक झालाय का? असं वाटू लागलंय. कारण आजच्या घडीला राम त्याच्या भक्तांना उराउरी भेटू शकत नाही. गुजगोष्टी करु शकत नाही. कारणं राजकीय असोत की सामाजिक.. पण राम आजही वनवासात आहे. त्याच्या अवध भूमीत अजूनही बिपीनसारखे हजारो लाखोजण केवळ जातीमुळे पंगतीत बसून जेऊ शकत नाही. धर्माच्या नावाचं राजकारण होतं, आणि अनेकांचं शिरकाण होतं. रामाच्या नगरीत, त्याच्या राज्यात उघडी गटारं, ठिकठिकाणचा कचरा, पडके वाडे, इमारती, त्यांचे राडेरोडे आणि दुर्गंधीचा वास आहे. ज्या शरयूत त्यानं स्वत:ला सामावून घेतलं ती काठी ठिक्कर पडलीय. आयुष्यभर रामाची सावली बनून राहिलेला हनुमान अजूनही सीआरपीएफच्या सिक्युरिटीत किंवा जोखडात आहे. स्वत: रामालाही मोकळेपणानं चालता-फिरता येत नाही. भक्तांशी बोलता येत नाही.  रामराज्य म्हणावं असं त्याच्या अवध नगरीत आता काय उरलंय? म्हणूनच हजार-पाचशे कोटीचं मंदिर बांधलं तरी तिथं राम सापडणार का? की राम मनानं आधीच अयोध्या सोडून निघून गेलाय..?  रामच जाणे!

 
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Telangana SLBC Tunnel Accident : तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
Accident News : नगर-मनमाड महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहने एकमेकांवर धडकली
नगर-मनमाड महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहने एकमेकांवर धडकली
Manoj Jarange : मस्साजोग ग्रामस्थांचा सुरेश धसांना पाठिंबा! मनोज जरांगेंनी डागली तोफ; म्हणाले, 'माझ्यासाठी तो विषय...'
मस्साजोग ग्रामस्थांचा सुरेश धसांना पाठिंबा! मनोज जरांगेंनी डागली तोफ; म्हणाले, 'माझ्यासाठी तो विषय...'
Stock Market : एका वर्षात पैसे दुप्पट, आता शेअरची विभागणी होणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणारा स्टॉक कोणता?
एका वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केलं, पैसे दुप्पट बनवले, आता शेअरची विभागणी होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 22 February 2025Nashik Dargah Issue | नाशिकमधील अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनIdeas of India 2025 : Gaur Gopal Das, Motivational Speaker, and Monk | ABP MajhaManikrao Kokate Special Report : बंदुकीच्या लायसन्समुळे कोकाटेंचं बिंग फुटलं,राजीनामा कधी? : विरोधक

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Telangana SLBC Tunnel Accident : तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
Accident News : नगर-मनमाड महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहने एकमेकांवर धडकली
नगर-मनमाड महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहने एकमेकांवर धडकली
Manoj Jarange : मस्साजोग ग्रामस्थांचा सुरेश धसांना पाठिंबा! मनोज जरांगेंनी डागली तोफ; म्हणाले, 'माझ्यासाठी तो विषय...'
मस्साजोग ग्रामस्थांचा सुरेश धसांना पाठिंबा! मनोज जरांगेंनी डागली तोफ; म्हणाले, 'माझ्यासाठी तो विषय...'
Stock Market : एका वर्षात पैसे दुप्पट, आता शेअरची विभागणी होणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणारा स्टॉक कोणता?
एका वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केलं, पैसे दुप्पट बनवले, आता शेअरची विभागणी होणार
Kash Patel New FBI Director : FBI संचालक काश पटेलांनी उजव्या हातात गोफ अन् भगवतगीतेला स्मरुन घेतली शपथ, पण डाव्या बाजूला उभी राहिलेली 'ती' कोण?
FBI संचालक काश पटेलांनी उजव्या हातात गोफ अन् भगवतगीतेला स्मरुन घेतली शपथ, पण डाव्या बाजूला उभी राहिलेली 'ती' कोण?
Ganesh Utsav 2025 : पीओपी गणेश मूर्तीचा वाद सध्यापूरता मिटवला, सरकारची पुढची भूमिका काय?
पीओपी गणेश मूर्तीचा वाद सध्यापूरता मिटवला, सरकारची पुढची भूमिका काय?
Air India : एअर इंडियाच्या विमानात तुटलेली खूर्ची मिळाली, शिवराज सिंह भडकले, टाटांचा उल्लेख करत सगळंच काढलं
पूर्ण पैसे घेतल्यावर तुटलेल्या खूर्चीवर बसावं लागणं अनैतिक, प्रवाशांसोबत हा धोका नाही का? :शिवराज सिंह चौहान
तारकर्ली समुद्रात जाण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन पर्यटक बुडाले; दोघांचा दुर्दैवी अंत
तारकर्ली समुद्रात जाण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन पर्यटक बुडाले; दोघांचा दुर्दैवी अंत
Embed widget