Kojagiri Purnima 2024 : आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि तिथी
Kojagiri Purnima 2024 : शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे आपल्याला चंद्र आकाराने मोठा दिसतो.
Kojagiri Purnima 2024 : शारदीय नवरात्री आणि विजयादशमी झाल्यानंतर वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) म्हणतात. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अर्थात, कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं.
शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे आपल्याला चंद्र आकाराने मोठा दिसतो. यंदा कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच आज आहे.
यंदाची कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी?
पंचांगानुसार, या वर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा 16 ऑक्टोबरला, म्हणजेच आज रात्री 8.40 वाजता सुरु होणार आहे. तर, ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4.56 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानुसार, 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे.
कोजागिरी पौर्णिमेला उकळलेलं दूध पिणं अधिक महत्त्वाचं का?
असं म्हटलं जातं की, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणं ही अमृतसारखी असतात, म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दूध तयार करतात आणि रात्री ते चंद्रप्रकाशात ठेवतात. असं केल्याने चंद्राची किरणं त्या दुधावर किंवा खिरीवर पडतात आणि त्यावर अमृताचा प्रभाव होतो, असं मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा खीर प्रसाद म्हणून दिली जाते. या दिवशी चंद्रप्रकाशात दुधाचं सेवन केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते, असं म्हणतात.
कोजागिरी पौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य
कोजागिरी पौर्णिमेसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये कलश, तेल, 5 प्रकारची फळं, फूल, तूप, 11 दिवे, पानं, धूप, सुपारी, चंदन, अक्षतासह अन्य साहित्य एकत्र करा.
कोजागिरी पौर्णिमेची पूजा पद्धत
अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करा. मंदिराचा देव्हारा नीट स्वच्छ करा. त्यानंतर लाल कपडा पसरवून त्यावर देवी लक्ष्मीचा फोटो लावा. त्यानंतर देवीची पूजा सुरु करा. चंद्रोदयानंतर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर दूध किंवा खीरचा नैवेद्य दाखवून कुटुंबातील सदस्यांना दूध प्रसाद म्हणून द्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :