Urad Tur prices : तूर डाळ आणि उडीद डाळींच्या किंमतीत 15 टक्क्यांहून अधिक वाढ, चालू हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता
तूर (Tur) डाळ आणि उडीद (Urad) डाळीच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या सहा आठवड्यांमध्ये तूर डाळ आणि उडीद डाळींच्या तिंमतीत 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे
Urad Tur prices : तूर (Tur) डाळ आणि उडीद (Urad) डाळीच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या सहा आठवड्यांमध्ये तूर डाळ आणि उडीद डाळींच्या तिंमतीत 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. मागच्या सहा आठवड्यात डाळींच्या किंमती 97 रुपयावरुन 115 रुपये प्रति किलोवर गेल्या आहेत. देशातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळं पिकांच्या नुकसानीची चिंता वाढली आहे. चालू खरीप हंगामात एकरी क्षेत्रामध्ये घट येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
तूर आणि उडदाच्या क्षेत्रात यावर्षी घट
महाराष्ट्रातील लातूरमध्ये चांगल्या दर्जाच्या तूर डाळीची किंमत सहा आठवड्यांपूर्वी 97 रुपये प्रतिकिलो होती. ती किंमत आता 115 रुपये प्रति किलो झाली आहे. कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या पेरणीच्या आकडेवारीनुसार, मागील वर्षाचा विचार केला तर तूर आणि उडदाच्या क्षेत्रात यंदा घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तूरीखालील क्षेत्र 4.6 टक्क्यांनी कमी झाले आहे, तर उडीदाखालील क्षेत्रात 2 टक्क्यांची घट झाली आहे. प्रमुख तूर उत्पादक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं शेती पिकांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळं पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाकडे कल वाढला
सध्या शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाकडे कल वाढला आहे. शेतकरी सोयाबीनकडे वळल्यामुळं तुरीचा मोठा साठा नाही. यंदा तूर पेरणी देखील कमी झाली असल्याचे महाराष्ट्रातील कडधान्यांचे आयात करणारे व्यापारी हर्षा राय यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे उडीद पिकाचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तथापि, आयात वाढण्याची अपेक्षा असल्याने पुरवठ्यावर दबाव येऊ शकत नसल्याची माहिती देखील काही तज्ज्ञांनी सांगितली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये उडीद पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वात मोठ्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादक राज्य मध्य प्रदेशमध्ये उडदाचे पिक चांगले आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील पिक चांगल्या स्थितीत आहे. पावसामुळु जरी पिकांचे नुकसान झाले असले तरी, म्यानमारमधून आयात वाढण्याची अपेक्षा असल्याने उडदाच्या किंमती स्थिर राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारताला गेल्या चार महिन्यात चलनाच्या समस्यांमुळे म्यानमारकडून जास्त उडीद मिळाले नाही. ज्यामुळं मासिक उडीद आयात 50 टक्क्यांपेक्षा कमी झाली. आता चलन समस्या म्यानमारमधील निर्यातदारांसाठी अनुकूल झाली आहे. त्यामुळं आम्हाला आयात करण्यास मदत होईल असे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, वर्षभरापासून चढ्या राहिलेल्या मसूरच्या दरात ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 29 जून रोजी आयात केलेल्या संपूर्ण मसूरच्या किमती 71.50 प्रति किलो वरुन 8 ऑगस्ट रोजी 67 रुपये प्रतिकिलोवर घसरल्या आहेत. कॅनडामध्ये सध्या मसूर पिकामध्ये वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. जर तूरीचे भाव मजबूत राहिले, तर मसूरच्या किंमती टिकून राहून काही प्रमाणात तूरीऐवजी मसूरला पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच चना आणि मूग डाळीचे भाव देखील स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: