Tomato Price : महाराष्ट्रात टोमॅटोचे दर का वाढतायेत? शेतकऱ्यांना फायदा होतोय का? शेतमाल बाजार अभ्यासकांचं म्हणणं काय...
महराष्ट्रात टोमॅटोचे दर हे 100 रुपये प्रतिकिलोच्या पुढे गेले आहेत. कुठं 120 तर कुठं 140 रुपयांंच्या आसपास टोमॅटोचे दर आहेत. पण महाराष्ट्रात टोमॅटोच्या दरात एवढी वाढ का होतेय? याबद्दलची माहिती...
Tomato Price : सध्या देशभरात टोमॅटोच्या किमंतीत (Tomato Price) मोठी वाढ झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सध्या विक्रीसाठी टोमॅटो (Tomato) आहेत, त्यांना मोठा फायदा होत आहे. बाजारात टोमॅटोचा पुरवठा कमी असल्यामुळं दरात मोठी वाढ झाल्याचं बोललं जात आहे. सध्या महराष्ट्रात देखील टोमॅटोचे दर हे 100 रुपये प्रतिकिलोच्या पुढे गेले आहेत. कुठं 120 तर कुठं 140 रुपये प्रतिकिलोच्या आसपास टोमॅटोचे दर आहेत. पण महाराष्ट्रात टोमॅटोच्या दरात एवढी वाढ का होतेय? याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो, यासंदर्भात शेतमाल बाजार भाव अभ्यासक शिवाजी आवटे यांनी एबीपी माझाला सविस्तर माहिती दिली आहे.
15 एप्रिलपासून तीन ते चार जूनपर्यंत बाजारात टोमॅटो फेकून दिला जात होता. उत्पादन खर्च निघणेही शक्य नव्हते. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. साधारण: जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात सुधारणा व्हायला सुरुवात झाली. एप्रिल ते मे महिन्याच्या काळात प्रचंड ऊन होतो, अशातच टोमॅटोला दर नसल्यामुळं शेतकऱ्यांनी लागवडी करणे सोडून दिल्याचे मत शेतमाल बाजार भाव अभ्यासक शिवाजी आवटे यांनी व्यक्त केले. लागवडी सोडून दिल्यामुळं बाजारात माल येणार कोठून, त्यामुळं बाजारात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली.
10 एप्रिल ते पाच मे पर्यंत लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा
दरम्यान, 10 एप्रिल ते पाच मे पर्यंत जर टोमॅटोची लागवड केली, तर त्याला 2023 मध्ये सर्वोच्च दर मिळेल अशी माहिती शेतकऱ्यांना सांगितल्याचे शिवाजी आवटे म्हणाले. ही माहिती डिसेंबर 2022 मध्येच सांगितले होते. यानुसार बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड देखील केली. मात्र, बाजारभाव नसल्यामुळं त्या शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पिक सोडून दिले. पुढे जाऊन बाजार भाव वाढण्याची शक्यता असल्याचे माहिती शेतकऱ्यांनी दिली होती. तरीदेखील काही शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पिक उपटून काढल्याचे आवटे म्हणाले.
ऑगस्टनंतर टोमॅटोचे दर कमी होण्याची शक्यता
25 जुलैच्या पुढे टोमॅटोचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर टोमॅटोच्या दरात काही प्रमाणात घट येऊ शकते. मात्र, तेव्हासुद्धा टोमॅटोला 60 ते 70 रुपयांचा दर राहू शकतो अशी माहिती शिवाजी आवटेंनी दिली. हा दर 10 ते 15 ऑगस्टपर्यंत राहू शकतो असे आवटे म्हणाले. ऑगस्टनंतर टोमॅटोचे दर कमी होण्यास सुरुवात होईल. सप्टेंबरमध्येही टोमॅटोचे दर खूप कमी राहतील असे आवटे म्हणाले.
शेतकऱ्यांचा होतोय फायदा
ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो आहेत, त्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होताना दिसत आहे. यामध्ये व्यापाऱ्यांचा काही सबंध नाही, टोमॅटो हा नाशिवंत माल आहे. त्यामुळं शेतातून हा माल डायरेक्ट बाजारात जातो. त्यामुळं शेतकऱ्यांना थेट फायदा होत असल्याचे आवटे म्हणाले.
दर नसल्यामुळं मे महिन्यात लागवडी कमी झाल्या
शेतकऱ्यांनी दोन ते लाख रुपयांचा खर्च करुनही त्यांना सुरुवातीच्या म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात काही फायदा झाला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी पुढच्या लागवडी जोपासल्या नाहीत. टोमॅटो हे चार महिन्याचे पिक आहे. सुरुवातीचे दोन महिने ते बाजारात विकण्यायोग्य होणयापर्यंत तर दुसरे दोन महिने हे पिक विकण्यासाठी असतात. मात्र दर नसल्यामुळं मे महिन्यात लागवडी कमी झाल्या आहेत. याचा पुरवठ्यावर परिणाम होऊन दरात वाढ झाल्याचे शिवाजी आवटे यांनी सांगितले. उन्हाळ्यात पिकाकडे दुर्लक्ष झाल्यामुळं उत्पादनातही घट झाली असल्याचे आवटेंनी सांगितले.