Narendra Singh Tomar : कृषी क्षेत्रात बियाणांचा दर्जा महत्त्वाचा, लवकरच बियाणांचा माग काढणारी सीड ट्रेसेबिलिटी व्यवस्था सुरु करणार : कृषीमंत्री
Narendra Singh Tomar : भारत सरकारसाठी शेतकऱ्यांचं हित सर्वोपरी असल्याचं वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं.
Narendra Singh Tomar : भारत सरकारसाठी शेतकऱ्यांचं हित सर्वोपरी असल्याचं वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी केलं. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या बियाणांची (seeds) उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, मोदी सरकार (Modi Govt) लवकरच बियाणांचा माग काढणारी सीड ट्रेसेबिलिटी व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे. यामुळं बियाणे व्यापार क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचे तोमर म्हणाले. कृषी क्षेत्रात बियाणांचा दर्जा महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले.
शेतासाठी बियाणांची गुणवत्ता निश्चित करणं महत्त्वाचं
बियाणाचा विकास हा जगाचा विकास आहे. शेत कोणतेही असो, बियाणे महत्त्वाचे असते. कोणत्याही शेतासाठी बियाणांची गुणवत्ता निश्चित करणं अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तोमर म्हणाले. कृषी क्षेत्रात बियाणांचा दर्जा, त्याचा विकास, संख्यात्मक वाढ, शेतकरी वापर करणे आणि इतर लोकांनी वापर करणे, हा मोठा प्रवास आहे, या प्रवासात सहभागी होणारे लोक आपला व्यवसाय तर करत आहेतच. पण त्याच बरोबर त्यांची या क्षेत्राविषयक जबाबदारीही खूप महत्त्वाची आहे, जी सर्वांनी गांभीर्याने घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.
सीड ट्रेसेबिलिटी संबंधितांकडून सूचना घेण्यात आल्या आहेत. ते सुरु केल्यानं त्याचा फायदा शेतकऱ्यांना तसेच बियाणे क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या सर्व लोकांना होईल. बियाणे क्षेत्र योग्यरित्या चालेल याची खात्री होईल आणि त्या दिशेने योग्य वाटचाल केली जाईल असे तोमर म्हणाले. बियाणे क्षेत्र सुरळीत चालण्याच्या मार्गात कितीही अडथळे येत असले तरी सरकार याबाबतीत अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितलं.
सर्व घटकांच्या हितासाठी कायदेशीर सुधारणा
देशातील व्यापार-उद्योग क्षेत्र नीट आणि न घाबरता चालणे आवश्यक आहे. मोदी सरकारनं ते करुन दाखवले आहे. मोदी सरकारने पहिल्यांदाच देशातील करदात्यांचे आभार मानले आहेत. तसेच सर्व घटकांच्या हितासाठी कायदेशीर सुधारणा करुन देशातील सर्व वर्गांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. यावरुन सरकारची दूरदृष्टी दिसून येत असल्याचे तोमर म्हणाले. येत्या काळात आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर परस्पर विश्वासाचे हे वातावरण केवळ सुधारावे लागेल असे नाही तर ते अधिक दृढ करावे लागेल असे ते म्हणाले.
कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेचा कणा
कृषी क्षेत्र समृद्ध असून हे क्षेत्र अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भारत कृषी क्षेत्रात आघाडीवर आहे. तरीही तेलबिया, कापूस यासारख्या काही क्षेत्रांमध्ये ज्यामध्ये आपण अद्याप स्वयंपूर्ण होऊ शकलो नाही. यासाठी बियाणे क्षेत्राच्या संबंधितांनीही आयात कमी करुन देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी योगदान दिले पाहिजे असे तोमर म्हणाले. या दिशेने बियाणे उद्योगांनी आराखडा तयार करून त्यावर काम करणे आवश्यक आहे. येणारा काळ भारतासाठी खूप भाग्यमय असणार आहे. जगातील राजकीय परिस्थिती, भारताची विश्वासार्हता आणि आपले महत्त्व आज जगाच्या राजकीय व्यासपीठांवर वाढल्याचे तोमर म्हणाले. जगाच्या मोठ्या भागाला भारताकडून अपेक्षा असल्याचे तोमर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Rabi Season : यंदा रब्बी पिकांच्या क्षेत्रात 24.13 लाख हेक्टरची वाढ, कृषीमंत्री तोमर यांची माहिती, पाणी साठ्यातही मोठी वाढ