Rabi Season : यंदा रब्बी पिकांच्या क्षेत्रात 24.13 लाख हेक्टरची वाढ, कृषीमंत्री तोमर यांची माहिती, पाणी साठ्यातही मोठी वाढ
यावर्षी देशात रब्बी पिकांच्या लागवडीत (Cultivation of Rabi crops) मोठी वाढ झाली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे.
Rabi Season : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी पिकांच्या लागवडीत (Cultivation of Rabi crops) मोठी वाढ झाली आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत रब्बी पिकांच्या क्षेत्रात 24.13 लाख हेक्टरची वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी दिली. तोमर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रब्बी पिकांच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. लागवडीखालचे क्षेत्र येत्या काळात वेगाने वाढेल अशी आशा देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाच्या लागवडीत 14.53 लाख हेक्टरची वाढ
रब्बी पिकांच्या लागवडीत वाढ झाल्यामुळं नरेंद्र सिंह तोमर यांनी समाधान व्यक्त केले. आतापर्यंत देशात गहू लागवडीखालचे क्षेत्र हे 152.88 लाख हेक्टर झाले आहे. जे मागच्या वर्षी याच काळात 138.35 हेक्टर होते. गव्हाच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. मुख्य गहू उत्पादक राज्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे. गहू लागवडीखालचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.53 लाख हेक्टरने वाढले आहे. ही वाढ गेल्या चार वर्षातील सर्वाधिक आहे.
रब्बी पिकांचे लागवड क्षेत्र वाढून चांगले उत्पन्न अपेक्षित
रब्बी पिकांच्या लागवडीखालचे एकूण क्षेत्र 358.59 लाख हेक्टर आहे. जे सर्वसामान्य रब्बी क्षेत्राच्या 57 टक्के आहे. गेल्या वर्षी याच काळात रब्बी पिकांच्या लागवडीखालचे क्षेत्र हे 334.46 लाख हेक्टर होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत रब्बी पीक लागवडीचे क्षेत्र 24.13 लाख हेक्टरने वाढले आहे. अनुकूल मृदा ओलावा, पाण्याची सुधारलेली उपलब्धता आणि देशभरात खतांची पुरेशी उपलब्धता, यामुळं आगामी काळात रब्बी पिकांचे लागवड क्षेत्र वाढून चांगले उत्पन्न अपेक्षित असल्याचे नरेंद्र सिंह तोमर म्हणाले.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याची उपलब्धताही अधिक
सद्य स्थितीत देशभरातील 143 जलाशयांमध्ये पाण्याची उपलब्धता 149.49 अब्ज क्युबिक मीटर आहे. जी गेल्या वर्षीच्या याच काळातील उपलब्धतेच्या 106 टक्के आहे. गेल्या 10 वर्षातील याच काळातील सरासरी उपलब्धतेच्या 119 टक्के आहे. 15 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2022 या काळातील मृद ओलावा बहुतांश जिल्ह्यांत गेल्या सात वर्षांतील याच काळाच्या सरासरी पेक्षा जास्त आहे. देशाच्या बहुतांश भागांत खतांची मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाण समाधानकारक असल्याची माहिती देखील यावेळी कृषीमंत्री नरेंद्र सिहं तोमर यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: