Sangli Rain : सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, खरीपाच्या पिकांसह द्राक्ष बागांना मोठा फटका
सांगली (Sangli) जिल्ह्यात देखील परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. या पावसाने सोयाबीनसह, ऊस, खरीप पिकांचं तसेच द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं आहे.
Sangli Rain : परतीच्या पावसानं (Rain) राज्यात धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असून, या पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यात देखील परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. या पावसाने सोयाबीनसह, ऊस, खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर टोमॅटो आणि द्राक्ष बागांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.
सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात परतीच्या पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. सध्या सोयाबीन पिकांची काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी सोयाबीन काढून शेतात ठेवलं आहे. अशा स्थितीत जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं सोयाबीनचा मोठं नुकसान झालं आहे. तसेच भुईमूग, भाजीपाला या पिकांना देखील फटका बसला आहे. शेतात पाणी साचून राहिल्यानं हातात आलेली पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. या पावसाचा फटका द्राक्षांच्या बागांना होत आहे.
ऊस उत्पादकांचे धाबे दणाणले
सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाचे क्षेत्र आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु होणार आहे. तसे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहे. मात्र, सध्या राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. या पावसामुळं ऊसाचं पिक आडवं झालं आहे. तसेच शेतात पाणी साचून राहिलं आहे. त्यामुळं यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मागील वर्षाचा गळीत हंगाम लांबला होता. त्यामुळं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं होतं.
गेल्या चार दिवसापासून सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसानं चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तसेच मुसळधार पावसाने रस्त्यावर, शेतासह सर्वच ठिकाणी पाणीच पाणी झालं आहे. या पावसानं काढणीला आलेल्या खरीप पिकांसह, ऊस, भाजीपाला, द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक भागात ऊस आणि भुईमूग भुईसपाट झाला आहे. त्यामुळं उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. तर सततच्या पडणाऱ्या पावसामुळं नोकरदार वर्गाचे कार्यालयात जाईपर्यत चांगलेच हाल होत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: