Marathwada Rain : मराठवाड्यात परतीच्या पावसाचं थैमान, 'या' जिल्ह्यांना फटका, शेती पिकांचं मोठं नुकसान
परतीच्या पावसानं मराठवाड्यातही धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदडे आणि बीड जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे.
Marathwada Rain : परतीच्या पावसानं (Rain) राज्याच्या विविध भागात थैमान घातलं आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या परतीच्या पावसानं मराठवाड्यातही धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदडे आणि बीड जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. या पावसामुळं शेतकरी मात्र चिंतेत आहेत. कारण या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
बीड जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी
बीड जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी रस्तायंवर पाणीच पाणी झालं आहे. त्यामुळं वाहतुकीव परिणाम झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी शेती पिकांना देखील फटका बसला आहे. बीडच्या मांजरसुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जाधव वस्तीमध्ये रात्रीच्या जोरदार पावसामुळं घरात पाणी शिरलं आहे. जवळपास गुडघाभर पाण्यात या गावकऱ्यांनी जागून रात्र काढली आहे. मांजरसुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गाचे चार वर्षापासून काम रखडले आहे. याबाबत वारंवार नाली काढण्याविषयी तोंडी आणि लेखी तक्रारी करुन काहीही फायदा झाला नाही. जाधव वस्ती बाजूची शेतजमीन ही पाण्याखाली गेली आहे.
परभणी जिल्ह्यात काढणीला आलेलं सोयाबीन पाण्यात
परभणी (Parbhani) जिल्ह्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं काढणीला आलेलं सोयाबीन (Soybean) पूर्णपणे पाण्यात गेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. परभणीच्या सेलू तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं अनेक ओढ्यांना-नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आलं आहे. अचानक पडलेल्या या मुसळधार पावसामुळं अनेकजण शेतात अडकले होते. ज्यांना दोरीच्या सहाय्याने गावकऱ्यांनी सुखरुप बाहेर काढलं. महत्त्वाचे म्हणजे काढणीला आलेलं सोयाबीन पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सेलू तालुक्यातील वालूर, रायपूर, कुपटा या परिसरात पावसाचा जोर जास्त असल्यानं स्थानिक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळं तत्काळ पिक विमा आणि मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदी नाले ओढे तुडूंब
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. या पावसानं ओढे, नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. टेंभुर्णी गावाजवळ पूर आल्यानं पुलावर पाणी आलं आहे. त्यामुळं अनेक मजूर अडकून पडले होते. गावकऱ्यांनी बैलगाडीच्या सहाय्याने मजुरांना पुरातून बाहेर काढलं. हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून परतीच्या पावसाने हाहाकार घातला आहे. काल झालेल्या जोरदार पावसानं जिल्ह्यामधील अनेक ओढे, तुडुंब भरुन वाहत होते. ओढ्याचे पाणी रस्त्यावरून जात असल्याने टेंभुर्णी ते कुडाळा ही वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावरून शेतकरी आणि शाळकरी मुले प्रवास करत असतात. परंतू पूर आल्याने ही वाहतूक ठप्प झाली होती. तर या जोरदार झालेल्या पावसामुळं शेतीचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सोयाबीन आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. परतीच्या पावसानं ग्रामीण भागासह शहराला झोडपून काढलं. या पावसामुळं नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्या रस्त्यावर पाणीच पाणी झालं. काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळं नांदेड शहरातील भाग्यानगर, आनंदनगर, गोकुळनगर, कॅनल रोडवरील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे वाहन चालकासह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: