Record rates for Banana : नांदेडच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांची चांदी, केळीला पहिल्यांदाच मिळतोय विक्रमी दर
नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्याच्या केळीला देखील देशभरात मागणी आहे. या केळीला विक्रमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
Record rates for Banana : महाराष्ट्रातील जळगावच्या केळीचा जसा राज्यभर नाव लौकिक आहे, त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्याच्या केळीला देखील देशभरात मागणी आहे. 'अर्धापुरी केळी' नावानं नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्याच्या नावानं ओळखले जाणारे हे केळीचे वाण राज्यभरासह देशभर ओळखले जाते. अर्धापुरी या केळीच्या वाणाला राज्यासह देशात मागणी आहे. यावर्षी केळीला विक्रमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच केळीला दोन हजार रुपयांचा भाव मिळत असल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.
तब्बल 50 ते 60 किलो वजनापर्यंत जाणारे हे केळीचं वाण शेतकऱ्यांना मालामाल करणारे वाण म्हणून ओळखले जाते. अतिवृष्टी, उन्हाचा तडाखा आणि रोगराईनंतर यावर्षी केळीला विक्रमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुका हा देशभरात केळी उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. शंभर टक्के भिजवन क्षेत्र असणाऱ्या या तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. अर्धापुरी केळी या नावानं नावलौकिक असणाऱ्या अर्धापुरच्या केळीला देशात आणि विदेशात देखील चांगली मागणी आहे. परंतू दरवर्षी अतिवृष्टी, अवकाळी, उन्हाचा तडाखा, व्यापाऱ्यांची मनधरणी, या न त्या कारणामुळं या केळीला कमी भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फारसा फायदा मिळत नव्हता. परंतू, यावर्षी मात्र अर्धापुरच्या केळीला विक्रमी दर मिळाल्यानं शेतकऱ्यांची चांदी झाली आहे . दरम्यान, गेल्यावर्षी पूर, वादळ, पाऊस, अतिवृष्टीमुळं केळी पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. ज्यामुळं शेतकऱ्यांनी यावर्षी तालुक्यात केळीची कमी प्रमाणात लागवड केली होती. ज्यामुळं मागणी जास्त आणि उत्पादन कमी असल्यानं केळीचे भाव वाढून, दोन हजार प्रति क्विंटलं इतका विक्रमी भाव केळीला मिळत आहे.
दरम्यान, केळीच्या एका झाडाच्या लागवडीसाठी लागवड, खत-बियाणं, फवारणी यासह सरासरी 75 रुपये खर्च येत असतो. पण तेच एक झाड फक्त 50 रुपयाला विकल जायचं. ज्यामुळं शेतकऱ्यांच्या केळी लागवडीचा खर्च देखील निघत नव्हता. पण आता त्याच एका झाडाला 250 रुपये मिळत असल्यानं शेतकऱ्यांना मात्र सोन्याचे दिवस आले आहेत. सध्या चांगला भाव मिळत असल्यानं अर्धापुर, मुदखेड आणि भोकर तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड सुरु आहे. तर यंदा पाऊस चांगला पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ज्यामुळं नांदेड जिल्ह्यातील या परिसरातील शेतकरी केळी या नगदी पिकाकडे वळले आहेत.