सोयाबीननंतर मोझॅकनं पपईची वाट लावली, तात्काळ पंचनामे करुन मदत जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी
Mosaic Virus Outbreak: सोयाबीननंतर मोझॅक वायरसमुळे पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत, जिल्ह्यात 3 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील पपई बागांवर व्हायरसचा परिणाम झालाय.
![सोयाबीननंतर मोझॅकनं पपईची वाट लावली, तात्काळ पंचनामे करुन मदत जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी Mosaic virus outbreak on papaya crop Farmers Demand to Maharashtra Government for Help सोयाबीननंतर मोझॅकनं पपईची वाट लावली, तात्काळ पंचनामे करुन मदत जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/7dd723e5c9df740b16059d4c396d25fe169742564231188_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nandurbar News: राज्यात सोयाबीननंतर मोझॅक व्हायरसचा (Mosaic Virus) परिणाम पपई पिकावर (Papaya Crop) झाल्याचं दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar District) जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील पपईच्या बागा मोझॅक व्हायरसमुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य सरकारनं ज्याप्रमाणे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोझॅक व्हायरसमुळे नुकसानीची मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचप्रमाणे पपई उत्पादक शेतकऱ्यांनाही सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.
पपईवर आलेल्या विषाणूजन्य रोगांमुळे पपईच्या झाडावरील पानाची गळती लवकर होते. शेंड्याकडील पानं आकसतात, त्यामुळे फळं उघडी पडून उन्हामुळे खराब होतात. अशी फळं व्यापारी ही खरेदी करत नाहीत, जिल्ह्यात जवळपास 3 हजार हेक्टर पेक्षा अधिक पपईवर या मोझॅक व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी पपईवरील संकट दूर होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याकडे पाहिलं जातं. दरवर्षी पपई पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो, मात्र पपईवर संशोधन करण्यासाठी पपई संशोधन केंद्र राज्यात कुठे नसल्यानं पपई उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. त्यामुळे नंदुरबारमध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं पपई संशोधन केंद्र सुरू करून पपईवर येणाऱ्या विविध रोगांवर संशोधन करणं गरजेचं आहे.
पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे काय आहेत?
पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरांजवळ पिवळ्या रंगाचे चट्टे दिसतात. हे पिवळ्या रंगाचे चट्टे विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. सोयाबीनची पाने जशी वाढत जातात तसे त्यावर तांबूस रंगाचे चट्टे दिसू लागतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात आणि कोमजतात.
पिवळ्या मोझॅक रोगावर उपाय काय?
पिवळ्या मोझेक रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रोगग्रस्त झाडे मुळातून उखडून जमिनीखाली पुरणे अथवा निळे आणि पिवळे सापळे लावणे हा उपाय करण्याचे आवाहन कृषी विभागानं केलं आहे. या रोगामुळे उत्पादन क्षमता 30 ते 90 टक्क्यांपर्यंत घटतं. यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Chandrapur News : सोयाबीन पिकावर घातक रोगाचा प्रादुर्भाव! पिवळ्या मोझेक रोगावर उपाय काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)