Chandrapur News : सोयाबीन पिकावर घातक रोगाचा प्रादुर्भाव! पिवळ्या मोझेक रोगावर उपाय काय?
Chandrapur Yellow Mosaic Virus on Soyabean Crop : चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझेक रोगाचं संकट निर्माण झालं आहे.
चंद्रपूर : यंदा मुसळधार पाऊस (Rain) आणि त्यानंतर दीड महिन्यात पाऊस रखडल्याने आधीच शेती संकटात आली आहे. त्यातच आता सोयाबीन पिकावर (Soyabean Crop) पिवळ्या मोझेक रोगाचं आक्रमण दिसून येत आहे. यामुळे कृषी विभागाने (Agriculture) शेतकऱ्यांना वेळीच काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात नगदी पिकावर घातक रोगाचं संकट निर्माण झालं आहे. आधीच शेतकरी अवकाळी आणि अतिवृष्टी अशा दुहेरी संकटात सापडला असताना, आता या घातक रोगामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.
सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझेक रोगाचं संकट
सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीनवर येलो मोझॅक व्हायरसचा (Yellow Mosaic Virus on Soyabean) प्रादुर्भाव झाला आहे. चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात सध्या सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझेक रोगाचं (Yellow Mosaic Virus) संकट दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा आणि चिमूर तालुक्यात या रोगाचा प्रामुख्याने प्रादुर्भाव दिसून येत आहे. याविषयीची माहिती मिळताच कृषी विभागाने तातडीने नियंत्रण पथकासह शेतशिवारांना भेटी दिल्या. हा विषाणूजन्य रोग सोयाबीन पिकाची वाढ, फुलोरा आणि शेंगाधरणीच्या काळात फोफावत असल्यानं या रोगामुळे मोठं नुकसान होतं.
पिवळ्या मोझेक रोगावर उपाय काय?
पिवळ्या मोझेक रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रोगग्रस्त झाडे मुळातून उखडून जमिनीखाली पुरणे अथवा निळे आणि पिवळे सापळे लावणे हा उपाय करण्याचे आवाहन कृषी विभागानं केलं आहे. या रोगामुळे उत्पादन क्षमता 30 ते 90 टक्क्यांपर्यंत घटतं. यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
नगदी पिकावर घातक रोगाचा प्रादुर्भाव
चंद्रपूर जिल्ह्यात धान आणि सोयाबीन या पिकांमुळे शेतकरी आपला प्रपंच कसाबसा पुढे रेटतो. या परिस्थितीत सोयाबीन सारख्या नगदी पिकावर घातक रोगाचा प्रादुर्भाव आर्थिक स्थिती बिघडवणारा ठरणार आहे. त्यामुळेच या रोगाचे वेळीच नियंत्रण महत्त्वाचं मानलं जात आहे.
पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे काय आहेत?
पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरांजवळ पिवळ्या रंगाचे चट्टे दिसतात. हे पिवळ्या रंगाचे चट्टे विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. सोयाबीनची पाने जशी वाढत जातात तसे त्यावर तांबूस रंगाचे चट्टे दिसू लागतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात आणि कोमजतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :