APMC Market : 50 किलोच्या वर शेतमालाची गोणी येत असल्यानं माथाडी कामगार आक्रमक, प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांना फटका
बाजारात येणारा शेतमाल हा गोण्यांमध्ये येतो. या गोण्यांचे वजन हे 50 किलोपेक्षा जास्त असते. ते कमी करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगार करत आहेत.
Navi Mumbai APMC Market : नवी मुंबईच्या बाजार समितीत महाराष्ट्राबरोबर परराज्यातून मोठ्या प्रमाणात शेतमाल येत असतो. पाठवण्यात येणारा शेतमाल गोण्यांमध्ये असल्याने त्याचे वजन 50 किलोपर्यंत असावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगार करत आहेत. मात्र, याकडे एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी वर्गाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे माथाडी कामगारांकडून अनेक वेळा आंदोलनाचा पवित्रा घेतात. तसेच अनेकवेळा कामबंद आंदोलन देखील करण्यात येते. याचा फटका मात्र शेतकरी वर्गाला सहन करावा लागत आहे.
एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये 60 ते 70 किलोपर्यंत वजनाच्या गोण्या भरून येतात. या गोण्या रोज उचलून माथाडी कामगारांना शारीरीक इजा झाल्या आहेत. तर कामगार कामसस्वरूपी मनक्याच्या आजाराने बाद झाले आहेत. यावर राज्य सरकार आणि एपीएमसी प्रशासनाने लक्ष देवून शेतमालाच्या गोण्यांचे वजन 50 किलोपर्यंत असावे अशी मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना केली होती. गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगारांच्या असलेल्या या मागणीकडे एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अखेर काल (सोमवार) सकाळपासून अचानक माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने कांदा बटाटा मार्केट मधील व्यापार बंद पडला होता.
एपीएमसीमधील दाना मार्केट, मसाला मार्केट येथे 50 किलो वजनाचा शेतमाल येवू लागला आहे. मात्र, कांदा बटाटा मार्केटमध्ये हेच वजन अद्याप 60 किलो पर्यंत आहे. याबाबत व्यापारी वर्ग आणि माथाडी कामगार यांच्यात अनेकवेळा बैठकाही झाल्या आहेत. यासाठी माथाडी कामगारांनी तीन, चार आंदोलने देखील केली आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अखेर काल (सोमवार) सकाळपासून अचानक माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने कांदा बटाटा मार्केट मधील व्यापार बंद पडला होता. याचा फटका मात्र, शेतकऱ्यांना बसत आहे.
300 गाड्यांची आवक पडून
सोमवारी दिवसभर आंदोलन सुरू असल्याने कांदा, बटाटा मार्केटमध्ये आलेली 300 गाड्यांची आवक पडून होती. कांदा गाड्यांमध्येच पडून राहिल्याने तो खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, संध्याकाळी चारनंतर माथाडी कामगारांनी आंदोलन मागे घेत व्यापार सुरू झाल्याने रात्री उशीरापर्यंत 300 गाड्या आलेल्या कांद्याचा 60 टक्के खप झाला आहे. काल राहिलेल्या शंभर गाड्या शिल्लक असल्याने आज फक्त 80 कांदा गाड्यांची आवक झाली आहे. वारंवार काम बंद आंदोलन होत असल्याने याचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाय काढण्याची मागणी मार्केटमधील सर्व घटकांकडून होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: