यवतमाळ जिल्ह्यात महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा तुटवडा, शेतकरी चिंतेत
Maharashtra Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात महाबीज सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना नाईलाजानं महागड्या कंपन्यांची बियाणं विकत घ्यावी लागत आहेत.
Maharashtra Yavatmal News : यंदा यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात महाबीजच्या बियाण्याचा (Mahabeej Seeds) तुडवडा आहे. जिल्ह्याला 35 हजार क्विंटल बियाण्याची आवश्यकता असताना महाबीजकडून पुरवठा मात्र फक्त 3 हजार 500 क्विंटल इतकाच झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाबीज सोयाबीन बियाण्याचा तुडवडा (Soybean Seeds) निर्माण झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात साधारणतः तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात येते. यासाठी जवळपास 78 हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज असते. यातील 35 हजार क्विंटल बियाणं हे महाबीजकडून शेतकऱ्यांना पुरवण्यात येतं. मागील अनेक वर्षांपासून विश्वासार्ह्य बियाणं म्हणून शेतकरीसुद्धा महाबीज बियाणाची लागवड करतात. मात्र यावर्षी जिल्ह्याला केवळ तुटपुंज्या साडेतीन हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा महाबीजकडून करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर हा साडेतीन हजार बियाणांचा तुटवडा टप्प्याटप्प्यानं करण्यात आला आहे. यापुढेही महाबीज बियाण्याचा पुरवठा होईल, याचीही शाश्वती नाही. दरवर्षी महाबीजकडून जिल्ह्यात 35 हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा केला जात होता. मात्र यावेळी फक्त 3 हजार 500 क्विंटलच बियाणांचाच पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना विविध कंपन्याचं महागडं सोयाबीन बियाणं घेण्याची वेळ आली आहे.
गतवर्षी सोयाबीनच्या पिकानं शेंगा पकडल्यानंतर आलेल्या पावसानं शेंगांना कोंब फुटले. तर सोयाबीन काढणीच्या वेळेवर आलेला पाऊस यामुळे सोयाबीन काळं पडलं. बीजोत्पादन कमी झालं, परिणामी महाबीजकडे शेतकऱ्यांनी सोयाबीन दिलं नसल्यानं हा सोयाबीनचा पुरवठा यावर्षी कमी होणार आहे. साधारणतः 10 टक्केच बियाणं यंदा उपलब्ध झालं असल्याचं महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे यांनी सांगितलं आहे.
महाबीज बियाण्याकडे एक विश्वासार्ह्य बियाणं म्हणून शेतकरी पाहतात. मात्र आता या बियाण्यांच्या तुटपुंजा पुरवठ्यामुळं शेतकऱ्यांना इतर कंपन्यांचं महागडं बियाणं खरेदी करावं लागणार आहे. यातही त्यांची उगवण क्षमता किती राहील? याची शाश्वती नसल्यानं शेतकऱ्यांची सध्या चिंता वाढली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :