(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : नांदेडसह परभणीला जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपलं, शेती पिकं मातीमोल होण्याची शक्यता, शेतकरी संकटात
नांदेड (Nanded) आणि परभणी (Parbhani) जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या परतीच्या पावसानं शेतकरी मात्र चिंतेत आहेत. या पावसाचा शेती पिकांना फटका बसला आहे.
Maharashtra Rain : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र, जोरदार पाऊस पडत आहे. नांदेड (Nanded) आणि परभणी (Parbhani) जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या परतीच्या पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकरी मात्र चिंतेत आहेत. कारण या पावसामुळं हाताशी आलेली पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, सध्या पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु आहे, अशातच पावसानं हजेरी लावल्यानं शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस तर सकाळपासून रिपरिप सुरु
नांदेड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. तर सकाळपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. दरम्यान, कालपासून सुरु असलेल्या या जोरदार पावसामुळं शेतकरी मात्र, चिंतेत आहेत. कारण या पावसामुळं हाताशी आलेली पिकं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबीन, उडीद, मूग ही पिकं मातीमोल होण्याच्या मार्गावर आहेत. कालपासून सुरु असलेल्या या पावसामुळे शेतांना तळ्याचे रुप आलं आहे. शेतातील पिकात पाणीच पाणी झालं आहे. तर सुरुवातीला अवकाळीनंतर अतिवृष्टी त्यानंतर आता परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळं शेतकऱ्यांच्या हातात यावर्षी पीक म्हणून काही तरी पडेल की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
परभणी जिल्ह्यात रात्रभर जोरदार पावसाची हजेरी लावली.
परतीच्या पावसाने परभणीला अक्षरश झोडपून काढले आहे. रात्रभर शहर आणि परिसरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. तर पहाटेपासून पुन्हा पावसाची रिपीरिप सुरू झाली आहे. सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरु असताना झालेल्या या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी काढलेल्या आणि काढणी सुरू असलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
आज विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता
सध्या राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. कालपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पाच ते दहा ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून माघारी फिरणार आहे. अशातच आज हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: