Banana Production : केळीच्या दरात वाढ, मात्र जळगावात निर्यातक्षम केळीचा प्रथमच तुटवडा
Banana Production : यावर्षी जळगाव जिल्ह्यात विविध कारणांनी केळीच्या उत्पादनात कधी नव्हे एवढी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Banana Production : जळगाव (Jalgaon) जिल्हा हा केळी पिकाच्या उत्पादनात (Banana Production) देशात अग्रेसर जिल्हा आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीचं उत्पादन घेतलं जातं. मात्र, यावर्षी विविध कारणांनी केळीच्या उत्पादनात कधी नव्हे एवढी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. निर्यातक्षम केळीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे केळीचे दरात मोठी वाढ झाली आहे.
जळगावच्या केळीची गुणवत्ता आणि चव ही जगाला भुरळ घालणारी
जगाच्या पाठीवर अनेक देशात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. त्यातल्या त्यात भारतातील महाराष्ट्रामधील जळगावच्या केळीची गुणवत्ता आणि चव ही जगाला भुरळ घालणारी आहे. त्यामुळे भारतीय केळीला जगभरात मोठी मागणी होत आहे. जागतिक पातळीवर केळीला वाढलेली मागणी पाहता अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात अत्याधुनिक पद्धतीने शेती करत निर्यातक्षम केळी निर्माण करण्यात यश मिळवलं होतं. मात्र मागील वर्षात केळी पिकावर अनेक नैसर्गिक संकट आल्याने मोठे नुकसान झालं होतं. त्यामुळे कधी नव्हे ते एवढी उत्पादन घट झाल्याचं यावेळी पाहायला मिळत आहे.
नैसर्गिक संकटाचा केळी पिकाला मोठा फटका
दरम्यान, देशात आणि विदेशात मिळून रोज सहाशे कंटेनरची मागणी आहे. मात्र, सध्या केळीचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे केळीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांना नैसर्गिक संकटाचा फटका बसला आहे, त्यांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.
15 ते 20 हजार हेक्टर क्षेत्र बाधित
मागील काही महिन्यात आलेल्या विविध संकटांच्या मालिकेमधील चक्रीवादळ, गारपीट आणि सी एमवी व्हायरसचा झालेला प्रादुर्भाव याचा थेट परिणाम पाहायला केळी पिकावर झाला आहे. उत्पादनात घट झाली आहे. केळी उत्पादनात मोठी घट झाल्याने यंदा जळगावमध्ये 70 रुपये डझन इतका विक्रमी भाव देऊन सुद्धा केळी मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सीएमवीमुळे जळगाव जिल्ह्यातील 80 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 15 ते 20 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे.
बदलत्या हवामानाचा पिकांना फटका
सध्या राज्यात तापमानात चढ उतार होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण तयार होत आहे. या बदलत्या वातावरणाचा सर्वच पिकांना फटका बसत आहे. पिकांवर विविध रोगांचा, किडीचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. कडाक्याची थंडी केळीवरील करपा रोगासाठी पोषक आहे. अशा वातावरणात केळीच्या बागांवर करपाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. वाढत्या थंडीचा फटका नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: