Maharashtra Farmers Protest : महाराष्ट्रात शेतकरी एकजुटीचा आवाज बुलंद होणार; संयुक्त किसान मोर्चाची स्थापना, आंदोलनाची हाक
Maharashtra Farmers Protest : राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत संयुक्त किसान मोर्चाची स्थापना केली आहे.
मुंबई : शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव, पावसाने दिलेली ओढ आणि दुष्काळाचे सावट, क्षीण होत असलेला विरोधकांचा आवाज या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्यभरातील एक हजार निवडक शेतकरी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम)चे महाराष्ट्र स्थापना अधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशनात 13 मुख्य संघटनांव्यतिरिक्त विविध लहान-मोठ्या संघटनांशी संबंधित शेतकरी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यामध्ये महिला आणि आदिवासी शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती.
मागील वर्षी दिल्लीत शेतकरी संघटनांनी एकत्रितपणे संघर्ष उभा करून दिल्लीच्या सीमेवर जवळपास वर्षभर ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या परिणामी केंद्र सरकारला तीन कृषी कायदे मागे घ्यावे लागले. त्याशिवाय कृषी क्षेत्राशी संबंधित मोठ्या घोषणा कराव्या लागल्या. त्यानंतर आता महाराष्ट्रातही संयुक्त किसान मोर्चाची स्थापना करण्यात आली आहे.
एसकेएमच्या सात केंद्रीय नेत्यांनी अधिवेशनाला संबोधित केले. त्यात अखिल भारतीय किसान महासभेचे सरचिटणीस राजाराम सिंग, क्रांतिकारी किसान युनियनचे अध्यक्ष डॉ. दर्शन पाल, अखिल भारतीय किसान सभेचे महासचिव अतुल कुमार अंजान, किसान संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. सुनीलम, जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या नेत्या मेधा पाटकर, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांचा समावेश होता.
शेतकरी सभेचे नेते राजू कोरडे यांच्या स्वागतपर भाषणानंतर 11 सदस्यीय अध्यक्षमंडळाची निवड झाली. एनएपीएमच्या पूनम कनोजिया यांनी शोकठराव मांडला, तर प्रतिभा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. मागणीपत्रक आणि कृती आराखड्यासह महाराष्ट्राचे विशेष संदर्भ वापरून देशातील कृषी आव्हानांची रूपरेषा देणारा आठ पानांचा तपशीलवार ठराव मसुदा समितीने तयार केला होता. अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी तो अधिवेशनासमोर मांडला.
महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राजन क्षीरसागर, लोकसंघर्ष मोर्चाचे ताराचंद पावरा, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, एनएपीएमचे युवराज गटकळ, श्रमिक शेतकरी संघटनेचे राजेंद्र बावके, महिला किसान मंचाच्या वैशाली पाटील, सर्वहारा जनआंदोलनाच्या उल्का महाजन, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, वीज ग्राहक शेतकरी संघटनेचे प्रताप होगाडे आणि एआयकेकेएमएसचे अनिल त्यागी या सर्व नेत्यांनी त्या ठरावाला अनुमोदन दिले.
अधिवेशनाच्या अध्यक्षमंडळामध्ये वरील संघटनांचे ॲड राजेंद्र कोरडे, चंद्रकांत घोरखाना, हिरालाल परदेशी, हसीना तडवी, करणसिंह कोकणी, प्रसाद बागवे, सुनील मलावकर, हिरामण सुतक, सुभाष काकुस्ते, प्रभाकर नारकर आणि शोभा कारंडे (सगुणा महिला संघटना) हे होते.
आंदोलनाची हाक
2021 मध्ये चार शेतकरी आणि एका पत्रकाराची आपल्या गाड्यांखाली चिरडून निर्घृण हत्या केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बडतर्फ करून खुनाच्या आरोपावरून अटक करावी, या मागणीसाठी 3 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आणि तहसील केंद्रांवर मोठी निदर्शने करण्याचा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला.
26 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राज्याची राजधानी मुंबई येथे निषेधाच्या प्रचंड कृतीसाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी व कामगारांनी एकत्र येण्याचा निर्णयही अधिवेशनाने घेतला. या कृती कार्यक्रमाचे नेमके स्वरूप लवकरच मुंबईत होणाऱ्या संयुक्त बैठकीत एसकेएम आणि कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठरवले जाणार असल्याची माहिती समितीच्यावतीने देण्यात आली.
ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे महाराष्ट्र सध्या गंभीर दुष्काळाच्या अरिष्टात आहे. हा तीव्र प्रश्नही लढ्याच्या मार्गातून घेण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला.
या ठरावात शेतकरीविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या, धर्मांध आणि फॅसिस्ट मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप-आरएसएस राजवटीचा दारुण पराभव करण्याचे आवाहन करतानाच, भाजपच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्या राज्य सरकारच्या पोलिसांनी जालना जिल्ह्यात मराठा शेतकरी समाजाच्या शांततापूर्ण आंदोलनावर केलेल्या भीषण हल्ल्याचाही निषेध करण्यात आला. शेकडो शेतकर्यांवर झालेल्या या हल्ल्यात अनेक महिला व पुरुष गंभीर जखमी झाले आहेत.
अधिवेशनात डॉ. अशोक ढवळे यांनी महाराष्ट्रातील 13 संघटनांच्या एसकेएम समन्वय समितीसाठी मांडलेला ठराव एकमताने मंजूर झाला. वर उल्लेख केलेल्या सर्व प्रमुख संघटना या समितीत आहेत. इतर लहान संघटनांचा समावेश निमंत्रित म्हणून केला जाणार असल्याची माहिती एसकेएमने दिली आहे.